Friday, 30 March 2018

मोर्चा , सोशल मीडिया आणि देश ... !!


मोर्चा , सोशल मीडिया आणि देश ... !!

मोर्चा इथे रंगाचा, जातीचा, दहशतवाद्यांचा निघतो
कायद्याच्या चौकटीत शेतीचा, लोकशाहीचा निघतो
ज्याचा त्याचा स्वार्थ, ज्याची त्याची प्रगतीची वाट
त्या गर्दीत मात्र घाम, सामान्य जनतेचा निघतो

हो ! त्या गर्दीत मात्र घाम सामान्य जनतेचा निघतो. गेल्या काही वर्षात आपल्याला हे जाणवलं असेल की , आपल्या राज्यात देशात रोज कुठे ना कुठे तरी मोर्चे निघत आहेत. त्याविषयी सोशल मीडियावर नुसती वैचारिक दंगल चालू असते. लोकांमध्ये एकमेकांविरोधी प्रेम कमी, एकमेकांबद्दलचे आदर कमी , जिव्हाळा कमी तर द्वेश जास्त आढळून येतोय. आणि हा द्वेश सगळ्यात जास्त सोशल मीडियाच्या गाभाऱ्यात दिसतोय. त्या सोशल मीडिया वरच जग आणि बाहेरच जग ह्यात खूप मोठ अंतर आहे. शक्यतो ते अंतर मानवी डोळ्यांना न पेलणार व न झेपणार आहे. जे दिसत ते नसत आणि जे नसत ते दिसत अशी ही सोशल मीडियाची भुरळ. प्रत्येक गोष्टी मध्ये काही चांगल्या बाबी असतात तर काही वाईट ही. फक्त समोरच्या माणसा वर ते अवलंबून आहे.  लोकांना संघटित करण्यासाठी ह्याच सोशल मीडियाचा जास्त वापर होतोय. सोशल मिडीयावरून लोकांना भडकावून असे काही चित्र तयार केले जातात की आपल्यावर, आपल्या माणसांवर, आपल्या समाजावर खूप मोठे अत्याचार होतायत. आणि हा फंडा सर्व धर्माचे लोक अगदी जाणीवपूर्वक वापर करतायत. बातम्या देणाऱ्याना ही तेच हवं जे तुम्ही आपण करतोय. जितक्या वेगाने बातम्या पोहचत नाही तितक्या वेगाने सोशल मीडियावर अफवा पसरतात. बातम्या पसरतात. आपल्याला मिळालेली खबर ही खरी की खोटी ह्याची शहानिशा न करता आपण ती आपल्या मित्र परिवारात सहज पाठवतो त्याचे दुष्परिणाम न जाणता , न विचार करता. आपल्या देशात राज्यात प्रगतीचे वारे कसे वाहतील ह्याचा विचार न करता स्वतःचे अस्तित्व कसे टिकवता येईल ह्याचा विचार करणारे काही राजकीय समाजकंठक फक्त स्वार्थ साधण्यासाठी तुम्हा आम्हाला भडकवत आहेत. आणि आपण अंध होऊन त्यांच्या हाकेला धावून जातोय. विविध रंगाचे झेंडे , घोषणा , आणि गर्दी . सगळ्यात महत्वाची बाब ही की ह्यात शिक्षित तरुणांची संख्या ही जास्त आहे. आणि हे सगळ्यात घातक आहे. आपल्या पूर्वजांच्या काळात भूतकाळात जे काही घडलं ते पुन्हा वर्तमानकाळात व भविष्यात घडू नये ह्यासाठी एकजूट न होता भूतकाळातील गोष्टींवर जास्त भर देण्यात येतोय. त्यावेळीच दाखले दिले जातायात.

आवाज उठवण्यासाठी संघर्ष हवा एक लढा हवा
मात्र नेत्यांसाठीच का ? हा खोटा पसारा निघतो !

एखाद्याने आपल्या कानाखाली वाजवली तर त्याला दुसरा गाल समोर करावे ह्या महात्मा गांधींच्या विचारावर आपला देश मुळीच नको. अन्याय विरोधी आवाज हा उठलाच पाहिजे . पण झालेल्या घटनेला जातीचे , धर्माचे शिक्के न मारता . माणुसकीच्या व देशाच्या हिताच्या नजरेतून ते हवे. जर त्याने केलं तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी दिलेलं संविधान अन कायदा हा भक्कम आहेच की. परंतु अमुक नेता म्हणतो म्हणून तेच खरे असे मानून भर रस्त्यात उतरणे , तोडफोड करणे , दंगे करणे हे योग्य आहे का? जर असे वाटत असेल की हे मोर्चे दंगे म्हणजे आमची ताकद आहे , आमची शक्ती प्रदर्शन आहे तर ती तुमची सर्वात मोठी भूलचूक असेल देशबांधवांनो . तुमची ताकद ही स्वतःच्या जातीबद्दल , समाजाबद्दल न दाखवता ती देशाबद्दल दाखवा. देशाच्या सर्वोच्च पदावर ज्या लोकांना आपण आपल्या मतदानातून स्थानबद्ध केलं त्यांच्या हाताला व त्यांच्या कार्याला , विचारला बळकटी कशी मिळेल ह्या कृतीतून दाखावा. जर ते राजकर्ते नपुसंक (नाकर्ते) असतील दंगल खोर असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी तुमची ताकद दाखवा. देशाची सीमा आज आपल्या रक्षणास खंबीर उभी आहे त्या अमर सैनिकांच्या शौर्य गाथेवर दाखवा. त्यांच्या पाठीशी उभे राहा. देशांतर्गत जे तेढ निर्माण करत आहेत त्या समाजकंटकांविरोधी दाखवा. देशात राजकीय स्वार्थ साधत सरकारी व जनतेची तिजोरी लुटणाऱ्या त्या लालू प्रासाद , भुजबळ सारख्या नेत्यांबद्दल दाखवा. करोडो रूपयेचे घोटाळे करून देश सोडून जाणाऱ्या त्या विजय मल्ल्या , निरव मोदी ह्यांच्या सारख्या लोकांविरोधी दाखवा. 

सीमेवर धारातीर्थ जेव्हा पडतो अमर सैनिक
तेव्हा त्याच्या डोळ्यातुन अश्रू देशभक्तीचा निघतो !

 देशाची अर्थव्यवस्था ही आपल्या रोजच्या कामावर अवलंबून आहे. बंद पुकारणे त्याला यशस्वी करणे ह्यातुन फक्त तुमचं आमचं या आपल्या देशाचं नुकसान आहे. आजही आपल्या देशात असे काही देशबांधव आहेत ज्यांना रोजची भाकर ही त्यांच्या कष्टावर मिळते. रोज विहीर खोदून पाणी पिणाऱ्या लोकांची संख्या त्या मजदुरांची , कामगारांची संख्या आपल्या भारतात जास्त आहे.  त्यांनी घाम गाळल्यावरच त्यांना भाकरी मिळते . मग त्या बंद च्या वेळी ह्या लोकांनचा विचार आपण खरंच करतो का? मोर्चा हा अन्यायाचे प्रतीक आहेत , न्यायाची हाक आहे , एकतेची मशाल आहे. पण हा मोर्चा जर आपल्या देशा साठी असेल,आपल्या देशा विरोधी  कारनामे करणाऱ्या शेजारील देशविरोधी असेल तर ते सोन . आज सगळ्यांना आपापल्या घराची पर्वा आहे. आपल्या घरातल्या मुलांची प्रगती व त्यांची भविष्याची काळजी आहे. त्यांना उत्तम शिक्षण देणं त्यांना समाजात  व देशात एक चांगला नागरिक तयार करण हे जितकं शिक्षकांचं काम आहे तितकच आपलं ही. मूल ही लहान वयात मोठ्यामाणसांचे अनुकरण करत असतात आणि आजच्या पिढीला सोशल मीडिया ही अंगणवाडीतच शिकायला मिळते. आपण जे करतो ते नकळत त्यांच्या मनात रुजत. आपले मोर्चे , बंद , दंगल , घोषणा , तोडफोड , राजकारण हे सगळं काही ती निष्पाप मूल पाहत आहेत. त्या बाळ मनावर नक्की कोणते परिणाम होतील ह्याचा विचार नक्की केला पाहिजे. उद्याचा भारत हा त्याच मुलांच्या हातात असेल आणि आपण तेव्हा वृद्ध होऊन केलेल्या चुका पाहत राहो. तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. आपली मूल एकमेकांचे वैरी झालेले असतील .   किंवा आपल्या आपापसातल्या भांडणाचा गैरफायदा घेत देशाचे तुकडे होऊ पाहणाऱ्याचे स्वप्न पूर्ण झालेले असेल. देशाची एकता अखंडता टिकवणे हे तुमचे आमचे सगळ्यांचे प्रथम कर्तव्य आहे. जगातले सगळे धर्म आज आपल्या देशात सुखा समाधानाने नांदत आहे फक्त काही समाजकंठक सोडले तर. जो देश सगळ्या धर्माचा आदर सन्मान करतो , आज तोच देश सतत जातीपातीच्या राजकारणात , धर्माच्या आगीत जळत आहे. त्याची प्रगतीची वाट आपणच खुंटून काढत आहोत . भविष्यकाळात एक दिवस असा ही उजाडेल जेव्हा येणारी पिढी हे सगळे धर्म , जात पात सोडून देतील आणि देश हाच धर्म पुजतील . भूतकाळात ज्या चुका झाल्यात त्या विसरून जाऊन तिरंगा हा घरोदारी फडको. जय हिंद . वंदे मातरम

नोकरी शिक्षण उदयॊग अन प्रगतीची दिशा
बेरोजगार महागाई , सवाल प्रश्नाचा निघतो !
सगळ्या धर्माचा आदर, ज्या देशात आज आहे
त्या देशासाठी कुठे, साधा एक मोर्चा निघतो

सचिन कृष्णा तळे
७७०९०९९६४६






No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale