"फ्रान्समध्ये घडणाऱ्या दुर्दैवी घटनांचा गैरफायदा घेऊन भारतात अस्थिरता पसरवू पाहणाऱ्यांनी हा इतिहास आणि वर्तमानाचा डोळसपणे अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. भारताची लोकशाही परिपक्व आहे, इथली जनता सुजाण आहे. ज्यांना देशात हिंसाचार आणि अराजकता पाहण्याची इच्छा आहे, त्यांच्या या छुपे मनसुब्यांना देशातील जनता कधीही यशस्वी होऊ देणार नाही. विकासाचा मार्ग हा दगडफेक किंवा जाळपोळीचा नसून शिक्षणाचा, कष्टाचा आणि संयमाचा आहे, हेच सत्य आहे."
सध्या युरोपमधील फ्रान्स देशामध्ये वाढती महागाई, खालावत चाललेल्या सार्वजनिक सुविधा आणि राहणीमानाच्या उच्च
खर्चाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांनी अतिशय हिंसक रूप धारण केले आहे. पॅरिससह
अनेक प्रमुख शहरांमध्ये रस्त्यावर उतरलेला जनक्षोभ,
सरकारी व ऐतिहासिक इमारतींची झालेली तोडफोड, वाहनांची जाळपोळ आणि दुकानांची झालेली लूटमार यामुळे तिथले जनजीवन
पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. फ्रान्समधील ही अशांतता आणि अस्थिरता पाहून जगाचे
लक्ष वेधले गेले आहे; परंतु
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, याच युरोपीय
हिंसाचाराचे दाखले देत भारतातील काही राजकीय स्वार्थी घटक आपल्या देशातही अशाच
प्रकारचाण वणवा पेटवण्याचा आणि वातावरण ढवळून काढण्याचा कुटिल डाव रचत आहेत.
फ्रान्समध्ये जे घडले आणि भारत ज्या मार्गाने पुढे जात आहे, या दोन्हींमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. या तथाकथित राजकीय
धुरीणांच्या छुपे मनसुबे आणि भारताची वास्तववादी बाजू समजून घेणे आजच्या काळात
अत्यंत गरजेचे आहे.
फ्रान्समधील या तीव्र असंतोषामागे तिथली ऐतिहासिक आणि तात्कालिक सामाजिक-आर्थिक कारणे आहेत. फ्रान्समध्ये कररचना, उच्च माध्यमिक शाळांमधील अपुऱ्या सुविधा, शिक्षकांची तीव्र कमतरता आणि नागरिकांच्या वेतनातील ठहराव यांमुळे मागील काही काळापासून असंतोष खदखदत होता. तिथली सामाजिक रचना आणि कामगार संघटनांचे सातत्याने चालणारे आक्रमक संघर्ष हा तिथल्या संस्कृतीचा भाग राहिला आहे.
परंतु, याच परिस्थितीची तुलना भारताशी करून इथेही फ्रान्ससारखे हिंसक प्रकार घडवावेत किंवा तसे वातावरण तयार करावे, असा कुत्साळ प्रयत्न काही राजकीय विरोधकांकडून केला जात आहे. फ्रान्समधील समाजव्यवस्था आणि भारताची लोकशाही रचना यामध्ये मूलभूत फरक आहे. भारत हा जगातील सर्वात वेगाने प्रगती करणारा आणि लवचिक अर्थव्यवस्था असलेला देश आहे. भारताची ताकद इथल्या जनतेच्या संवादात, संयमात आणि संवैधानिक मार्गांवर आहे, हिंसेत नाही. बाहेरच्या देशांमधील अशांततेचा आधार घेऊन भारतासारख्या शांतताप्रिय आणि उदयोन्मुख महासत्तेमध्ये अराजकता माजवू पाहाणाऱ्यांनी हे विसरता कामा नये की, भारताची जनता आता पुरेशी प्रगल्भ झाली आहे.
कोणत्याही विकसनशील किंवा विकसित अर्थव्यवस्थेत जागतिक घडामोडींमुळे महागाईत चढ-उतार होत असतात. भारतातही महागाईचे मुद्दे उपस्थित केले जातात, हे खरे आहे. परंतु, एकांगी विचार करून केवळ महागाईचा बभाट माजवणाऱ्यांनी हेही विसरू नये की, जसजशी देशाची अर्थव्यवस्था वाढली, तसतसे लोकांचे उत्पन्न आणि पगारही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आज भारताची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर मजबूत स्थान राखून आहे. आयटी सेक्टर असो, मॅन्युफॅक्चरिंग असो किंवा सेवा क्षेत्र असो, उच्च शिक्षण आणि योग्य कौशल्य असलेल्या तरुणांसाठी रोजगाराच्या आणि भरगोस पगाराच्या संधी आज देशात उपलब्ध आहेत.
केवळ आरडाओरडा करून किंवा फुकटचे राजकारण करून कोणाचेही आयुष्य सुधारत नाही. महागाईवर मात करायची असेल आणि स्वतःचे व कुटुंबाचे जीवनस्तर उंचावायचे असेल, तर त्यासाठी विरोधकांच्या हातचे बाहुले बनून रस्त्यावर येऊन दगडफेक करण्याची नव्हे, तर उत्तम शिक्षण घेऊन मोठे होणे आणि स्वतःची बौद्धिक व व्यावसायिक क्षमता वाढवणे गरजेचे आहे. आजची तरुण पिढी आपल्या कौशल्याच्या बळावर जगभर भारताचा डंका वाजवत आहे, तिथे त्यांना हिंसेच्या मार्गावर लोटण्याचे राजकारण अत्यंत दुर्दैवी आहे.
८०-९० च्या दशकातील कष्ट आणि आजच्या पिढीचे चांगले दिवस
आज जे लोक सत्तेवर किंवा चांगल्या पदांवर आहेत किंवा आजची 'झेन्झी' (Gen Z) आणि
तरुण पिढी जी मोकळ्या वातावरणात श्वास घेत आहे, त्यांनी हे, विसरता
कामा नये की हे दिवस फुकट मिळालेले नाहीत. १९८० आणि १९९० च्या दशकातील भारताची
आर्थिक परिस्थिती अतिशय खडतर होती. त्या काळात आपल्या आई-वडिलांनी, पूर्वजांनी
आणि ज्येष्ठांनी प्रचंड गरिबीत, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि
अपुऱ्या सुविधांमध्ये रक्ताचे पाणी करून दिवस काढले आहेत.
त्या जुन्या पिढीने घेतलेले अपार कष्ट, केलेली बचत, प्रामाणिक श्रम आणि देशउभारणीसाठी दिलेला लढा यामुळेच आज भारताचा पाया मजबूत झाला आहे. याच कष्टांच्या जोरावर आजच्या तरुण पिढीला आधुनिक तंत्रज्ञान, शिक्षण आणि प्रगतीच्या सुवर्णसंधी मिळाल्या आहेत. ज्या पिढीने कष्टाचे महत्त्व जाणले आहे, ती कधीही अशा देशविघातक आणि हिंसक आंदोलनांना थारा देणार नाही.
आजच्या काळात काही राजकीय स्वार्थी घटक आणि विघ्नसंतोषी प्रवृत्ती फ्रान्समधील हिंसक घटनांचे दाखले देऊन भारतातील तरुणांना भडकावण्याचा आणि देशात अशांतता पसरवण्याचा कुटिल प्रयत्न करत आहेत. परंतु, अशा भुलभुलैयामध्ये न अडकता देशाच्या भावी पिढीने आणि विशेषतः तरुण वर्गाने स्वतःच्या भविष्याचा आणि देशाच्या हिताचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणे, जाळपोळ करणे किंवा अराजकता पसरवणे म्हणजे आपला रोष व्यक्त करणे नव्हे, तर याद्वारे तरुण वर्ग अप्रत्यक्षपणे स्वतःचेच आणि आपल्याच देशाचे अतोनात नुकसान करून घेत असतो.
देशाची खरी प्रगती रस्त्यावर दगडफेक करून किंवा दंगली घडवून होत नसते, तर
ती संशोधन, नाविन्यपूर्ण कल्पना (Innovation), उद्योगशीलता आणि
सकारात्मक योगदानामुळे होते. आज भारत जागतिक पातळीवर महासत्तेच्या दिशेने वेगाने
वाटचाल करत आहे. अशा वेळी तरुणांनी आपल्या अमूल्य ऊर्जेचा वापर देशाच्या
उभारणीसाठी केला पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, शिक्षण
आणि उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रात भारताला पुढे नेण्यासाठी युवकांनी आपल्या
कौशल्याची भर घालावी. जेव्हा देशातील तरुण सक्षम आणि आत्मनिर्भर बनतो, तेव्हा
संपूर्ण देश आपोआप प्रगतीपथावर अग्रस्थानी पोहोचतो.
जे लोक स्वतःच्या राजकीय
स्वार्थासाठी तरुणांच्या खांद्यावरून बंदूक चालवू पाहत आहेत आणि देशात अराजकता
माजवू पाहत आहेत, त्यांना तरुणांनी आपल्या प्रगल्भतेने
आणि बुद्धिमत्तेने सडेतोड उत्तर दिले पाहिजे. देशाच्या विरोधात उभे राहणाऱ्या, देशाची संपत्ती नष्ट करणाऱ्या आणि फुटीरतावादी
राजकारण करणाऱ्या शक्तींना ओळखून त्यांच्यापासून दूर राहणे हेच सुजाण नागरिकाचे
कर्तव्य आहे.
सचिन कृष्णा तळे
शब्दांतून विचार I विचारांतून
परिवर्तन

