राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी
देशाच्या संरक्षणासाठी आणि सन्मानासाठी काहीतरी करुन दाखवण्याची उर्मी प्रत्येक भारतीय तरुणांमध्ये आहे. देशाचे संरक्षण करण्याबरोबरच एक अत्युच्च प्रतीची जीवनशैली जगण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे भारतीय सैन्यदलांत म्हणजेच लष्कर, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होणे…!!! संपूर्ण भारतातील लाखो तरुण भारतीय सैन्यदलांत अधिकारी होण्याचं स्वप्नं उराशी बाळगून आहेत. भारतीय संरक्षण दल हे देखील वेळोवेळी आपल्या देशातील तरुणांना लष्करी अधिकारी होण्याची संधी देत असतात.
अशीच आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती प्राप्त असलेली संस्था म्हणजे
“राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी” म्हणजेच “National Defence Academy (NDA) / एन.डी.ए.”
हि सैनिकी प्रशिक्षण देणारी भारतातील एक महत्त्वाची संस्था. कमिशन-पूर्व प्रशिक्षणासाठी संबंधित अकादम्यांमध्ये पाठवण्याअगोदर भूदल, वायुदल व नौदल या तिन्ही दलांसाठी या प्रबोधिनीत संयुक्त प्रशिक्षण दिले जाते. १९५४ साली प्रबोधिनीची स्थापना झाली. दुसऱ्या जागतिक महायुद्धात तीनही सेनाविभागाचे परस्परांशी सहकार्य हे अत्यावश्यक आहे, ही गोष्ट लक्षात आली होती. म्हणूनच स्वतंत्र भारतातही अशा प्रकारच्या संयुक्त सैनिकी शिक्षणसंस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. पुण्यातील खडकवासल्यापासून समुद्र फार लांब नाही व पुण्यात हवाई दलाचा तळ आहे, म्हणून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसाठी खडकवासल्याची निवड करण्यात आली. ६ ऑक्टोबर १९४९ रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासल्याच्या वास्तूची पायाभरणी झाली. १६ जानेवारी १९५५ रोजी मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे उद्घाटन केले.
या प्रबोधिनीत कमांडंट, लेफ्टनंट जनरल अथवा तत्सम हुद्याचे अधिकारी असतात व पाळीपाळीने तीनही सेनाविभागांतून ते निवडले जातात.१६ ते १८ १/२ वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपरीक्षा मे व डिसेंबरमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत दर दोन वर्षांनी घेण्यात येतात व त्यांतून निवडलेले विद्यार्थी निवड मंडळापुढे चाचणीला जातात. वैद्यकीय परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची गुणक्रमांनुसार यादी तयार करण्यात येते व त्यांतील पहिल्या ३३० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. छात्रांचा शिक्षणाचा आणि भोजन−निवासाचा खर्च सरकारमार्फत करण्यात येतो. शालेय शिक्षणक्रमाव्यतिरिक शिस्त, नेतृत्व व लष्करी शिक्षण यांचा अभ्यासक्रमात समावेश असतो. तीन वर्षांनंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातर्फे बी. ए. अथवा बी. एस्सी. पदवी देण्यात येते. ‘सेवा परमो धर्म:’ हे बोधवाक्य घेऊन राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी तरुणांना राष्ट्र सेवेची संधी देत आली आहे. ह्या संस्थेचे नाव प्रथम नॅशनल वॉर अकॅडेमी ठेवावे असे ठरले होते.
सचिन कृष्णा तळे




