“लोकल चुकली की फक्त ट्रेन नाही, तर आयुष्यही लटकतं…”
“एक लोकल गेली तर दुसरी येईल” हे वाक्य ऐकायला खूप सोपं वाटतं. पण हे वाक्य ज्यांच्यासाठी वापरलं जातं, त्यांचं आयुष्य इतकं सोपं नसतं. बहुतेक मराठी तरुण प्रायव्हेट नोकरीत आहेत. वर्कप्लेस टॉक्सिक असतो, वेळेची लवचिकता फक्त कागदावर असते. दहा-पंधरा मिनिटं उशीर झाला, तर अर्ध्या दिवसाचा पगार कापला जातो. वरून चार शब्द ऐकावे लागतात, मान खाली घालून.
पण गंमत इथे आहे. “अर्जंट काम आहे” म्हणून दोन-दोन तास जास्त थांबवलं, सुट्टीच्या दिवशी घरून काम करून घेतलं,
तेव्हा मात्र एक्स्ट्रा पगार, ओव्हरटाईम, कुठलंच गणित नसतं.
उशीर झाला की नियम आठवतात, जास्त काम झालं की जबाबदारी सांगितली जाते. म्हणूनच मराठी माणूस दररोज लोकलला लटकत प्रवास करतो नाईलाजाने, पर्याय नसल्याने.
विविध भागांतून दर सकाळी मुंबईकडे वाहणारी ही गर्दी पाहिली, तर एक गोष्ट ठळकपणे दिसते. आपल्या शहरात रोजगार नाहीत, असं आपण म्हणतो. पण खरंच नाहीत का?
किराणा दुकाने – परप्रांतीयांच्या हाती
डेअरी, हार्डवेअर, मोबाईल – परप्रांतीय
प्लंबर, इलेक्ट्रिशियन, रिपेअरिंग – यूपी-बिहारी
फ्रँकी, सँडविच, साऊथ इंडियन, पाणीपुरी, बिर्याणी – परप्रांतीय
वडापाव-मिसळ सोडली, तर उरलेला बाजार कुणाचा आहे?
आणखी वेदनादायक वास्तव म्हणजे. मराठी मालकांच्या दुकानांतसुद्धा मराठी तरुणांऐवजी परप्रांतीय किंवा नेपाळी कामावर असतात. हे असं नाही की मराठी माणसाला संधी मिळत नाही. संधी आहे… पण तो स्वतःच तिकडे वळत नाही.
कारण लहानपणापासून डोक्यात भरवलं जातं “नोकरी म्हणजे प्रतिष्ठा, स्वतःचा धंदा म्हणजे कमीपणा.” हा विचारच मराठी समाजाला आज मागे खेचतोय.
बहुतेक तरुण ५०–६० हजारांच्या पगारावर नाहीत. आजचा प्रायव्हेट पगार आणि वाढलेला खर्च याची तुलना करायला वेगळं उदाहरण द्यायची गरजच नाही. तरीही आपण म्हणतो “आमचं शहर डेव्हलप झालं, पण रोजगार नाहीत.
पण प्रश्न असा आहे, लाखोंची लोकसंख्या असलेल्या शहरात
दररोज प्रत्येक घरातून पैसा खर्च होतोय, तो पैसा जातोय तरी कुणाकडे?
रोजगार आहेत. पैसा फिरतोय. फक्त आपली रोजगाराची व्याख्या वेगळी आहे. हा लेख नोकरी विरुद्ध स्वयंरोजगार असा वाद घालण्यासाठी नाही. हा आरसा दाखवण्यासाठी आहे.
कदाचित आता प्रश्न विचारायची वेळ आली आहे. आपण रोजगार शोधतोय की फक्त नोकरी ?
Sachin Jayshree Krishna Tale
आहे ते आहे
No comments:
Post a Comment