पाहीन श्रीमुख आवडीने…!!
विश्वातला एकमेव सोहळा, पांडुरंगाचा हा भक्तीचा मेळा,
आगळा वेगळा, जिथे ध्यानी मनी फक्त अन फक्त असतो रुख्मिणीचा सावळा, माथ्यावर टिळा ,मातृत्वाचा
तो लळा. वारीचा वारकरींचा लहानापासून थोरांचा. असंख्य पायांचा नामाचा शब्दांचा संतांचा
,संतांच्या कीर्तनाचा. आभाळी डोलणाऱ्या भगव्या पताकातून ढोल टाळ मृदूंग अन विठ्ठल गोडीचा.
तुळस वृन्दावनचा, संस्कृतीचा, संस्काराचा. अभंग , काव्य , गीत , नाच , रिंगण अश्या
भक्तिमय मेजवानीचा. चंद्रभागेच्या पाण्यावाणी रात्र दिवस वाहत जाणारा. श्रेद्धेचा सबुरीचा
ज्ञाना तुकाच्या गजरात मानाचा . एकमेव सोहळा म्हणजे आपली आषाढी वारी.
माझ्या वारीत.. एक मुखाने विठ्ठल रुक्माई चा गजर होतो
अन इंद्रायणी चा लाडका राजा थाटात पालखीत बसतो तर जगतगुरु तुकाराम महाराज वैकुंठातून
थेट वारकरींच स्वागत करत देहूतुन देहात विरजतात.
पैठण गावातून नाथांची भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ रुपी भक्तीचा रंग वारीत मिसळतो
आणि हो .. विठ्ठल नामाने जे दरवळे ती कस्तुरी
म्हणजे चोखामेळा, अश्या ह्या कस्तुरीचा
... विदर्भाचा ... महारांचा तो सुगंध निराळा. नामयाची दासी माझी जनाबाई गोदावरीच्या तीरी तिला
विठ्ठलाची किती गोडी तो गोडवा वारीत मिसळवा आणि वारी गोड व्हावी. शिव वैष्णव एक त्याच्या नामाचा व्यवहार भक्तीचा आधार जिथे तिथे नरहरी सोनार. संत नामदेवा
सवे शिखांचे चाले थवे. त्र्यंबकेश्वराहुनी
निवृत्तिनाथांची पालखी चाले. संत गोरा कुंभार
, संत सावता माळी , सोपान देव संत मुक्ताबाई असे अनेक संतांच्या अदृश्य दैवी शक्तीने
भक्तीने लोक मैलांचे अंतर पार करत त्या पांडुरंगाला भेटतात आणि वारीचा गुलाल आसमंतात
उधळतात. त्या गुलालाचा रंग जेजुरीत देवा खंडेरायाच्या
भेटीने सोन्याहून पिवळे होते. रिंगणात माऊलीच्या अश्वाच्या चरणांची माती तीच वारकऱ्यांसाठी
उदी पांडुरंगाची. इथे नसती अंधश्रद्धा इथे नसती जातीपातीचा घेरा इथे एकच बाप एकच जात
विठ्ठल रुक्माई वरा. इथे भाषा माणुसकीची इथे माणसांना माणसांत देवाची होती प्रचिती.
तीच माझी आषाढी वारी .
माझ्या वारी मार्गावरी अनेकांची
मदत होती अनेक हातांची मिळते गोडी. त्यांच्यासाठी हीच ईश्वर सेवा हीच पांडुरंग सेवा
हिच देव देश धर्म सेवा. ऊन वारा पावसाची नाही तमा अखंड हरी नामात जपली उभ्या महाराष्ट्राने
संतांची हि परंपरा. आहो .. आम्ही भाग्यवंत तो एक तिरंगा एक भगवा एक विठ्ठल बरवा . गंगा
चंद्रभागा होई तीर्थ पुंडलिक भीमा . तिच्या अमृताने पुण्य मिळवावे धन्य व्हावे जीवन
सारे. तेथून थेट भक्तीची रांग तासंतास फक्त पांडुरंग फक्त पांडुरंग फक्त पांडुरंग अवती
भवती. प्रतीक्षा संपताच, होता दर्शन, आनंद गगनात मावतो आणि पहा ... पहा ... पहा ...ते “सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवूनिया. तुळशी
हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेचि ध्यान” जो विठ्ठल हृदयात तो साक्षात पाहवा ,सोबत माय
रुक्मीणी सुंदर स्वर्गाची राणी तिला भक्तीने नटवावा. ते रूप गोजिरे भेटताच मिठी मारावे
असा बाप माझा द्वारकेचा राजा त्याला डोळेभरून पाहावे.
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने
पाहीन श्रीमुख आवडीने
सचिन कृष्णा तळे , पुणे
७७०९०९९६४६
No comments:
Post a Comment