शीर्षक : वहीतलं स्वप्न
शाळेच्या नव्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर असलेली इयत्ता चौथी ची वर्गखोली नेहमीच गजबजलेली असायची. सकाळच्या प्रार्थनेनंतर, पायऱ्या चढत मुलींचा गोंधळ, हशा, पायांची धावपळ आणि दप्तरांचा आवाज सगळीकडे पसरलेला असायचा. त्या वर्गात स्वरा नावाची एक शांत मुलगी पहिल्या बाकावर नेहमी बसायची. ती बोलकी होती, पण तिच्या डोळ्यांत काहीतरी वेगळंच दिसायचं जणू शब्दांपेक्षा जास्त ती मनात चित्रं पाहत असायची .
स्वराच्या दप्तरात पुस्तकं होती, वही होती, पण त्या वह्यांमधील पानं नेहमी सारखी नव्हती. गणिताच्या वहीत आकड्यांच्या रांगा होत्या, पण त्या आकड्यांच्या शेजारी डोंगर, झाडं, घरं, सूर्य, ढग आणि कधी कधी छोट्या पक्ष्यांची चित्रं उमटलेली असायची. वर्गात शिक्षक शिकवत असताना स्वरा लक्ष देत असायची, पण मध्येच पेन्सिल आपोआप कागदावर रेषा ओढायला लागायची. त्या रेषांमधून हळूहळू एक जग तयार व्हायचं.
एके दिवशी गणिताच्या तासाला शिक्षिकांनी अचानक वही तपासायचं ठरवलं. घाईघाईने वही उघडल्या. कुणाच्या वहीत उत्तरं चुकीची होती, कुणाची वही अस्ताव्यस्त होती, तर कुणाची पूर्णच रिकामी होती. स्वराची पाळी आली तेव्हा शिक्षिकांनी वही उघडली आणि काही क्षण त्या शांत झाल्या. आकड्यांबरोबर रंगीत चित्रं पाहून त्यांनी आश्चर्याने स्वराकडे पाहिलं.
“स्वरा, ही गणिताची वही आहे की चित्रांची?”
त्यांच्या प्रश्नावर वर्गात हसू पसरलं. काही मुलींनी खिदळत स्वराकडे पाहिलं. स्वरांचं डोकं खाली झुकलं. तिला लाज वाटली, भीती वाटली आणि कुठेतरी आपलं काहीतरी चुकीचं झालंय असंही वाटलं. त्या दिवशी उरलेल्या तासांत ती अजूनच गप्प झाली.
शाळा सुटल्यावर स्वरा नेहमीसारखी घरी आली. दप्तर कोपऱ्यात ठेवून ती शांतपणे बसून राहिली. आईने तिच्याकडे पाहिलं आणि तिला लगेच जाणवलं आज काहीतरी घडलंय. तिने हळूच विचारलं, “काय झालं गं ?”
स्वरा काही बोलली नाही. थोड्या वेळाने तिने गणिताची वही आईसमोर ठेवली. आईने ती वही उघडली. पानोपानी चित्रं पाहून ती काही क्षण शांत राहिली. मग तिने वही बंद केली, स्वराच्या डोक्यावरून हात फिरवला आणि हसून म्हणाली, “खूप छान चित्रं आहेत. पण शाळेत हे करताना थोडं भान ठेवायला हवं, बरोबर?”
आईचा आवाज प्रेमळ होता. त्यात राग नव्हता, भीती नव्हती. त्या रात्री जेवणानंतर स्वराने पहिल्यांदाच मन मोकळं केलं. “आई, मला चित्र काढायला खूप आवडतं. मोठी होऊन मी चित्रकार होईल .”
आईने काहीच उत्तर दिलं नाही. दुसऱ्या दिवशी तिने हे सगळं बाबांना सांगितलं. बाबांनीही काही प्रतिक्रिया दिली नाही, पण रविवार आला तेव्हा त्यांनी स्वराला एका चित्रकला प्रदर्शनात नेलं. तिथे मोठमोठी चित्रं, वेगवेगळ्या शैली, कलाकारांची नावं आणि त्यांच्या संघर्षाच्या गोष्टी होत्या. “हे कलाकारही कधी शाळेतच होते,” बाबा म्हणाले, “त्यांनी अभ्यासही केला आणि आपली आवडही जपली.”
त्या दिवसापासून स्वरा बदलली. ती अभ्यास टाळत नव्हती, पण स्वप्न लपवतही नव्हती. तिने स्वतंत्र वही घेतली चित्रांसाठी. शाळेच्या वह्यांत अभ्यास, आणि घरी चित्रांसाठी मोकळा वेळ. हळूहळू शिक्षकांनाही तिची आवड कळली. कला स्पर्धेत तीच नाव दिलं गेलं.
वर्षाअखेरीस शाळेच्या वार्षिक प्रदर्शनात स्वरांचं चित्र लावण्यात आलं. त्याच्या चित्राखाली नाव होतं.
“चित्रकार : स्वराज्ञा तळे (इयत्ता चौथी )”
शिक्षिका थांबून ते चित्र पाहत होत्या. त्या दिवशी स्वराला पहिल्यांदा वाटलं. आपली वही फक्त अभ्यासाची नाही, ती स्वप्नांचीही असू शकते.
प्रत्येक मुलाच्या वहीत अभ्यास असतो, पण कधी कधी त्या वहीच्या कडेला एक स्वप्न जन्म घेत असतं. पालकांनी आणि शिक्षकांनी ते ओळखलं, जपलं, तर ती छोटीशी रेषा उद्याच्या आयुष्याचं मोठं चित्र रंगवू शकते.
सचिन कृष्णा तळे ,पुणे
७७०९०९९६४६
No comments:
Post a Comment