Friday, 17 May 2024

जीवघेण्या जाहिरातींचा विळखा


 

जीवघेण्या जाहिरातींचा विळखा

मोठमोठाल्या होर्डिंग हटवा माणसं वाचवा

 

राजकीय पक्ष, इतर संघटना, पदाधिकाऱ्यांच्या निवडी तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छां अन स्वतःच्या प्रॉडक्ट ची माहिती असलेले तसेच वेगवेगळ्या प्रकारचे मोठमोठे होर्डिंग्ज लावून सहज जाहिरातबाजी केली जाते. कोणतंही उत्पादन आणि त्याबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून जाहीर करणं किंवा माहिती देणं म्हणजेच जाहिरात होय. जाहिरातीची माध्यमं वेगवेगळी असू शकतात. उपभोक्तापर्यंत किंवा लोकांपर्यंत आपल्या उत्पादकाची माहिती प्रभावीपणे पोहोचावी यासाठी जाहिरातीचा अवलंब केला जातो. पण याचं जाहिराती लोकांच्या मृत्यूचे कारण ठरत असेल तर ? जाहिराती कोणाच्या असतात तर नेत्यांचे, त्याचं विभागातील लोकांचे. या जाहिरातीमधून पालिकेला, ग्रामपंचायत ला अन जाहिरात लावणाऱ्या कंपनी ला पैसाच पैसाच मिळतो. पण याच जाहिरातीच्या खाली आपल्याच काही लोकांना प्राण गमवावा लागत असेल तर हि लाजिरवाणी बाब तुमच्या आमच्या सारख्या सामान्य मतदारांच्या नागरिकांच्या लक्ष्यात कधी येणार. एखादी घटना घडल्यानंतर किंवा लोकांचे प्राण गेल्यानंतर अनधिकृत जाहिराती हटवण्यात कोणते शहाणपण आहे? इतका मोठा अनधिकृत होर्डिंग पालिकेच्या नजरेस पडू नये हे शक्य आहे का? नियम धाब्यावर बसवून आज सरसपणे जाहिराती झळकतात अश्यावेळी नागरिक म्हणून एक शंका नक्कीच निर्माण होते, कि या जाहिरातींसाठी किती हप्ते मिळत असतील अन कोणा कोणाला मिळत असतील?

 

मोठमोठे होर्डिंग्ज अन त्यावर झळकणाऱ्या जाहिरातीमुळे परिसराचे विद्रूपीकरण होतेच पण नागरिकांना जीव देखील गमवावा लागतो तर असल्या जाहिराती हव्याच कश्याला आपल्या परिसर मध्ये. ज्या परिसर मध्ये विभागात नियम तोडून हे अनधिकृत होर्डिंग लावले जातात ते होर्डिंग तिथल्या नगरसेवक ला, आमदार ला अन खासदार मंडळी यांना दिसून का येत नाही? हि मंडळी अन पालिकेचे कर्मचारी जितके दोषी त्याहून अधिक दोषी आपण निवडून दिलेले उमेदवार देखील आहेत. नियमानुसार पालिकेचे अन ग्रामपंचायतीचे ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन ते पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांकडून होर्डिंग्स लावण्यासाठी केवळ चार दिवसांची रीतसर परवानगी दिली जाते.

 

होर्डिंग कोसळून लोक मृत्यूमुखी पडल्याची ही काही पहिली घटना नाही. याआधी अशा अनेक घटना घडल्या आहेत.राज्यात जे होर्डिंग आहेत त्यातले काही होर्डिंग हे रेल्वे च्या हद्दीत येतं. घाटकोपर अन पुण्यात पडलेले होर्डिंग देखील रेल्वे प्रशाषण च्या जागेवर होते. मुंबईत होर्डिंग लावण्यासाठी महापालिकेने होर्डिंगची उंची, एकूण आकार, दोन होर्डिंगमधलं अंतर आणि इतर आस्थापनांपासून असलेलं अंतर, या बाबींचे निकष ठरवून दिले आहेत. होर्डिंग कायदेशीर आहेत की बेकायदेशीर आहेत? हे तुम्ही-आम्ही सर्वजण जाणू शकतात. कारण होर्डिंग कुठे, कसे लावावे याबाबतचे नियम आहेत. या नियमावलीमुळे नागरिकांनी जागृत व्हावं आणि अशाप्रकारच्या बेकायदेशीर होर्डिंग प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे  आपले कर्तव्य आहे.

 

·         होर्डिंगची उंची ही जमिनीपासून जास्तीत जास्त ४० बाय ४० असायला हवी. त्यापैक्षा मोठ्या होर्डींगला रहिवासी जागेत परवानी दिली जात नाही.

·         टेरेस आणि छतांच्यावरच्या होर्डिंगला ६० बाय २० ची परवानगी दिली जाऊ शकते. पण द्रुतगती मार्ग, हायवेवर ४० बाय ४० चे होर्डींग लावले जावेत.

·         स्कायवॉक, पादचारी पूल या ठिकाणी १० बाय ५० साईजचं होर्डिंग लावलं जात.

·         जमिनीपासून ७५ फूटापेक्षा जास्त उंचीच्या होर्डिंग अपवादात्मक परिस्थितीतच परवानगी दिली जाते.

·         १२० फूटापेक्षा जास्त उंचीच्या होर्डींगना परवानगी नसते. त्या होर्डिंगची उंची जमिनीपासून मोजली जाते.

·         ज्या जागेवर मोठे होर्डिंग्स लावायचे आहेत, त्या मालकाने महापालिकेच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून परवानगी घेणं बंधनकारक आहे. त्याचबरोबर पालिकेच्या  अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष साईटवर जाऊन लावलेले होर्डिंग्स हे नियमानुसार आहेत की नाही, हे तपासणं आवश्यक आहे.

·         महापालिकेच्या जागेवर जाहीरातींचे होर्डींग लावण्यासाठी निविदा प्रक्रीया पूर्ण करावी लागते. त्याआधी जाहीरातदाराकडे महापालिकाकडून परवाना प्राप्त असणं बंधनकारक आहे. महापालिका कोणत्याही एजन्सीला सर्व अटी नियम पूर्ण करून जास्तीत जास्त १० वर्षांपर्यंतच्या कालावधीपर्यंत जाहीरात प्रसिध्द करण्याची परवानगी देऊ शकते.

·         ज्या होर्डिंगवर लायसन्स नंबर, एक्सपायरी डेट हे लिहिलेलं असते, ती सर्व अधिकृत होर्डिंग असतात. ज्यावर हे लिहिलेलं नाही, ती अनधिकृत होर्डिंग आहेत.

·         कोणतीही शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणा परस्पर सार्वजनिक जागेवर जाहीरातीसाठी निविदा काढू शकत किंवा परवानगी देऊ शकत नाही. त्यांना महापालिकेची परवानगी घेणं बंधनकारक आहे.

·         सार्वजनिक मैदाने, उद्याने, क्रीडांगणे येथे होर्डिंग ला परवानगी देता येत नाही. धार्मिक स्थळ, शासकीय भवन आणि पुलांवर होर्डिंग लावता येत नाही.

·         एखाद्या जाहिरात संस्थेने अधिकाऱ्याकडून परवानगी घेता अनधिकृतरित्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केलं तर ती संस्था मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ४७१ अन्वये शिक्षेस पात्र ठरते.

·         जाहिरातीत असलेले रंग हे  लाल, पिवळा आणि हिरवा यांच्याशी मिळतेजुळते नसावेत.

 

ऑक्टोबर २०१८ मध्ये पुण्यातील जुना बाजारच्या गजबजलेल्या चौकात होर्डिंगची स्टीलची फ्रेम कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. या होर्डिंगच्या फ्रेमखाली सहा ऑटो रिक्षा, दोन दुचाकी आणि एक कार अडकली होती.

१७ एप्रिल २०२३ मध्ये पिंपरी चिंचवड हद्दीतील किवळेमध्ये होर्डिंग पडून जणांचा मृत्यू झाला होता.

१७ एप्रिल २०२४ मध्ये वाघोली येथे साई सत्यम पार्क परिसरात होर्डिंग कोसळून ते गाड्यांचं नुकसान झालं होतं.

 

नियम बनवले जातात, त्याची अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे अनधिकृत होर्डिंगची संख्या वाढत आहेत. घाटकोपरच्या छेडा नगर परिसरात सोमवारी संध्याकाळी एका पेट्रोल पंपाच्या छतावर भलंमोठं होर्डिंग कोसळलं. घाटकोपरमधील कोसळलेलं होर्डिंग हे मुंबईतील सर्वांत मोठं होर्डिंग असून कोसळलेल्या होर्डिंगची उंची १२० बाय १२० फूट असल्याची माहिती समोर आली. तर होर्डिंग लावणाऱ्या कंपनीकडून आकारमानाच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. मुंबई महापालिकेच्या नियमानुसार ४० बाय ४० फुटांपर्य़ंतच होर्डिंग लावण्याची परवानगी या होर्डिंग लावणाऱ्या कंपनीला देण्यात आली होती. दरम्यान, घाटकोपर येथे कोसळलेल्या भल्या मोठ्या होर्डिंग शेजारी संबंधित कंपनीचे आणखी मोठे होर्डिंग लावण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. अशा बेकायदेशीर होर्डिंगवर प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. इगो मीडिया या कंपनीच्या नावाचं हे होर्डिंग होतं. पालिकेने ही दुर्घटना घडण्याच्या दिवशीच कंपनीला नोटीस दिली होती. कोटी १३ लाखांचा दंड भरण्याचे आदेश पालिकेने नोटीसद्वारे कंपनीला दिले होते. अशी देखील माहिती समोर आली आहे.


सचिन कृष्णा तळे 

Monday, 6 May 2024

योगयोगेश्वर सद्गुरू योगीराज शंकर महाराज समाधी सोहळा

 योगयोगेश्वर सद्गुरू योगीराज शंकर महाराज समाधी सोहळा 




योगयोगेश्वर सद्गुरू योगीराज शंकर महाराज समाधी सोहळा

पुण्यातील स्वारगेटकडून कात्रज कड़े जाताना रस्त्यावर, स्वारगेट पासून दोन अडीच किलोमीटर वर डाव्या हाताला एक मठ लागतो. धनकवडी गावातला हाच सदगुरू श्री शंकर महाराजांचा समाधी मठ! येत्या वैशाख शु. दुर्गाष्टमी शके १९४५ बुधवार दि. १५ मे रोजी महाराजांचा ७७ वा समाधी सोहळा पार पडत आहे. यावेळी ट्रस्ट तर्फे महाप्रसाद, संगीत महोत्सव, भजन, नृत्यसेवा, सतार वादन, तबला ,बहुरूपी भारूड, शास्त्रीय संगीत, प्रवचन, नारदीय कीर्तन . कार्यक्रम आयोजित केले असून हा सोहळा मे पासून ते १६ मे पर्यंत चालणार आहे. १५ मे या दिवशी महाराजांची पालखी पुण्यातील काही ठिकाणी भेट देत मठात येईल. मठातर्फ़े दर महिन्याच्या दुर्गाष्टमीला रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. रोज मठात दर्शनाला येणाऱ्या भाविकांना अन गरजू संस्थांना अन लोकांना मोफत खिचडी वाटप केली जाते. दांडेकर पूल, गोकुळ नगर, वारजे पूल, सुखसागर नगर कात्रज या मजूर अड्ड्यावरील पंधरा हजारहून अधिक रुग्णांनी ट्रस्ट च्या फिरत्या दवाखान्यातून लाभ घेतला आहे. पुण्या बाहेरून येणाऱ्या भाविकांसासाठी लवकरच तळजाई येथे भक्तनिवास हि सुरु होणार आहे. आजही भक्तांच्या भेटीला हाकेला महाराज धावून येतात. महाराजांच्या मठात एक विलक्षण गोष्ट अशी कि महाराजांवर प्रेम करणारा मोठा वर्ग हा तरुण आहे. लाखोंच्या घरात तरुण मंडळी मालकांच्या सेवेत दिसतील. श्री शंकर महाराजांची पारमार्थिक वैराग्य-संपन्न मूर्ती केवढ्या उच्च भूमिकेवर होती, ते त्यांच्या एका सहज उद्गारातून दिसते. ते म्हणाले होते- ‘मला काही कमी नाही, कारण मला कमावण्यासारखे काही नाही. आणि माझ्याजवळ काही नाही म्हणून मला गमावण्यासारखेही काही नाही.’

मैं कैलास का रहनेवाला, मेरा नाम है शंकर।

दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना घर।।

यहां दुनिया में कई रंग है। यह रंग निराला है।

पाया भेद किसने, यह गहरा ही गहरा है।।

आम्ही कैलासाहून आलो!’ नावहीशंकर’! हे शब्द आहेत शंकर महाराजांचे. नाथ सिद्धांच्या परंपरेतील एक परिपूर्ण गुरु, आधुनिक युगातील महाराष्ट्रातील महान योगी संतांपैकी एक. महाराजांना भक्तगण "मालक" या शब्दांनी हाक मारत अन शंकर महाराज अक्कलकोट निवासी श्री स्वामींना "मालक" म्हणत. महाराज दिसायला शारीरिकदृष्ट्या अष्टवक्र (म्हणजे आठ ठिकाणी वाकलेले) आणि पुराणकाळातील महान ज्ञानी पुरुष असेच दिसायचे. ते 'अजानुबाहू' होते. गुडघ्यापर्यंत लांब हात असलेले. त्याचे डोळे - मोठे आणि तेजस्वी - आणि चेहऱ्यावर लहान मुलासारखे भाव हे सर्वात लक्षणीय होते. शंकर महाराजांचेनाम-रूप-स्थानसांगणे कठीण पण नोंदीनुसार त्रिवेणी संगम, सोलापूर, अक्कलकोट, त्र्यंबकेश्र्वर, नाशिक, नगर, पुणे, हैद्राबाद, तुळजापूर, औदुंबर, श्रीशैल- अशा स्थानी तसेच भारता बाहेर देखील त्यांची भटकंती. महाराजांनी त्यांच्या भक्तांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रवास केला. त्यामुळे त्यांची नावे हि अलग अलग. काशीमध्ये त्यांना खिचडी बाबा, ग्वाल्हेर प्रदेशात ते गौरीशंकर म्हणून ओळखले गेले, खानदेशातील रावेर येथे होते जेथे ते कुंवरस्वामी म्हणून, गुजरातमध्ये देवियाबाबा, इस्लाममध्ये रहिमबाबा, आफ्रिकेत टोबो, तर अरबस्थानात नूर महंमदखान, मध्य भारतात लहरीबाबा, दक्षिणेत गुरुदेव अशा अनेक नावांनी महाराजांची कीर्ती पाहायला मिळते.

 

असे म्हणतात की नाशिकजवळील सटाणा तालुक्यातील अंतापूर गावातील एक चिमणाजी निपुत्रिक होते आणि त्यांनी बाळासाठी भगवान शिवाची प्रार्थना केली. एके दिवशी, त्यांना स्वप्न पडले की त्याला त्याच्या गावाबाहेरच्या जंगलात झुडपात एक बाळ सापडेल. दिव्यदृष्टी असल्याचे स्वप्न घेऊन त्याने दुसऱ्या दिवशी स्थानिक जंगलात शोध घेतला आणि त्यांना दोन वर्षांचा मुलगा सापडला. चिमणाजींनी मुलाला घरी आणले आणि त्याचे नाव शंकर ठेवले. लहानपणीही शंकर ध्यानासाठी जवळच्या जंगलात जायचे आणि रात्री सुखरूप परतायचे. एके दिवशी, त्याने आपल्या पालकांना सूचित केले की त्यांना लवकरच त्यांचे स्वतःचे मूल होईल. हे अगदी अचूक ठरले आणि त्यानंतर काही वेळातच, शंकर अध्यात्मिक शोधात हिमालयात जाण्यासाठी घर सोडले.

शंकर महाराजांनी बापू नावाच्या भक्ताला पर्वतीवर गुरुचरित्राचे उलटे पारायण अष्टमी पासून सुरु करायला सांगितले. सप्तमीला एक कप चहा घेतला. एका खोलीत छोटी गादी घातली .एक तक्या ठेवला आंघोळ करून त्या खोलीत जाताना सांगितले दार लावून घ्या. मी कोणाला भेटणार नाही. मला बोलायचे नाही. कोणी आले तरी दार उघडू नका. सकाळी ठीक १० वाजता महाराज खोलीत गेले. ढेकणे मामीनी दार लावून घेतले. दाराजवळ दोघे पहारा देत होते. रात्रभर ढेकणे मामा मामी घोंगडीवर बसून होते. पहाटे आतून आवाज आला. माझी आत्मज्योत आता अनंतात विलीन होत आहे. पुढील सोय करा. महाराजांनी सांगितल्या प्रमाणे अष्टमीला आपला देह सोडला. संपूर्ण पुण्यात बातमी पसरली भक्तांचे लोंढे धावत आले. भक्तांना रडू आवरे ना. न्यायरत्न विनोद तांब्याची तार घेवून आले. त्यांनी एक टोक महाराजांच्या छातीला आणि दुसरे टोक कानाला लावले. त्यातून आवाज आला. "आत्मकलेपैकी एक कला जगकल्याणासाठी समाधी स्थानांत सदैव राहील आणि माउलीचा आशीर्वाद जो जे वंचील तो ते लाहो प्राणिजात". ज्ञाननाथ रानडे यांना महाराजांचा संदेश आला. आळंदी, जंगली महाराज, माळी महाराज, सोपानकाका, ओमकारेश्वर पद्मावती या ठिकाणचे निर्माल्य माझ्या समाधी स्थानात आणून टाकावे. ज्ञाननाथ रानडे यांनी गाडी घेवून अडीज तासात निर्माल्य आणले.

महाराजांनी नुसतं समाधिस्थानच सुचवलं नव्हतं, तर तिकडे जाणाऱ्या यात्रेचा मार्गही आखून दिला होता. त्यांच्या इछ्येप्रमाणे मामांच्या घरापासून यात्रा निघाली ती काका हलवायांचं दत्तमंदिर, ग्लोब सिनेमा, समर्थ अक्कलकोट स्वामी मठ, मंडईतला लोकमान्य टिळकांचा पुतळा, शनिपार, भिकारदास मारुती, पर्वतीवरून अरण्येश्वर या वाटेनं समाधिस्थानाकडे. पाचच्या सुमाराला, उन्हे थोडी कलती झाल्यावर महाराजांचा देह समाधिगुंफेत ठेवताना आता पुन्हा हे सगुण दर्शन होणं नाही या जाणिवेने सर्वांचं हृदय भरून आलं. डोळे पाझरू लागले. पण आपल्या प्राणप्रिय सदगुरुंच्या विरहदु:खानं विदीर्ण झालेल्या अंत:करणाचे उसासे महाराजांना समजू नयेत, ऐकू येऊ नयेत म्हणूनच की काय सर्वांनी मोठ्यानं जयघोष केला

"अनंतकोटी ब्रम्हांडनायक सदगुरू शंकरमहाराज की जय!"

स्वामी समर्थ महाराज की जय!!

ज्ञानेश्वरमाऊली - तुकाराम !!!"


- सचिन कृष्णा तळे 7709099646

Thursday, 2 May 2024

करू मतदान देशासाठी

 


नेत्यांची ती संपत्ती मोठी

नेत्यांनी कमावली कोटी


चार चाकी, अनेक बंगले

स्वप्ने मात्र नसतात छोटी


निवडणुकीचा काळ येता

पाच वर्षांनी घेतील भेटी


फिरतील मग गल्लो गल्ली

सोबत घेऊन चार टाळकी


विकासाच्या मारू थापा

देऊ थोडी वचने खोटी


निवडून येतो नेता तेव्हा

का रे होते मतांची माती


नेत्यांनीच मुले होतील नेते 

सामन्याची किंमत खोटी 


दंगली मध्ये तुम्ही आम्ही 

नेत्यांची फक्त असते पाटी 


नेत्यांच्या नावाने दिसतील 

घोट्याळ्यांची यादी मोठी 


पैश्यांचा हा सट्टेबाजार 

फिरतो नेत्यांच्याच भोवती 


थट्टा मांडली या नेत्यांनी 

देव देश अन धर्माची 


जातीत विभागून नेत्यांनी 

पोळी भाजली स्वतःची 


मतदारांनो घ्या काळजी

तुमची आमची समाजाची


नेते आहे सेवक आपले 

हीच आहे खरी लोकशाही


नको पैसा नको लालच

योग्य तीच निवड व्हावी


मतदानाने राज्य घडवू

करू मतदान देशासाठी 


 सचिन कृष्णा तळे 

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale