Wednesday, 3 June 2026

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!”

ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale




Monday, 1 June 2026

माणसावर येणारी संकटं त्याची 'लायकी' ठरवतात!

 "मातीवर पडणारे घाव तिचा आकार ठरवतात, आणि माणसावर येणारी संकटं त्याची 'लायकी' ठरवतात!" -सचिन तळे Sachin Tale




Wednesday, 27 May 2026

तीच माणसं माझ्या वेळेला मात्र पाठीशी उभी राहिली नाहीत!


वाईट तेव्हाच वाटतं,

ज्या माणसांसाठी मी नेहमी वेळ काढला;

तीच माणसं माझ्या वेळेला मात्र पाठीशी उभी राहिली नाहीत!

- सचिन तळे 




Tuesday, 26 May 2026

वाकड्यातही राहायला शिकलं पाहिजे!

म्हणूनच, कधीकधी
वाकड्यातही राहायला शिकलं पाहिजे!

-सचिन तळे


Thursday, 7 May 2026

फाळणीनंतरची दोन चित्रं — तिकडे भग्न मंदिरं, इकडे जपलेली दर्गे आणि मशिदी… विचार करायला लावणारा इतिहास

फाळणीनंतरची दोन चित्रं — तिकडे भग्न मंदिरं, इकडे जपलेली दर्गे आणि मशिदी… विचार करायला लावणारा इतिहास


पाकिस्तानातील मुल्तानमध्ये आजही उभा असलेला तो भग्न खांब… ज्याच्याबद्दल श्रद्धा आहे की त्या खांबातून भगवान श्रीनृसिंह प्रकट झाले होते…तो खांब पाहताना प्रत्येक हिंदूच्या मनात वेदना निर्माण होते. कारण तो फक्त एक दगडी स्तंभ नाही… तो आपल्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि हजारो वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार आहे.




आज त्या जागेभोवती ना भव्य मंदिर आहे, ना आरत्या, ना घंटानाद… उरल्या आहेत फक्त तुटलेल्या भिंती, भग्न अवशेष आणि इतिहासाच्या जखमा.

पुण्यातील सदाशिव पेठेतील जोशी कुटुंबातील श्री अनंत जोशी यांनी २००४ मध्ये पाकिस्तानात जाऊन त्या पवित्र स्थळाचं दर्शन घेतलं. त्यांनी आणलेला हा फोटो म्हणजे इतिहासाचं जिवंत स्मारकच आहे. जिथे भक्ती होती, तिथे आज शांतता आहे. जिथे हजारो दिवे लावले जात होते, तिथे आज ओसाडपणा आहे.



मुल्तान…

जे एकेकाळी “मूलस्थान” म्हणून ओळखलं जायचं.

सूर्योपासनेचं जागतिक केंद्र. असं म्हणतात की मुल्तानचं सूर्य मंदिर इतकं संपन्न होतं की त्याची तुलना आजच्या तिरुपती किंवा पद्मनाभ स्वामी मंदिराशी केली जात असे.

पण फाळणी झाली…

सीमा आखल्या गेल्या… आणि त्या सीमांसोबत लाखो हिंदूंच्या आठवणी, देवस्थानं आणि संस्कृतीही तुटली.

आज पाकिस्तानात असंख्य हिंदू मंदिरं उद्ध्वस्त अवस्थेत आहेत.काहींवर अतिक्रमण झालं, काही गोदामं झाली, काहींचं अस्तित्वच मिटवलं गेलं. तिथे उरलेले हिंदू आपल्या श्रद्धा लपवत जगतात.

आणि दुसरीकडे भारताकडे पाहा…

इथे अजूनही मशिदी सुरक्षित आहेत.

दर्ग्यांवर चादरी चढवल्या जातात.

अजान दिली जाते.

सरकार निधी देते.

कायद्याने संरक्षण दिलं जातं.

भारताने आपल्या संस्कृतीसोबतच इतर धर्मांचाही आदर केला.

कारण भारताचा आत्मा सहिष्णुतेत आहे.

पण प्रश्न हा आहे की .. ही सहिष्णुता एकतर्फीच का दिसते?

फाळणीनंतर भारतात राहिलेल्या मुस्लिम समाजाला संविधानाने अधिकार दिले, सुरक्षा दिली, स्वातंत्र्य दिलं. पण पाकिस्तानात राहिलेल्या हिंदूंना काय मिळालं?

तुटलेली मंदिरं?

भीती?

आणि संपत चाललेली ओळख?

हा लेख द्वेषासाठी नाही… तर स्मरणासाठी आहे.

आपण आपल्या इतिहासाबद्दल बोललं पाहिजे. आपल्या भग्न देवस्थानांबद्दल बोललं पाहिजे. कारण जी संस्कृती स्वतःचा इतिहास विसरते, ती हळूहळू स्वतःचं अस्तित्व हरवते.

आज गरज आहे ती जागृतीची. आपल्या मंदिरांचं, परंपरांचं, इतिहासाचं आणि संस्कृतीचं जतन करण्याची.

कारण मंदिरं ही फक्त पूजा करण्याची जागा नसतात…

ती आपल्या सभ्यतेची ओळख असतात.

मुल्तानचा तो भग्न खांब आजही जणू ओरडून सांगतो आहे .

“संस्कृती जिवंत ठेवायची असेल, तर इतिहास विसरू नका…!”




- सचिन कृष्णा तळे , पुणे 


Saturday, 2 May 2026

मातृत्वाला सलाम — अंगावर काटा आणणारी कहाणी

 मातृत्वाला सलाम — अंगावर काटा आणणारी कहाणी



काही क्षण असे असतात, जे शब्दांत मावत नाहीत… ते फक्त मनात कोरले जातात. त्या दिवशीचा तो प्रसंग तसाच होता. आभाळ काळवंडलं होतं. वारा अचानक वेड्यासारखा सुटला होता. नदीचं पाणी हळूहळू चढत होतं… आणि एका छोट्याशा बोटीत जीव मुठीत धरून बसलेले लोक भीतीने थरथरत होते.

सुरुवातीला सगळं सामान्य होतं. पण काही वेळातच परिस्थितीने भीषण रूप घेतलं. बोट हलायला लागली… पाण्याचे तुषार आत येऊ लागले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न आता काय होणार? कुठेच किनारा दिसत नव्हता. दूरवर दुसरी बोटही नव्हती. मदतीची कोणतीही चिन्हं नव्हती.

तेवढ्यात लक्षात आलं सुरक्षा जॅकेट कमी आहेत. कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही? हा निर्णयही मृत्यूसारखाच कठीण होता. अशा वेळी प्रत्येकजण स्वतःचा जीव वाचवण्याचा विचार करतो… पण ती एक आई होती.

त्या माऊलीने शांतपणे एक जॅकेट उचललं… आणि स्वतः घातलं. तिच्या डोळ्यांत भीती होती, पण त्याहून मोठं काहीतरी होतं आपल्या लेकराला वाचवण्याची जिद्द. तिने आपल्या मुलाला घट्ट पोटाशी धरलं. त्या क्षणी ती फक्त आई नव्हती… ती शौर्याची मूर्ती झाली होती. जणू एखादी रणरागिणीच!

बोट आता पूर्णपणे पाण्यात झुकत चालली होती. पाणी कंबरभर आलं होतं. प्रत्येक लाटेसोबत मृत्यू जवळ येत होता. लोक ओरडत होते, मदतीसाठी हाका मारत होते… पण त्या आईचा सगळा संसार त्या छोट्या लेकरात सामावलेला होता.

तिने आपल्या मुलाला एवढ्या घट्ट पकडलं होतं की जणू ती स्वतःच त्याचं कवच झाली होती. हात सुटू नयेत म्हणून तिने पूर्ण ताकद लावली. कारण तिला माहीत होतं एक क्षण जरी हात सुटला, तरी तिचं सगळं जग हरवेल.

पाणी वाढतच गेलं… श्वास घ्यायला त्रास होऊ लागला… आणि अखेर तो क्षण आला.

दोघंही त्या अथांग पाण्यात विलीन झाले…

पण शेवटच्या क्षणापर्यंत त्या आईने आपल्या मुलाला सोडलं नाही.

हा फक्त एक प्रसंग नाही… ही मातृत्वाची पराकाष्ठा आहे. स्वतःचा जीव गेला तरी चालेल, पण लेकराचा हात सुटू नये हीच खरी आई. त्या क्षणी तिने मृत्यूला हरवलं… कारण तिचं प्रेम अमर झालं.

अंगावर काटा आणणारी ही घटना आपल्याला एक गोष्ट शिकवते 

आईचं प्रेम हे शब्दांपलीकडचं असतं… ते शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत राहतं.

अशा त्या माऊलीला… मनापासून सलाम. 🙏

सचिन कृष्णा तळे , पुणे 

Saturday, 25 April 2026

“अंधश्रद्धेच्या सावलीत हरवलेला विश्वास – जाग होणं आता गरजेचं!”

“अंधश्रद्धेच्या सावलीत हरवलेला विश्वास – जाग होणं आता गरजेचं!”



आज आपल्या समाजात एक मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. विश्वास ठेवायचा तरी कोणावर? श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील रेषा इतकी पुसट झाली आहे की अनेकदा सामान्य माणूसच गोंधळून जातो. देवावरचा विश्वास ही आपली परंपरा आहे, आपली ताकद आहे; पण त्याच विश्वासाचा गैरफायदा घेणारे काही लोक समाजात निर्माण झाले आहेत, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.


गेल्या काही दिवसांत स्वतःला संत बाळू मामा असल्याचं भासवून लोकांची फसवणूक करणाऱ्या “मनोहर मामा”सारख्या घटना समोर आल्या. अशा घटना केवळ आर्थिक फसवणूक करत नाहीत, तर त्या आपल्या श्रद्धेलाच हादरा देतात. कारण ज्या ठिकाणी आपण नतमस्तक होतो, तिथेच आपली फसवणूक होत असेल, तर विश्वास कुठे ठेवायचा?


आपल्या धर्मग्रंथांमध्ये देवाचे अवतार हे विशिष्ट काळात आणि विशिष्ट कारणासाठी झालेले आहेत, असे स्पष्ट सांगितले आहे.  भगवतगीता असो किंवा रामायण-महाभारत, त्यात अवतारांची संकल्पना आहे, पण ती काही रोजच्या आयुष्यात कुणीही दावा करेल अशी नाही. आजच्या काळात कुणी स्वतःला देवाचा अवतार म्हणत असेल, तर त्याकडे डोळसपणे पाहणं आवश्यक आहे.


आपल्या समाजात श्रद्धा आहे, पण त्याचसोबत विवेकही असायला हवा. संत परंपरेने आपल्याला नेहमीच विचार करण्याची, सत्य शोधण्याची शिकवण दिली आहे. खरे संत कधीच स्वतःला देवाचा अवतार म्हणवत नाहीत; ते फक्त मार्गदर्शन करतात, लोकांना योग्य वाट दाखवतात. पण जे स्वतःचीच स्तुती करतात, चमत्कारांच्या गोष्टी सांगतात, आणि लोकांना भीती किंवा लोभ दाखवून आकर्षित करतात त्यांच्यापासून सावध राहणं गरजेचं आहे.


आज सोशल मीडियामुळे अशा गोष्टी अधिक वेगाने पसरतात. एक व्हिडिओ, एक पोस्ट आणि हजारो लोक त्यावर विश्वास ठेवतात. पण त्या मागचं सत्य तपासण्याची गरज आपण अनेकदा विसरतो. हीच गोष्ट फसवणूक करणाऱ्यांसाठी सोपी बनते.


म्हणूनच, आजची खरी गरज आहे ती जागरूकतेची. श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा टाळा. देवावर विश्वास ठेवा, पण माणसांच्या खोट्या दाव्यांवर नाही. प्रश्न विचारा, विचार करा, आणि सत्य शोधा.


शेवटी एकच

विश्वास हा अंधपणे ठेवायचा नसतो, तो विचारपूर्वक ठेवायचा असतो.

आणि जेव्हा समाज जागा होतो, तेव्हा फसवणूक करणाऱ्यांना आपोआपच थारा राहत नाही.

@ सचिन कृष्णा तळे 


Sunday, 12 April 2026

Asha Bhosle -मृत्यू हे सत्य असलं, तरी... माणूस जातो, पण त्याचा 'प्राण' त्याच्या कलेत उरतो.

 🕊️ एका सुवर्णयुगाचा प्रवास... पण सूर अजूनही सोबतीला आहेत “शब्द विरले तरी सूर उरतात..."

आज केवळ एक महान गायिका आपल्यातून गेली नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक आठवणींचा एक कप्पा रिकामा झाला आहे. आशाताई भोसले म्हणजे फक्त एक 'सिंगर' नव्हत्या; त्या होत्या आपल्या आयुष्यातील प्रत्येक वळणावरचा एक साक्षीदार.

🎤 त्या आवाजाची जादू काय होती?

• सीमोल्लंघन: त्यांनी केवळ भाषेच्या किंवा सरहद्दीच्या सीमा ओलांडल्या नाहीत, तर शास्त्रीय संगीतापासून ते थेट पॉप आणि कॅब्रेपर्यंतच्या शैलींना आपल्या आवाजाने समृद्ध केलं.

• भावनांचे रंग: जेव्हा आपल्याला प्रेम व्यक्त करायचं होतं, तेव्हा त्यांचा स्वर हळवा झाला. जेव्हा विरहाचं दुःख होतं, तेव्हा त्यांच्या आवाजाने आपल्याला साथ दिली. आणि जेव्हा आयुष्याचा उत्सव साजरा करायचा होता, तेव्हा त्यांच्यातील 'नॉटी' आणि ऊर्जावान स्वराने आपल्याला थिरकायला लावलं.

• पिढ्यांचे नाते: आजी-आजोबांच्या रेडिओपासून ते आजच्या पिढीच्या प्लेलिस्टपर्यंत, आशाताईंचा आवाज कधीच 'जुना' झाला नाही. तो नेहमीच 'समकालीन' राहिला.

✨ मृत्यू हे सत्य असलं, तरी... माणूस जातो, पण त्याचा 'प्राण' त्याच्या कलेत उरतो. 


आशाताईंच्या बाबतीतही असंच आहे. शरीर शांत झालं असलं, तरी त्यांचा स्वर या विश्वाच्या पोकळीत कायम घुमत राहील. तो कधीही न संपणारा, कधीही न विझणारा असा एक दैवी प्रकाश आहे.

सुरांच्या या अद्वितीय साम्राज्ञीला, आपल्या लाडक्या आशाताईंना मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🎶

सचिन कृष्णा तळे

@highlight

Wednesday, 8 April 2026

काही वारसे हे सोन्या-नाण्यांमध्ये मोजता येत नाहीत,

ते आपल्या संस्कारांत आणि माणुसकीत दिसतात



सचिन कृष्णा तळे

Tuesday, 24 March 2026

ब्लॅक टायगरची वेदना… आणि काँग्रेस सरकारचं ‘नाकारणारं पान’

 

ब्लॅक टायगरची वेदना… आणि काँग्रेस सरकारचं ‘नाकारणारं पान’

भारताच्या गुप्तहेर इतिहासात रविंद्र कौशिक हे नाव अत्यंत धाडसी, पण तितकंच वेदनादायी आहे. “ब्लॅक टायगर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गुप्तहेराने देशासाठी आपलं आयुष्य अक्षरशः झोकून दिलं. परंतु जेव्हा त्याला मदतीची गरज होती, तेव्हा त्याच्याच देशाने विशेषतः त्या काळातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सरकारने त्याच्याकडे पाठ फिरवल्याची भावना अनेकांच्या मनात आजही आहे.

देशासाठी सर्वस्व अर्पण

राजस्थानातील एका सामान्य कुटुंबातून आलेल्या रविंद्र कौशिक यांना Research and Analysis Wing (RAW) ने गुप्तहेर म्हणून तयार केलं. त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन आपली ओळख बदलली, सैन्यात उच्च पदावर पोहोचले आणि भारतासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती पुरवली. अनेक युद्धपरिस्थितींमध्ये त्यांच्या माहितीमुळे भारताला मोठा फायदा झाला.

पकड… आणि एकाकीपण

परंतु १९८३ मध्ये त्यांची ओळख उघड झाली आणि ते पाकिस्तानमध्ये पकडले गेले. त्यानंतर त्यांना दीर्घकाळ तुरुंगात अमानुष छळ सहन करावा लागला. याच काळात त्यांनी भारत सरकारकडे, विशेषतः त्या वेळी सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारकडे मदतीची अपेक्षा ठेवली.

मदतीची आर्त हाक

तुरुंगातून त्यांनी अनेक पत्रं भारतात पाठवली. त्या पत्रांत त्यांनी स्पष्टपणे लिहिलं होतं की  “जर मी अमेरिकन असतो, तर मला तीन दिवसांत बाहेर काढलं गेलं असतं.”

ही ओळ त्यांच्या वेदनेची साक्ष देते. त्यांनी देशासाठी केलेल्या त्यागाच्या बदल्यात किमान मानवी सहानुभूती आणि मदत मिळावी, ही त्यांची अपेक्षा होती.

काँग्रेस सरकारचं मौन

त्या काळात भारतात इंदिरा गांधी आणि नंतर राजीव गांधी यांचं नेतृत्व होतं. पण अधिकृतरीत्या भारत सरकारने रविंद्र कौशिक यांना आपला गुप्तहेर मान्य केलं नाही. हे गुप्तहेर धोरणाचा भाग असू शकतं, परंतु मानवी दृष्टिकोनातून हे एक कठोर आणि वेदनादायी पाऊल मानलं जातं.

सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा दबाव आणला नाही किंवा त्यांची सुटका करण्यासाठी ठोस प्रयत्न दिसून आले नाहीत, अशी टीका वारंवार केली जाते.

‘नाकारणारं पान’ का?

काँग्रेस सरकारवर आरोप केला जातो की त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली एका वीराला विसरलं. गुप्तहेर म्हणून त्यांची ओळख मान्य केली असती, तर राजनैतिक अडचणी निर्माण झाल्या असत्या पण त्यामुळे एका व्यक्तीचं आयुष्य अंधारात गेलं.

हीच ती गोष्ट आहे जी या प्रकरणाला “काँग्रेसचं नाकारतं पान” बनवते.

शेवट… जो अस्वस्थ करतो

रविंद्र कौशिक यांनी २००१ मध्ये पाकिस्तानच्या तुरुंगातच प्राण सोडले. देशासाठी सर्वस्व दिलेल्या या वीराला त्याच्या मातृभूमीत शेवटचा श्वासही घेता आला नाही, ही गोष्ट आजही अनेकांना अस्वस्थ करते

रविंद्र कौशिक यांची कथा ही केवळ एका गुप्तहेराची नाही, तर ती देशभक्ती, त्याग आणि राजकीय मर्यादांमधील संघर्षाची आहे. काँग्रेस सरकारवर टीका होणं स्वाभाविक आहे, पण याचबरोबर ही घटना आपल्याला एक मोठा प्रश्न विचारते 

सचिन कृष्णा तळे

आहे ते आहे


Sunday, 22 March 2026

जनार्दनांच्या चरणी शांतिगिरी

 जनार्दनांच्या चरणी शांतिगिरी



स्वामी जनार्दन चरणी शांतिगिरी महाराज भक्तीगीत | Sachin Tale | Janaradan Charani Shantigiri 

https://youtu.be/3ZNGe_E3j6w?si=H5-CTl8F4O6eE622

https://youtu.be/3ZNGe_E3j6w?si=H5-CTl8F4O6eE622


ध्रुवपद:

जनार्दनांच्या चरणी शांतिगिरी नतमस्तक

गुरुकृपेच्या छायेत झाले जीवन पावन अन पवित्र


चरण १:

लाखलगावच्या पावन मातीत जन्म घेतला संताने

संस्कारांच्या दीपप्रकाशात उजळले जीवन पुण्याने

नशिबी आला बालपणीच अंधाराचा फेरा

त्र्यंबकेश्वरी गुरूंनी दाविला ईश्वरी दिव्य किनारा


चरण २:

खडे उचलता दृष्टी लाभली कृपा गुरूंची न्यारी

समर्पिले मग प्राण आपुले जनार्दनांच्या द्वारी

मोहपाश अन् संसार त्यागून स्वीकारले वैराग्य

गुरुआज्ञेच्या वाटेवरती लाभले थोर भाग्य


चरण ३:

नऊ वर्षे त्या मौनव्रताचे तपाचरण अन् साधन

शब्दाविण त्या शांततेतून उमलले ज्ञान प्रांगण

पुण्यस्मरण सोहळ्याने भक्तीची ज्योत जागविली

विश्वशांतीची हाक देऊन मने मानवा जोडली


चरण ४:

अनुष्ठान गोसेवा श्रमदान हीच पंचपरंपरा

सत्यधर्माचा दाखविला या जगाला मार्ग खरा

व्यसनमुक्तीचा दीप लावून लाखो जीव सावरले

सत्संगाच्या अमृतधारा घराघरांत पाझरले


चरण ५:

भगवे वस्त्र पायी खडावा साधेपणाची मूर्ती

जप ध्यान अन् उपवासाने चहूकडे पसरली कीर्ती

गुरुपौर्णिमेच्या महापर्वावर भक्तीचा सागर उचंबळे

शांतिगिरींच्या आशीर्वादाने भाग्याचे कमळ उमले


चरण ६:

कुंभमेळ्यात सेवा घडली अन्नाचे हे दान दिले

यज्ञयागातून बळीराजाच्या सुखाचे मेघ वर्षले

संकटकाळी माणुसकीचा सदा दिला आधार

अशा संतांच्या चरणी वंदावे वारंवार


कोरस:

जय जनार्दन स्वामी, सेवा घडो निरंतर

जय जनार्दन स्वामी, सेवा घडो निरंतर

जय जनार्दन स्वामी, सेवा घडो निरंतर

जय जनार्दन स्वामी, सेवा घडो निरंतर

जय जनार्दन!


सचिन कृष्णा तळे , पुणे 




Thursday, 19 March 2026

“ओळख, इतिहास आणि भविष्य — राज ठाकरे यांच्या भाषणातून तरुणांना दिलेला जागर”

 “ओळख, इतिहास आणि भविष्य — राज ठाकरे यांच्या भाषणातून तरुणांना दिलेला जागर”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray यांनी आजच्या भाषणातून एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा मांडला. त्यांनी महाराष्ट्र घडवणाऱ्या, या भूमीला जागतिक पातळीवर नेणाऱ्या महान व्यक्तींची यादी वाचून दाखवली आणि ही केवळ नावांची यादी नव्हती, तर ती आपल्या इतिहासाची, आपल्या ओळखीची आठवण होती.




आजच्या पिढीसाठी, विशेषतः “Gen Z” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुणांसाठी, ही नावं कदाचित नवीन असतील किंवा फक्त पुस्तकात वाचलेली असतील. पण ९० च्या दशकापासून २०२६ पर्यंतचा प्रवास पाहिलेल्या पिढीसाठी ही नावं म्हणजे प्रेरणेचा जिवंत स्रोत आहेत. या व्यक्तींनी केवळ यश मिळवलं नाही, तर स्वतःचा इतिहास घडवला आणि तो इतिहास महाराष्ट्राच्या मातीशी घट्ट जोडलेला आहे.

राज ठाकरे यांच्या भाषणाचा गाभा हा होता की, पुढच्या पिढीने या कर्तृत्वाची जाणीव ठेवली पाहिजे. “सलाम” करणं सोपं आहे, पण त्या कर्तृत्वामागची मेहनत, संघर्ष आणि मूल्य समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. हाच संदेश त्यांनी अत्यंत ठामपणे मांडला.

आजचं युग सोशल मीडियाचं आहे. माहितीचा स्फोट झालेला आहे, पण त्याचबरोबर दिशाभूल होण्याची शक्यता देखील वाढलेली आहे. अशा काळात तरुण पिढी भरकटू नये, ती आपल्या संस्कारांशी, आपल्या धर्माशी आणि आपल्या मराठी अस्मितेशी एकनिष्ठ राहावी यावर त्यांनी विशेष भर दिला.

हे भाषण केवळ राजकीय नव्हतं, तर सामाजिक आणि सांस्कृतिक भान जागवणारं होतं. “मराठी माणूस” ही केवळ ओळख नसून, ती एक जबाबदारी आहे हे त्यांनी अधोरेखित केलं. महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात मराठी माणूस उभा राहिला पाहिजे, एकत्र राहिला पाहिजे, ही त्यांची अपेक्षा आहे.

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात आपली मुळे विसरणं खूप सोपं आहे. पण ज्यांनी आपल्यासाठी मार्ग तयार केला, त्यांचा इतिहास विसरला तर आपण स्वतःच हरवून जाऊ. त्यामुळेच राज ठाकरे यांचं भाषण हे केवळ आठवण नव्हे, तर एक इशारा आणि एक प्रेरणा आहे.

शेवटी, हे स्पष्ट होतं की भविष्य घडवायचं असेल, तर भूतकाळाची जाणीव असणं आवश्यक आहे. आणि हीच जाणीव पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं, ही आजच्या समाजाची सर्वात मोठी जबाबदारी आहे.


सचिन कृष्णा तळे ✍️

आहे ते आहे

Tuesday, 3 March 2026

“ग्रहण सुटलं, दान वाढ ग माय!” — श्रद्धा, कथा आणि संस्कृतीचा जिवंत ठेवा

 “ग्रहण सुटलं, दान वाढ ग माय!” — श्रद्धा, कथा आणि संस्कृतीचा जिवंत ठेवा

भारतीय समाजात आकाशातील प्रत्येक हालचालीला केवळ खगोलशास्त्रीय घटना म्हणून पाहिलं जात नाही; त्या मागे भावना असतात, कथा असतात, आणि एक सामूहिक स्मृती असते. सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण लागलं की गावाकडच्या शांत दुपारी किंवा चाळीतल्या गजबजलेल्या अंगणात एक हाक ऐकू यायची “ग्रहण सुटलं, दान वाढ ग माय!” ही हाक केवळ भिक्षेची नव्हती; ती परंपरेची होती, ती माणुसकीची होती.


ग्रहणाविषयीची कथा आपल्याला भागवत पुराण आणि इतर पुराणांमध्ये सापडते. समुद्रमंथनाच्या वेळी अमृतासाठी देव-दानवांमध्ये स्पर्धा झाली. त्या वेळी एका असुराने देवांचे रूप घेऊन अमृताचा घोट घेतला. पण सूर्यदेव आणि चंद्रदेव यांनी त्याची ओळख पटवली. तेव्हा विष्णु यांनी सुदर्शन चक्राने त्याचे मस्तक छाटले. त्या असुराचे नाव होते राहू. अमृत प्राशन केल्यामुळे त्याचे मस्तक अमर झाले, आणि तो अधूनमधून सूर्य किंवा चंद्राला गिळतो म्हणून ग्रहण लागते, अशी लोकमान्यता निर्माण झाली.

ही कथा केवळ भीती निर्माण करणारी नव्हती; ती एक नैतिक संदेश देणारी होती. कपटाने मिळवलेले अमृतही अखेरीस शाश्वत सुख देत नाही, हा तिचा अर्थ होता. ग्रहण म्हणजे अंधाराचा क्षण, आणि तो अंधार संपला की प्रकाशाचे स्वागत करण्यासाठी दानधर्म करावा अशी भावना समाजात रुजली.

ग्रहणकाळात घरातील वडीलधारी मंडळी मंत्रजप करीत, स्त्रिया देवासमोर दिवा लावत. काही ठिकाणी अन्न शिजवणे टाळले जाई, काहीजण उपवास पाळत. ग्रहण सुटल्यावर स्नान करून घराची शुद्धी केली जाई. त्या क्षणी बाहेरून पुन्हा एकदा हाक येई  “ग्रहण सुटलं, दान वाढ!” आणि घरातील आई धान्याची मूठ, जुने कपडे किंवा काही नाणी त्या गरजूंच्या हातात ठेवत असे. त्या देण्यामध्ये केवळ कर्तव्य नव्हते; त्यात समाधान होते.

आज विज्ञान आपल्याला सांगते की ग्रहण ही पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्या सावल्यांची खेळ आहे. त्यामागे कोणताही दैत्य नाही, कोणतीही अदृश्य शक्ती नाही. तरीसुद्धा दानाची परंपरा अजून जिवंत आहे. कारण ती अंधश्रद्धेवर नव्हे, तर माणुसकीवर आधारलेली आहे. ग्रहण हा निमित्तमात्र; खरा हेतू म्हणजे समाजातील दुर्बलांना आधार देणे.

“ग्रहण सुटलं, दान वाढ ग माय!” ही हाक म्हणजे एका संस्कृतीचा स्पंदनशील ठोका आहे. ती आपल्याला आठवण करून देते की अंधार कितीही गडद असला तरी प्रकाशाची वाट पाहणं आणि प्रकाश आल्यानंतर तो इतरांशी वाटून घेणं हाच खरा धर्म आहे. ग्रहणाच्या सावलीतून बाहेर येताना आपल्या हातातून जर कोणाच्या आयुष्यात थोडा प्रकाश गेला, तर तीच या परंपरेची खरी पूर्तता ठरते.

सचिन कृष्णा तळे ✍️

जे आहे ते आहे

Thursday, 26 February 2026

हरिलाल गांधी : संघर्ष, धर्मांतर आणि एका महापुरुषाच्या सावलीतील जीवन

 महात्मा गांधीजींचे ज्येष्ठ पुत्र Harilal Gandhi यांचे जीवन हे केवळ एका महापुरुषाच्या मुलाचे जीवन नव्हते, तर ते संघर्ष, असंतोष, आत्मशोध आणि वेदनांनी व्यापलेले एक मानवी नाटक होते. त्यांच्या आयुष्यातील १९३६ मधील धर्मांतराचा प्रसंग हा भारतीय समाजात आणि त्या काळच्या राजकीय वातावरणात मोठी चर्चा निर्माण करणारा ठरला.


हरिलाल गांधी यांचा जन्म १८८८ मध्ये झाला. ते Mahatma Gandhi आणि Kasturba Gandhi यांचे ज्येष्ठ पुत्र होते. वडिलांचे व्यक्तिमत्त्व प्रचंड प्रभावशाली आणि आदर्शवादी होते. संपूर्ण देशासाठी ते “बापू” होते; परंतु हरिलालसाठी ते एक कठोर शिस्तीचे वडील होते.

हरिलाल यांची इच्छा इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर होण्याची होती जसे गांधीजी झाले होते. मात्र गांधीजींनी त्यांना ती संधी दिली नाही. त्यांनी आपल्या मुलांनाही साधेपणाचे, त्यागाचे आणि स्वावलंबनाचे जीवन जगण्याचा आग्रह धरला. या निर्णयामुळे हरिलाल यांच्या मनात खोलवर नाराजी निर्माण झाली.

१९३६ मधील धर्मांतर

१९३६ साली, वयाच्या ४८ व्या वर्षी, हरिलाल गांधी यांनी सार्वजनिकरित्या इस्लाम धर्म स्वीकारला आणि स्वतःचे नाव “अब्दुल्ला गांधी” असे जाहीर केले. हा प्रसंग देशभर चर्चेचा विषय ठरला. त्या काळात हिंदू-मुस्लिम संबंध ताणलेले होते, आणि गांधीजी राष्ट्रीय एकतेसाठी प्रयत्नशील होते. अशा वेळी त्यांच्या स्वतःच्या मुलाने धर्मांतर केल्याची बातमी राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची ठरली.

काही अहवालांनुसार, हरिलाल यांचे धर्मांतर हे केवळ धार्मिक श्रद्धेमुळे नव्हते; तर ते त्यांच्या वैयक्तिक असंतोष, आर्थिक अडचणी आणि वडिलांविरुद्धच्या भावनिक बंडाचे प्रतीक होते. त्यांच्या आयुष्यात व्यसनाधीनता, आर्थिक अस्थिरता आणि कुटुंबातील ताणतणाव होते

पुनः हिंदू धर्मात वापसी

धर्मांतरानंतर काही काळातच हरिलाल गांधी यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. हा निर्णयही तितकाच चर्चेत राहिला. त्यांच्या आयुष्यातील या घडामोडी त्यांच्या अस्थिर मानसिक अवस्थेचे आणि जीवनातील दिशाहीनतेचे प्रतीक मानल्या जातात.

गांधीजींनी या संपूर्ण प्रसंगावर सार्वजनिक प्रतिक्रिया देताना संयम दाखवला. त्यांनी मुलाच्या निर्णयाबद्दल खेद व्यक्त केला, पण द्वेष किंवा कटुता दाखवली नाही. त्यांच्या दृष्टीने धर्म हा वैयक्तिक निवडीचा विषय होता; परंतु त्यांनी हरिलाल यांच्या जीवनातील अधःपतनाबद्दल दुःख व्यक्त केले होते.

हरिलाल गांधी यांचे पुढील आयुष्य अधिकच दुःखद ठरले. ते व्यसनांच्या आहारी गेले, आर्थिकदृष्ट्या कोलमडले आणि कुटुंबापासून दुरावले. १९४८ मध्ये, गांधीजींच्या हत्येनंतर काही महिन्यांनीच, त्यांचे निधन झाले. शेवटच्या काळात ते अत्यंत दीन अवस्थेत होते, अशी नोंद आढळते.

हरिलाल गांधी यांची कथा ही केवळ धर्मांतराची नाही; ती एका व्यक्तीच्या ओळखीच्या शोधाची, अपूर्ण अपेक्षांची आणि पित्याच्या महानतेच्या सावलीत हरवलेल्या मुलाची कथा आहे.

एका बाजूला राष्ट्रपिता म्हणून पूजले जाणारे महात्मा गांधी, आणि दुसऱ्या बाजूला स्वतःचे स्थान शोधत भटकणारा त्यांचा ज्येष्ठ पुत्र हा विरोधाभास इतिहासात कायम लक्षात राहील.

हरिलाल गांधींचे जीवन आपल्याला सांगते की महान व्यक्तिमत्त्वांच्या कुटुंबियांनाही मानवी कमजोरी, भावना आणि संघर्ष यांपासून सुटका नसते. त्यांच्या आयुष्याकडे केवळ टीकेच्या नजरेने नव्हे, तर सहानुभूतीने पाहण्याची गरज आहे.


जे आहे ते आहे

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale