Saturday, 1 June 2024

पाणी पैश्यासारखं वापरा… आणि पैश्यासारखं जपा.

 

पाणी पैश्यासारखं वापराआणि पैश्यासारखं जपा.



सध्याची महाराष्ट्राची लोकसंख्या इतर राज्यापेक्षा जास्त आहे कारण नोकरी उद्योग इत्यादी कारणामुळे इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थालांतरित झालेल्यांची संख्या दिवसानुदिवस वाढत आहेत. गावांचं शहरात रूपांतर होत असताना उंच इमारती, मोठमोठाले कारखाने अन त्यांना लागणारं पाणी या प्रश्नांपुढे आपले आहे ती धरणे कमी पडू लागली आहेत. टँकर चं जाळं शहरात असं विणलं गेलंय  कि त्यामुळे भूजलातील पाणी देखील आटत चालय. शहरीकरणाच्या नादात माणसाने जी कुऱ्हाड झाडांवर निसर्गावर चालवली तीच दुष्काळ रुपी कुऱ्हाड आता माणसांवर घाव घालत आहेत. या संकटातून तुम्हाला सरकार नाही तर हा निसर्गच वाचवू शकतो. पाणी पैश्यासारखं वापरा… आणि पैश्यासारखं जपा.

 

राज्यात उन्हाच्या दाहकतेने नद्या, विहिरी, ओढे, कालवे हि कोरडे ठणठणीत पडले आहेत. जनतेला पिण्याच्या एक घागरभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. माणसांबरोबर जनावरांच्याही चाऱ्याचा व पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी आठवड्यातून एकदा पाणी मिळत आहे. सरकार पाणी कपात करून करून किती दिवस करणार? सरकार टँकर तरी किती पुरवणार? धरणात पाणीच नाही म्हंटल्यावर सरकार तरी तुम्हाला पाणी कोठून आणून देणार? लातूर ला ट्रेन च्या माध्यमातून पाणी पुरवले जात आहे. जोपर्यंत नागरिक जागरूक होणार नाही वनीकरण आाणि वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेणार नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही हे लक्ष्यात घ्या. दुष्काळ निवारणासाठी पाणलोट क्षेत्र विकासात छोटी झाडे, गवत आणि झुडूपवर्गीय झाडांची लागवड इत्यादी आवश्यक असते. शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था किंवा व्यक्तींना रोपे पुरवठ्याची कामे सुद्धा वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग करत आहे त्यांना संपर्क साधून तुम्ही झाडे लावू शकता. अनेकजण झाडे लावण्याचे काम करत आहे पण लावलेली झाडे जागवण्याची जबाबदारी कोणी घेत नाही. लावलेली झाडे जगवली तरच पावसाचे प्रमाण नक्की वाढेल. आज आपण पाहतो की, वृक्षांची संख्या कमी होत आहे. वृक्षतोड होऊन त्याठिकाणी मोठ मोठ्या इमारतींचा विस्तार होत आहे त्यामुळे पाऊस कमी होत आहे अन दुष्काळ जन्य परीस्थिती दिसून येते.

 

पावसाचे पाणी जास्तीतजास्त गावाच्या शिवारात अडवून विकेंद्रित स्वरूपाचे पाणीसाठे निर्माण करणे, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे असे उपाय  झाले पाहिजे. नद्यानाल्यांच्या खोलीकरण, रुंदीकरणातून जलसंधारण साधले गेले पाहिजे. राज्यात जी लहान-मोठी तलावे तुटलेली व गाळाने भरलेली आहेत त्यांची दुरूस्ती व गाळ काढने आवश्यक आहे. हा निसर्ग निर्मित दुष्काळ नसून मानव निर्मित दुष्काळच आहे.  पाऊस कमी पडल्यामुळे कृषी उत्पादन कमी होते व भूकबळींची संख्या वाढते हे विसरता कामा नाही. कोरड्या भागात दुष्काळ परिस्थिती नव्या वाळवंटाची निर्मिती करते. पावसाचे पाणी खाली जमिनीत झिरपले नाही तर भूगर्भातील पाण्याची पातळी देखील कमी होत जाते.

 

- पाऊसाचे पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था करावी व ह्याची सवय असू द्यावी.

- पावसाळ्या पूवी स्थानिक जलकुंभाची दुरुस्ती करून नवीन करावी.

- भूगर्भातील पाण्याचा स्तर वाढवण्यासाठी पावसाचे पाणी खड्यांमार्फत जिरवले गेले पाहिजे.

- जास्तीत जास्त अन मोठ्या प्रमाणात सोसायटी अन संस्थेने जलसंधारण कार्यक्रमात भाग घेणे गरजेचे आहे.

- घरगुती वापरासाठी वापरलेले पाणी पुन्हा झाडांना आणि रोपट्याना कसे वापरता येईल याचा विचार झाला पाहिजे.

- आंघोळ करताना , गाडी धुताना , घराची फ्लोरिंग स्वच्छ करताना, दैनंदिन जीवनात जिथे जिथे पाणी चा वापर आहे तिथे तिथे पाणी जपून वापरले पाहिजे.

 

पाऊस कमी आहे हेच फक्त दुष्काळाचे एकमेव कारण नाही. बेजबाबदार नोकरशाही तसेच चुकीचे नियोजन यामुळेही दुष्काळाची तीव्रता वाढते. पाण्याचे दुर्भिक्ष, पिकांची झालेली नासाडी,  दुष्काळग्रस्तांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर अशा स्वरूपात या दुष्काळाचे चटके बसत आहेत. राज्यातील तसेच आपापल्या भागातील विविध प्रकारे वाया जाणाऱ्या पाण्याचा एकत्रित विचार करण्यासाठी शासनाने राज्य, विभाग व जिल्हापातळीवर आणि लोकांनी आपापल्या स्तरावर समिती गठित करून ठोस नियोजन केल्यास सध्याचा पाणी प्रश्न सहज सुटू शकतो. गावात आणि शहरात पाण्याची काय परिस्थिती आहे आणि नेमके काय प्रश्न आहेत हे स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, अभ्यासक, शेतकरी, उद्योजक, आदी समाजघटकांनी पाहिले पाहिजे. पाणी नियोजनाशी निगडित काम करणाऱ्या  जलसंपदा, जलसंधारण, ग्रामविकास, कृषी, वने, सामाजिक वनीकरण, भूजल सर्वेक्षण, पाणीपुरवठा आदी शासनाच्या संघटनेशी या कार्यकर्त्यांनी लोकांनी संपर्कात राहिले पाहिजे. आजची भयाण परिस्थिती तर तुमच्या डोळ्यासमोरच आहे. तुम्ही या उद्दिष्टांचा जाब विचाराल तर तुम्हाला उत्तर मिळेल की नाही, माहीत नाही; परंतु तुमचा पाणीप्रश्न आणि चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास नक्कीच सुरुवात होईल. ज्या ठिकाणी फळे, पिके अथवा नगदी पिके आहेत, अथवा पाणी वापर जास्त आहे, त्या ठिकाणी सिमेंट बंधारे मर्यादित ठरतात. पावसाची अनियमितता, बाष्पीभवन, दोन-तीन वर्षांत गाळाने भरणे आदी बाबींचा विचार करता सिमेंट बंधाऱ्याची उपयोगिता राज्याच्या दृष्टीने मूलत: मर्यादित स्वरूपाची आहे. भयाण दुष्काळातही उत्तम प्रकारे तग धरून राहिलेली एकमेव वनस्पती आपण पाहात असाल ती म्हणजे वेडीबाभूळ आहे. राज्यातील पाण्याचा प्रश्न कोणताही स्वतंत्र निधी न घेता केवळ लोकांच्या सोप्या व सरळ उपाययोजनांची अंमलबजावणी केल्यास सुटू शकतो. म्हणून पुन्हा एकदा विचार करा आणि पाणी पैश्यासारखे वापरा.

 

सचिन कृष्णा तळे

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale