Wednesday, 18 February 2026

छत्रपती शिवाजी महाराज : जयंती फक्त उत्सव नाही, आत्मपरिवर्तनाची शपथ

 छत्रपती शिवाजी महाराज : जयंती फक्त उत्सव नाही, आत्मपरिवर्तनाची शपथ

दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. ढोल-ताशांचा गजर, भगवे झेंडे, मिरवणुका, फटाके, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव वातावरण भारावून जातं. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारतो का? आपण खरोखर शिवरायांचा एक तरी गुण आपल्या आयुष्यात उतरवतो आहोत का? 




शिवजयंती म्हणजे केवळ देखावा नाही; ती आत्मपरीक्षणाची संधी आहे. स्वराज्य उभारणाऱ्या त्या महान राजाने केवळ किल्ले जिंकले नाहीत, तर लोकांच्या मनात विश्वास जिंकला. त्यांचे जीवन म्हणजे धैर्य, न्याय, शिस्त, प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान यांचा जिवंत धडा आहे.

शिवरायांनी स्वराज्याची संकल्पना दिली “हिंदवी स्वराज्य”. त्याचा अर्थ फक्त राजकीय सत्ता नव्हता, तर लोकांचा सन्मान आणि अधिकार. आज आपण स्वतःचा, आपल्या मातृभाषेचा, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगतो का? की केवळ सोशल मीडियावर पोस्ट टाकून समाधान मानतो? जर आपण शिवरायांचा एक गुण आत्मसात करायचा ठरवला, तर तो स्वाभिमान असावा  चुकीसमोर न झुकणारा आणि योग्य गोष्टीसाठी उभा राहणारा.

इतिहास साक्ष देतो की युद्धात शत्रूच्या स्त्रियाही सन्मानाने परत पाठवणारा राजा म्हणजे शिवाजी महाराज. आजच्या समाजात स्त्रियांच्या सुरक्षिततेचे प्रश्न अजूनही गंभीर आहेत. मग आपण शिवजयंती साजरी करताना स्त्री सन्मानाची प्रतिज्ञा करतो का?

खरा उत्सव तेव्हाच, जेव्हा आपल्या वागण्यातून प्रत्येक स्त्रीला सुरक्षिततेची जाणीव होईल.

शिवरायांचे सैन्य शिस्तप्रिय होते. प्रत्येक सैनिकाला जबाबदारीची जाणीव होती. आज आपण आपल्या कामात, व्यवसायात, समाजकार्यात प्रामाणिक आहोत का? जर प्रत्येकाने आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडले, तर तेच स्वराज्याची खरी अंमलबजावणी ठरेल.

शिवाजी महाराजांनी कधीही धर्माच्या आधारावर भेदभाव केला नाही. त्यांच्या दरबारात सर्व जाती-धर्मांचे लोक सन्मानाने होते.

आज आपण मतभेद वाढवतो की ऐक्य निर्माण करतो?

शिवजयंती म्हणजे समाजात एकता निर्माण करण्याचा दिवस असायला हवा.

फटाके वाजवणे, मोठे पोस्टर लावणे, स्टेटस ठेवणे याने इतिहास बदलत नाही. शिवरायांचा एक तरी गुण आपल्या बोलण्यात, वागण्यात, आचार-विचारात उतरवणे हाच खरा उत्सव आहे.

आपलं बोलणं संयमी आणि सत्य असावं.

आपलं वागणं न्याय्य आणि सन्मानपूर्ण असावं.

आपले विचार स्वराज्याला शोभतील असे उन्नत असावेत.

जर प्रत्येक शिवभक्ताने हा संकल्प केला, तर प्रत्येक घरात स्वराज्याची ज्योत पेटेल. आणि त्या दिवशी शिवजयंती हा केवळ एक सण राहणार नाही, तर तो समाजपरिवर्तनाचा प्रारंभ ठरेल.

चला, यंदाची शिवजयंती आपण केवळ साजरी करू नये तर ती जगूया! 

आहे ते आहे

सचिन कृष्णा तळे ✍️

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale