Thursday, 5 May 2022

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ

 

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ

 


बालभारती हे नाव महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला माहित आहे. बालभारती म्हणजे अनेक मराठी वाचकांचं बालपण. बालभारती ही राज्यशासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेली स्वायत्त संस्था आहे. ह्या मंडळाच्या स्थापनेपूर्वी शाळांमध्ये खाजगी प्रकाशकांची पुस्तके वापरली जात होती. या पुस्तकाचा दर्जा, किंमती मधील तफावत आणि त्यांची उपलब्धता पाहता विद्यार्थी अन शाळेची गैरसोय होऊ नये यासाठी कोठारी आयोगाने राज्याकडे स्वायत्त संस्था निर्माण करावी अशी शिफारस केली. कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक सरकारने २७ जानेवारी १९६७ला महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे या संस्थेची स्थापना केली. हीच संस्था बालभारती या नावाने ओळखली जाते.

विद्याविभाग, सामान्य प्रशासन विभाग, वितरण विभाग, वित्त विभाग, अंतर्गत-लेखापरिक्षण विभाग, निर्मिती विभाग, संशोधन विभाग, ग्रंथालय विभाग, किशोर विभाग असे मंडळाचे एकूण नऊ विभाग आहेत. मंडळाची मुख्य उद्दिष्टे हे शालोपयोगी पाठ्यपुस्तके, शिक्षकांकरिता हस्तपुस्तके विद्यार्थ्यांसाठी व्यवसायपुस्तके तसेच शिक्षणविषयक इतर साहित्य तयार करणे असून शिक्षणाच्या सर्वसाधारण दर्जामध्ये सुधारणा व्हावी या हेतूने अभ्यासक्रम पाठ्यक्रम तयार करणे, प्राथमिक माध्यमिक शिक्षण आणि शिक्षणाच्या इतर शाखा यांतील अभ्यासक्रम पाठ्यक्रम यांच्यात सुधारणा करणे आहे. कार्यकारी समिती, वित्त समिती, विद्यापरिषद,  संशोधनसल्लागार परिषद निर्मिती वितरण परिषद अश्या समित्यांमार्फत मंडळाचे व्यवस्थापन चालते. अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी भाषा विषयांच्या एकूण सात समित्या आहेत मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, सिंधी आणि इंग्रजी. पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीबरोबरच मंडळाने इयत्ता ते पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्फूर्तिगीतांचे एक पुस्तक तयार करून ते प्रसिद्ध केले आहे.

१४ नोव्हेंबर, इ. स. १९७१ पासून आठ ते १४ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी किशोर हे मासिक मंडळाने सुरू केले आहे . मंडळाचे मुख्य कार्यालय पुणे येथील ‘ बालभारती ’ नामक इमारतीत असून निर्मिती विभाग वरळी (मुंबई) येथे आहे. यांशिवाय पुणे, नागपूर, मुंबई (गोरेगाव) व औरंगाबाद या चार ठिकाणी मंडळाची पाठ्यपुस्तक-भांडारे व वितरण केंद्रे आहेत. राष्ट्रीय प्रौढशिक्षणासाठी जी पाठ्यपुस्तके, पूरक साहित्य आणि अध्यापन साहित्य तयार करते, त्यांची छपाई, निर्मिती आणि वितरण यांचे काम पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ ह्यांच्या कडे आहे. राज्याचे शिक्षणमंत्री शिक्षण संचालक हे मंडळाचे अनुक्रमे पदसिद्ध अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत.


सचिन कृष्णा तळे 

1 comment:

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale