तेलुगू, कानडी, तामिळ, हिंदी आणि मराठी या भाषांचे हैदराबाद संगमस्थान आहे. या भाषाभगिनीच्या साहित्याचा मराठी भाषकांना परिचय करून द्यावा, भाषिक आणि सांस्कृतिक आदान-प्रदानाचे सौहार्द निर्माण करावे ही मुख्य उद्दिष्टे नजरेसमोर ठेवून इ.स. १९५८ मध्ये ’मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश’या संस्थेची स्थापना झाली. भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबाद येथे असलेल्या मराठवाडा साहित्य परिषदेचे औरंगाबादला स्थलांतर झाले. त्यामुळे हैदराबादमधील मराठी साहित्यिक वातावरण विचारात घेऊन न्या. श्री. गोपाळराव एकबोटे, प्रा. रा. ब. माढेकर, प्रा. भा. शं. कहाळेकर, प्रा. र. म. भुसारी, डॉ. श्रीधरराव कुलकर्णी, आणि दिवाकर कृष्ण केळकर यांनी आंध्र प्रदेश मराठी साहित्य परिषद ची स्थापना केली.
ही मंडळी वेगवेगळ्या व्यवसायात होती आणि महाराष्ट्र मंडळ, विवेकवर्धिनी शिक्षण संस्था, मराठी ग्रंथ संग्रहालय आदी संस्थांमध्ये विश्वस्त किंवा पदाधिकारी होती. त्यांपैकी काही लेखक आणि संशोधकही होते. हैदराबादच्या या मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेपासून कार्यकर्ते असलेले द.पं. जोशी (१९३२-२०११) यांनी सुमारे ४० वर्षे परिषदेची कार्यपताका फडकवत ठेवली होती. आंध्र प्रदेशची मराठी साहित्य परिषद ’इ.स. १९५८ सालापासून’पंचधारा’नावाचे त्रैमासिक काढते. हे त्रैमासिक या परिषदेचे मुखपत्र आहे. गेली 54 वर्षे हे त्रैमासिक सुरू असून हैदराबादसारख्या ठिकाणाहून नियमितपणे निघत आहे. मनोरंजन नाही, अनुकरण नाही, म्हणून सवंगपणाही नाही, सर्वदूर पसरलेला सुबद्ध मराठी माणूस हेच पंचधारेचे लक्ष आहे. डॉ. श्रीधरराव कुलकर्णी, नंतर प्रा. दं. प. जोशी, यांनी 1974 ला या मासिकाचे संपादकपद स्वीकारले आणि पंचधारेचे स्वरूप बदलायला सुरुवात झाली. जे साहित्य वाङ्मयीन कसोटीला उतरते तेच साहित्य छापायचे. विनाकारण तडजोड स्वीकारायची नाही हे पंचधारेचे सूत्र आजही कायम आहे. उर्दू, कन्नड, हिंदी, तेलुगूमधले चांगले साहित्य अनुवाद करून पंचधारामधून यायला सुरुवात झाली. तेव्हा अनुवादित साहित्याचा फारसा बोलबालाही नव्हता. संशोधनपर आणि समीक्षात्मक लेखन हे पंचधाराचे महत्त्वाचे अंग आहे.
पंचधारेने जवळ जवळ साठ विशेषांक प्रकाशित केले आहेत. त्यापैकी तेलुगू विशेषांक, दक्षिणी भारतातील स्त्री लेखिका विशेषांक, उर्दू साहित्य विशेषांक, दक्षिणी भाषा शब्दकोश, वा भाषाशास्त्र विशेषांक, कै. नरहर कुरुंदकर विशेषांक, कुमार गंधर्व विशेषांक, नरहर कुरुंदकर विशेषांक, गालिब विशेषांक. कै. यशवंतराव चव्हाण आणि आंध्र प्रदेश मराठी साहित्य परिषद यांचा निकटचा संबंध होता.
सचिन कृष्णा तळे

No comments:
Post a Comment