Wednesday, 28 June 2023

भारत राष्ट्र समितीचे सीमोल्लंघन आणि राजकीय रिंगण

 

भारत राष्ट्र समितीचे सीमोल्लंघन आणि राजकीय रिंगण

 



तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने आगामी महापालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आणि त्याची सुरवात हि नागपूर पासून झाली. महाराष्ट्र हे तेलंगणालगतचे राज्य असल्याने चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात अधिक लक्ष केंद्रित केले आहे. काही महिन्यापूर्वी नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्या सभा झाल्या. राज्यभर चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती चे मोठमोठाले बॅनर लागले आणि त्याची चर्चा सुद्धा झाली. हिंदी आणि मराठीतून तेलंगणाच्या विकासाच्या जाहिराती झळकू लागल्या. इतकंच नाही तर ६०० गाड्यांचा ताफा आणि सोबत मंत्री मंडळ घेऊन चंद्रशेखर राव हे थेट महाराष्ट्राच्या दिशेने सोलापुरातून विठ्ठलाचे दर्शन घेतले. या प्रवासादरम्यान विठ्ठल भेटी अगोदर मटणाचा ताव हा विषय अनेक मीडियातून दाखवला गेला. गेल्या काही महिन्यात जाहिरातीतून भारत राष्ट्र समितीने अफाट पैसा खर्च करून महाराष्ट्रातील जनतेचे आणि नेत्यांचे भुवया उभे केले हे मात्र खरं आहे. महाराष्ट्रातील स्थानिक पक्ष आणि नेते मंडळी हे आपआपसात लढण्यात मग्न आहेत आणि हीच ती वेळ महाराष्ट्रातील जनतेला नवा पर्याय देऊन महाराष्ट्रात सत्तेचं भागेदारी मिळवायची. कदाचित हीच खरी संधी ओळखून तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रातील युवा नेत्यांना नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आता हा पर्याय मराठी नेत्यांना किती डोकेदुखी ठरतीय कि अमराठी लोकांना फायदेशीर हे येणारी वेळ आणि जनतेचं मतच ठरवेल.

कल्वकुंतल चंद्रशेखर राव हे भारताच्या तेलंगणा राज्याचे पहिले विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ते भारत राष्ट्र समिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष असून तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा ह्यासाठी त्यांनी अनेक वर्षे आंदोलन केले होते. चंद्रशेखरराव यांचा जन्म १७ फेब्रुवारी १९५४ ला सिद्दिपेट जवळील चींतमडका या गावी झाला आहे. आणि हे गाव सद्या तेलंगणा राज्यात आहे. त्यांनी उस्मानिया विद्यापीठांतर्गत हैद्राबाद येथुन तेलगु भाषे मधे पदवी प्राप्त केली. शिक्षण नंतर १९८० मध्ये ते संजय गांधी यांच्या नेतृत्वखाली काँग्रेस च्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९८३ मध्ये तेलगू देशम पार्टी मधून काम करत ते १९८७ ला राज्यमंत्री झाले. नंतर त्यांचा राजकीय प्रवास हा उत्तरोत्तर वाढत गेला.

आषाढी वारीचे निमित्त साधून अख्ख्या मंत्रिमंडळासह पंढरपुरात येऊन विठ्ठलाची पूजा करून चंद्रशेखर राव यांनी तुळजापूर येथे जाऊन तुळजाभवानी मातेची पूजा केली. हैदराबादहून मुद्दामहून रस्ते मार्गाने सोलापुरात येताना जागोजागी, गावा-गावांतअब की बार किसान सरकारहा संदेश जाणीवपूर्वक देण्याचा आणि शेतक-यांना आकर्षित करण्याचा त्यांचा हेतू हा सरळ दिसून येतो. तेलंगणात केसीआर यांनी शेतक-यांसाठी आणलेल्या विविध कल्याणकारी योजनाचा प्रचंड बोलबाला आहे. त्याच योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणू अशी घोषणाच जणू प्रत्येक पोस्टरबाजीतून दिसून येते. पंढरपूरची वारी हि एकमेव आहे जिथे राज्यातील अनेक गावांमधून अनेक शेतकरी तसेच कामगार वर्ग चालत येतो. जिथे सर्व महाराष्ट्राची मीडिया हाजीर असते. आणि अश्या ठिकाणी आपण जाऊन पोहचलो तर चर्चा हि होणारचं हे राव याना चांगलंच माहित होत. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शक्तिप्रदर्शन करण्यापेक्षा एकाचं ठिकाणी राजकीय ताकद दाखवण्याचा आणि तेलंगणात मुस्लिम मतांवर विजयी होऊन महाराष्ट्रात शेतकरी मुद्दा पेटवण्याचा एक छुपा राजकीय हेतू पण राव यांचा असू शकतो.

 

महाराष्ट्रात राव यांना सत्ता का हवी ? का ते बॅनर बाजी मधून पैसा खर्च करत आहेत ? ६०० गाड्यांचा ताफा घेऊन शक्तिप्रदर्शन कश्यासाठी कोणासाठी ? देवासाठी तर मुळीच नाही. राव हे मूळ काँग्रेस विचारांचे ते हिंदुत्ववादी विचारांच्या पूर्ण विरोधात त्यामुळे भारतीय जनता पार्टीशी त्यांचे काही साटेलोटे असेल असे हि नाही. एआयएमआयमचे प्रमुख असुदुद्दीन ओवैसी आणि राव यांचे राजकीय संबंध चांगले आहेत. जर राव यांच्या पक्षाला येत्या निवडणुकीत महाराष्ट्रातून चांगले प्रतिसाद मिळाला तर एआयएमआयम ला त्याचा फायदा होऊ शकतो. ‘‘माझा पक्ष छोटा आहे. त्याची भीती महाराष्ट्रातील पक्ष का बाळगत आहेत? काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते आम्हाला भाजपाची बी टीम म्हणतात. दुसरीकडे भाजपने आम्हाला काँग्रेसची ए टीम म्हटले आहे. असे शिक्के मारणे बंद करा,’’ असा खोचक सल्ला राव यांनी पंढरपूर भेटीत दिला. भारत राष्ट्र समिती हा नवीन पक्ष आहे, त्यांची जाहिरातबाजी जोरदार असली तरी तो रुजेल का, वाढेल का, काय स्थिती राहील, याबाबत काहीच अंदाज लावता येऊ शकत नाही. महाराष्ट्रात जाळे विणत असताना राव यांनी प्रथम तेलंगणा-मराठवाडा सीमेवरील नांदेडचा भाग निवडला. पूर्व विदर्भा नंतर महाराष्ट्र-कर्नाटक-तेलंगणा सीमेवर, पश्चिम महाराष्ट्रातील मजबूत साखर पट्टा असलेल्या सोलापूरकडे त्यांनी मोर्चा वळविला. ऊस, ज्वारी, कांद्यासह डाळिंब, द्राक्षे, केळीसाठी ओळख निर्माण झालेल्या सोलापूर जिल्ह्यात शेतीवरील अर्थकारण मोठे आहे. यंत्रमाग उद्योगासाठी तेलंगणा सरकारने दिलेल्या सवलती सोलापूरच्या विणकरांना आकर्षित करू शकतात. पंढरपूर-मंगळवेढा भागातील राष्ट्रवादीचे दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके हे सुध्दा राष्ट्रवादीवर नाराज होऊन केसीआर यांच्या पक्षात सामील झाले आहेत. इतकेच काय तर सोलापुरातील अनेक नेत्यांनी राव ह्यांची भेट घेतली अशी चर्चा सुद्धा आहे. सोलापूरचा पूर्वभाग विणकर तेलुगु समाजाने व्यापलेला आहे. यात झोपडपट्ट्यांमध्ये याहणारे गरीब यंत्रमाग विडी कामगार बहुतांशी याच समाजाचे. तीन लाखांपर्यंत मतदार याच समाजाचे आहेत असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सोलापुरात राव यांच्या पक्षाला चांगला प्रतिसाद मिळू शकतो खात उघडण्यास अडचण सुद्धा येणार नाही.

सोलापूर जिल्ह्याचा विकास हा गेल्या अनेक वर्षांपासून झालेला नाही. ह्या जिल्ह्याला हवं तसं खंबीर नेतृत्व अद्याप मिळालेलं नाही. वाढती बेरोजगारी, पाण्या अभावी बंद पडत चालेले कारखाने, दूषित पाणी आणि त्यातून मिळणार आजारपण, कोरड्या शेती अश्या महत्वपूर्ण प्रश्नांवर राव निवडणूक लढवतील. मेळाव्यात बोलताना राव म्हणाले, महाराष्ट्र हे धनवान राज्य असून येथे पैशाची कमी नाही तर राजकीय लोकांची इच्छाशक्ती कमी आहे. येथील जनतेने संधी दिल्यास तेलंगणमध्ये राबवत असलेल्या योजना आपण महाराष्ट्रामध्येसुद्धा राबवू शकतो. महाराष्ट्रात वीज आणि पाणी यांचा मुबलक साठा आहे. तरीही येथील शेतकऱ्यांना वीज आणि पाणी या सुविधा का मिळत नाही? असा सवाल त्यांनी केला. ह्या त्यांचा प्रश्नाला आपले महाराष्ट्रतील नेते आणि खास करून शरद पवार काय उत्तर देतील हे पाहण्यासारखे आहे. ह्या सर्व घडामोडी आणि राव यांचे दौरे जर मराठी नेत्यानी हलक्यात घेतले तर ते सहज ९ ते १२ आमदार राज्यात निवडून आणू शकतात. भारत राष्ट्र समितीचे हे सीमोल्लंघन ओळखून त्यांनी निर्माण केलेलं हे राजकीय रिंगण आताच तोडले पाहिजे.

 

सचिन कृष्णा तळे

 

 

 

 

 

 

Thursday, 22 June 2023

आम्ही ‘सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष’ राजर्षी शाहू महाराजांचे वारसदार

 

 

आम्हीसर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुषराजर्षी शाहू महाराजांचे वारसदार


 


बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे सुधारणावादी समाजसुधारक, आरक्षणाचे जनक, समतावादी लोकराजे लोककल्याणकारी राजा, अठरा पगड जातीनां एकाच पंगतीत जेवू घालणारा एक महामानव, शेतकरी बांधवांचा खरा बळीराजा, सत्ता, संपत्ती, वैभव सारे हाती असताना जनसेवेसाठी तळमळीने कार्य करणारा दानशूर राजा, माणसातला माणूस जपणारा आणि दुर्बल वंचितांचा आवाज आणि नेत्तृत्व म्हणजेच आपले कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आहेत आणि आपण त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत. २६ जुन हा शाहु महाराजांचा जन्म दिवससामाजिक न्याय दिनम्हणून साजरा करतो. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनीसर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुषअशा शब्दांत त्यांना गौरविलेले आहे.

शाहू महाराजांचा जन्म २६ जून .. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत घाटगे, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. २००५ पर्यंत महाराष्ट्रासह देशभरात राजर्षी शाहू महाराजांचा जन्म दिनांक २६ जुलै म्हणून प्रचलित होता. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२० साली महाराजांना लिहिलेल्या एका पत्रात शाहुजन्म २६ जूनला झाल्याचे लिहिले होते. त्यामुळे शाहू महाराज यांची खरी जन्मतारीख निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने २००५ मध्ये इतिहासतज्ज्ञांनी साहित्यिकांची एक समिती नेमली. संशोधनांती उपलब्ध कागदपत्रांनुसार समितीने १५ जून २००६ रोजी असा निष्कर्ष काढला की छत्रपती शाहू महाराजांची जन्म तारीख २६ जून १८७४ आहे.

कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, 'शाहू' हे नाव ठेवले. सन १८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय १२ वर्षांहून कमी होते. छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू चौथे शाहू अशा विविध नावांनी ते प्रसिद्ध होते. . . १८८५ मध्ये त्यांना शिक्षणासाठी राजकोट येथे पाठविण्यात आले. तेथे त्यांनी चार वर्षे शिक्षण घेतले. त्यानंतर ते कोल्हापूरला परतल्यावर धारवाड येथे शिक्षणासाठी गेले. तेथे सर एस.एम. क्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार, इतिहास, इंग्रजी भाषा इत्यादी विषयांचे शिक्षण घेतले.

इतिहासाने मान्य केले आहे कि, राजा हा कधी जन्माला येत नसतो, तर तो आपल्या कर्तृत्वाने नावलौकिक मिळवतो, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शाहू महाराज होय. महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. शाहू महाराजांनी सरकारी नोकऱ्यांत मागास वर्गांसाठी पन्नास टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेतला, वाघ्या-मुरळी प्रतिबंधक कायदा केला. स्त्री पुनर्विवाह कायदा केला. आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला तसेच त्यांनी स्वतः असे काही विवाह घडवून आणले. कोल्हापूर येथेशाहपूरीही गुळाची बाजारपेठ सुरु केली. शाहूंनी निरनिराळ्या जातीच्या लोकांसाठी वस्तीगृहे सुरु केली. अस्पृश्यांसाठीमिस क्लार्कहे वस्तीगृह स्थापन केले.१५ टक्के शिष्यवृत्तीची घोषणा केली. हातात आलेला राजदंड वापरुन शाहू महाराजांनी सर्व प्रथम वर्णभेदाची उतरंड उध्वस्त केली. शेतकऱ्यांची दुष्काळाच्या दारातून मुक्तता व्हावी यासाठी राधानगरीचे धरण बांधले. कुलकर्णी वतन नष्ट करुन तलाठीपद निर्माण केले, बलुते पध्दती नष्ट केल्या, पुर्वाश्रमीच्या गुन्हेगारांना मुक्त केले त्यांचे कार्य असे होते कि, त्याला मर्यादाच नव्हती. ४८ वर्षांचं आयुष्य मिळालेल्या शाहू महाराजांनी सर्वांसाठी शिक्षण, स्त्रियांच्या हक्कांसाठी कायदे, जातीभेदावर प्रहार, दुष्काळ निवारण, पायाभूत सुविधा, आरोग्य व्यवस्था आणि शेती-उद्योग क्षेत्रात अनेक कल्याणकारी निर्णय घेतले म्ह्णून आज समाजात एकता दिसून येते. ‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठीकिंग एडवर्ड ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूटइत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता.जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद महाराजांनी केली. अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले, तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली.

 महाराष्ट्राच्या राजाच्या गळ्यात कवड्यांची माळ असे म्हणतात. मला ती माळ फार सूचक वाटते. लोकांचा राजा म्हणून ज्याला जगायचे असते. त्याने स्वत:चे जीवन कवडीमोल मानायची तयारी ठेवावी लागते. उपभोगशून्य स्वामी ह्यासारखी सत्ताधीशाला दुसरी बिरुदावली नाही. शाहू महाराजांना ती लाभलेली होती. असे वक्तव्य महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व पु. . देशपांडे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य केले. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली.

 शाहू महाराज हे एक असे पुरुषश्रेष्ठ होते की अनेकांना अनेक रंगात दिसत. क्षेत्र राजकिय असो की सामाजिक, धार्मिक अथवा कुठलेही त्यात महाराजांचे प्राविण्य सहज दिसून यायचेएक पट्टीचा मुत्सद्दी राजकारणी होते शाहू महाराज. ते अनेकांचे आश्रयदाते होते. अश्या ह्या महामानवाचे विचार पुढे घेऊन जात त्यांच्या कार्याची कार्यपद्धत समजून घेत समाजात राज्यात देशात त्यांचा वारसा चालवणे आणि स्वतःलासर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुषराजर्षी शाहू महाराजांचे वारसदार म्हणवणे हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

 

सचिन कृष्णा तळे

Thursday, 15 June 2023

आत्मविश्वास हिच तुमच्या यशाची गुरुकिल्ली

आत्मविश्वास हिच तुमच्या यशाची गुरुकिल्ली



शालेय शिक्षण, महाविद्यालय शिक्षण आणि त्यातून मिळवलेल्या पदव्या तसेच सर्टिफिकेट हे प्रत्येक विद्यार्थी मित्राचं भविष्य घडवण्याचं कार्य करत असतं. ज्ञान मिळवण्याचे साधन म्हणा किंवा इन्स्टिट्यूट आज सहज उपलब्द आहेत. आजच्या युगात इंटरनेट च्या माध्यमातून चांद्यापासून बांद्यापर्यंत तुम्ही कुठे हि ऍडमिशन घेऊन तुमचं शिक्षण पूर्ण करू शकता. अगदी घरबसल्या विदेशातील शिक्षण हि तुम्ही पूर्ण करू शकता. आर्थिक किंवा सामाजिक दुर्बल असाल तरी तुमच्या मदतीला अनेक संस्था तसेच अनेक सरकारी योजना आहेत. शाहू फुले आंबडेकर तसेच अनेक समाजसुधारक यांनी आर्थिक वंचितांसाठी शिक्षणाचे द्वार खुले केले आहे. शिक्षणाचं महत्व किती आहे, हे ज्यांनी शिक्षण केलं नाही त्यांना विचारा. पण योग्य वेळी योग्य ज्ञान योग्य शिक्षण घेतलं ते हि स्वतःची आवड पाहून तर भविष्य हे सोन्याहून पिवळं.

काही दिवसांपूर्वी अनेकांचे निकाल लागले. निकाल लागला कि पहिला चिंता पालकांना पडते ती म्हणजे... "आता पुढे काय?" कश्यात ऍडमिशन घेयचं, कोणत्या फिल्ड मध्ये मुलाला टाकायचं, कोणता कोर्स लावायचा वैगैरे वैगैरे अश्या अनेक प्रश्नांनी त्यांचा गोंधळ उडतो कारण त्यांना काळजी असते ती त्यांच्या मुलाच्या करियर ची उज्वल भविष्याची. आणि ह्या काळजीपोटी पालक भेटेल त्यांना माहिती विचारत फिरताना दिसतात. ज्यांना योग्य मार्गदर्शन मिळत ते योग्य रीतीने पुढे जातात. पण ज्यांना माहितीचं नसते ते मार्क च्या नुसार ऍडमिशन घेतात पदवी घेतात आणि करियर घडवण्यासाठी धडपड करतात. हि वस्तुस्तिथी आहे. दहावी उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांच्यासमोर सर्वात जास्त प्रश्न उभा राहतो की, त्यानंतर विज्ञान , वाणिज्य आणि कला या तीनपैकी कोणत्या शाखेला प्रवेश घ्यायचा. योग्य प्रवाहाच्या निवडीमागे कोणता प्रवाह इतरांपेक्षा चांगला आहे हे ठरवणे अनेकदा विद्यार्थ्यांना पालकांना अवघड जाते. आपल्या आवडीनुसार करियर निवडणे शक्य नसते. अश्या परिस्तिथीत खूपवेळा आपण लोकांचं ऐकतो त्यांना प्राधान्य देतो. अनेकवेळा निर्णय चुकला असं हि वाटतं. आपली आवड असते एका गोष्टीत आणि आपण शिकतो भलतंच.

आपण कृती केली आपण हालचाल केली तरचं आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळत. अन्यथा आपण मित्र ह्या महाविद्यालयात ऍडमिशन घेतोय, ह्या शाखेत तो शिक्षण घेणार आहे म्हणून आपण हि तेच करत बसलो तर हा मार्ग चुकीचा ठरेल. विवेकानंदांच्या आयुष्यातील एक छानसा प्रसंग इथे सांगावासा वाटतोय. स्वामी विवेकानंद हे एकदा कलकत्त्याला गेले होते. सकाळची पूजा आराधना आटपून ते कालिमाताच्या दर्शनाला निघाले. सकाळ अजून उजाडलेली नव्हती. एकटेच ते रस्त्याने चालू लागले. काही अंतर चालता चालता त्यांना एका वळणावर ३ रस्ते लागले. ह्या ३ रस्त्यांपैकी कालिमाताच्या मंदिराकडे नक्की जाणारा रास्ता कोणता हा प्रश्न त्यांच्या समोर पडला होता. दिवस उजाडला नव्हता आणि रस्त्यावर कोणतेही फलक नव्हतं. सोबत सेवेकरी सुद्धा नव्हते आणि वरदळ पण नव्हती. कुठल्यातरी भलत्याच दिशेला भरकटण्यापेक्षा कोणाला तरी विचारून पाहावं म्ह्णून ते आजूबाजूला पाहू लागतात.

एका रस्त्याच्या फुटपाथवर रंगीत खडूने चित्र काढणारा एक चित्रकार बसला होता. स्वामींची नजर त्या माणसाकडे जाते. ते त्या माणसाला हाक देतात पण तो काहीच उत्तर देत नाही. दुसऱयांदा आवज देतात पण त्या माणसाकडून काहीच उत्तर येत नाही. पुन्हा त्याला मार्ग विचारतात पण तो काहीच बोलत नाही. स्वामी विविएकानंदांना वाटतं हा माणूस बहिरा आणि मुका असावा. म्हणून स्वामी त्या माणसाकडे दुर्लक्ष्य करून एक मार्ग निवडून त्या मार्गाने चालू लागतात. इतक्यात तो चित्रकार माणूस स्वामींच्या पाठी पळत येतो आणि त्यांना मार्ग दाखवतो. त्याच्या ह्या वागण्यावर स्वामी क्षणभर चकित होतात. इतक्या वेळ मी ह्या माणसाला विचारत होतो तर त्याने एकही शब्दाने उत्तर दिले नाही. उलट त्यालाच हा प्रश्न विचारतात. त्यावर तो माणूस स्वामींना म्हणतो ...

स्वामी माफ करा मी तुम्हाला ओळखलं होत. तुम्हाला मी वाट दाखवणार होतो पण म्हंटल तुमचीच आज छोटीशी परीक्षा घ्यावी. तुम्ही जो रास्ता निवडला आहे तो योग्य आहे. इथूनच पुढे काही अंतरावर कालिमाताच मंदिर आहे. तेव्हा स्वामी म्हणतात "मग इतक्या वेळ मी तुला विचारलं तर तू मला काहीच उत्तर का बरं दिल नाही" तो तो माणूस स्वामींना म्हणाला " स्वामी तुम्हाला कुठे जायचं आहे ह्याची कल्पना मला तुम्हाला पाहताच आली होती. पण तुम्ही त्या चौकात जिथून ३ रास्ता चालू होतो तिथे थांबलात. अश्यावेळी तुम्ही जर कृती केली असती आणि मनाला वाटेल त्या रस्त्याने निघाला असता आणि ती वाट जर चुकीची असती तर नक्कीच मी तुम्हाला मार्ग दाखवला असता. तुम्ही थांबलात आणि कोणतीही कृती न करता तुम्ही माझी मदत घेण्याचा विचार केला. पण पहा तुमच्या आत्मविश्वासाने तुम्हाला योग्य मार्ग दाखवलं व तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करू लागलात."

ह्या गोष्टीवरून तुम्हाला कळालं असेलच कि, तुम्हाला कोणीतरी येऊन मार्गदर्शन करेल तुम्हाला मार्ग दाखवेल ह्याची वाट न पाहता तुम्ही कार्य करा कृती करा स्वतःच्या आत्मविश्वसाने वाटचाल चाला आणि पहा मार्ग सहज मिळेल. कोणीतरी त्या वाटेने चालाय हे न पाहता आपण कोणत्या वाटेने गेलं पाहिजे ह्यावर विश्वास ठेवा यश नक्कीच मिळेल. मार्ग सांगणारे चुकीचा हि सांगतात आणि काही बरोबर पण सांगतात. ज्यांना मार्ग माहीतच नाही त्यांना तुम्ही मार्ग विचारला तर ते तुमची फक्त दिशाभूल करू शकतात. आणि काही लोक अशी हि असतात जी तुमचा मार्ग पाहून तुम्हाला मदत करायला धावून येतात. तुमचं आत्मविश्वास हिच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे.

 -सचिन कृष्णा तळे 

Thursday, 8 June 2023

मा. मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश नरसिंह चिवटे -यांचे शुभेच्छा पत्र



 मराठी साहित्यात मोलाची भर टाकणाऱ्या "दरवळ : मराठी साहित्य संस्थांचा" या पुस्तकाबद्दल लेखक सचिन तळे आणि वल्लरी प्रकाशनचे व्यंकटेश कल्याणकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा !


या पुस्तकातून मराठीसाठी तळमळीने काम करणाऱ्या जवळपास सर्व संस्थांची तसेच मराठीमध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या अनोख्या साहित्य संमेलनाची माहिती समाविष्ट केली आहे. मराठीमध्ये आपल्या भोवती केवढी मोठी चळवळ सुरु आहे, हे प्रस्तूत पुस्तक वाचल्यावर लक्ष्यात येते. मराठी भाषेचा प्रचार - प्रसार करणाऱ्या चळवळीला हे पुस्तक व्यापक करणारे ठरेल असे मला वाटते 


पुनश्च एकदा लेखक सचिन तळे आणि वल्लरी प्रकाशन चे अभिनंदन आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा !


मंगेश नरसिंह चिवटे 

मा. मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी 

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale