Tuesday, 25 March 2025

राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे दोन चुलत भाऊ एकत्र आले पाहिजे कि नाहीत ?

उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज श्रीकांत ठाकरे हे दोन नाव महाराष्ट्राच्या राजकारणात वजनदारच नाही तर प्रतिष्टेच देखील आहे. हि दोन चुलत भाव राज्याच्या राजकारणात एकत्र यावं आणि एकत्र निवडणूक लढवावी अशी अनेकांची इच्छा आहे. अनेकांना वाटत कि राज उद्धव जोडी हि एकत्र आली तर राज्याचं राजकारण हे बदलेल. काही दिवसापूर्वी हि दोन मंडळी एकत्र एका कार्यक्रमात दिसलीत आणि त्यावर चांगलीच चर्चा झाली. एक शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आहेत तर दुसरे बाळासाहेबांचे पुत्र. पण बाळासाहेब असतानाच राजसाहेब दुरावले. काही अंतर्गत वादातून राजसाहेब सारखे अनेक नेते हळू हळू शिवसेनेला अखेरचा "जय महाराष्ट्र" करून निघून गेले आणि हे चित्र काही थांबेना. आज दुर्दव्य कि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे दोन गटात रूपांतर झालं. त्याला कोण जवाबदार हा आजचा विषय नाही. असो , आजचा विषय हाच आहे कि राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे दोन चुलत भाऊ एकत्र आले पाहिजे कि नाहीत ? जर एकत्र आले तर त्याचा फायदा होणार कि तोटा? आजची परिस्तिथी पाहता ठाकरे या नावाचा खरा वारसदार नक्कीच उद्धव ठाकरे आहेत कि राज ठाकरे ?  

https://youtu.be/bbrP_15GYN0?si=rcCN4-b-qgW_W4yx 



उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्यापेक्षा आठ वर्षाने मोठे आहेत पण शिवसेना या संघटनेच्या नेतृत्वात राजसाहेब हे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मोठे ठरतात. कारण राजकारणात वारसा हा फक्त एका कालावधी साठी असतो पण अनुभवातून जो नेतृत्व करतो तो चिरकाल टिकतो. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन स्वतंत्र वाहते प्रवाह आहे. चला हा प्रवाह नक्की कसा आहे ते पाहू.

 एक उदाहरण इथे देतो, वयक्तिक रित्या मला जर कोणी विचारलं तर मला हिंदुहृस्यसम्राट बाळासाहेब ठाकरे हे एका हिमालय पर्वतासारखे वाटतात आणि या बाळासाहेब रुपी हिमालयाच्या शिखरावरून ज्या नदीचा प्रवाह वाहतोय ती नदी म्हणजे राज साहेब ठाकरे आणि याच हिमालयाच्या पायथ्याशी हिमालयाच्या गाभाऱ्यातून एक नदी प्रकट झालीय ती म्हणजे उद्धव ठाकरे. राज्यात या दोन प्रमुख नद्यांचं प्रवाह विरुद्ध दिशेने वाहतोय हे लक्षात असून द्या. या दोन नद्या एकत्र आणायचं असेल तर असंभव असे काहीच नाही. आणि राजकारणात सत्तेसाठी कोण कधी एकत्र येईल हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. 

लहानपणापासूनच राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळाले. ते अजूनही बाळासाहेब ठाकरे यांना आपले दैवताचे स्थान देतात. आपली राजकीय कारकीर्द त्यांनी शिवसेनेतच सुरू केली. शिवसेनेला तरुणांचा बळकट पाठिंबा मिळवण्यात राज ठाकरे यांचा फार वाटा महत्त्वाचा समजला जातो. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची सूत्रे कोण वाहणार यावर एकेकाळी राज ठाकरे याच्याकडेच बोट दाखवले जायचे. उत्तम वक्तृत्व आणि प्रभावी नेतृत्व असलेले राज ठाकरे हे तरुणांचे नेते मानले जातात. राज ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केल्यावर बाळासाहेब यांनी त्यांच्यावर विद्यार्थी सेनेचे नेतृत्व सोपवलं होत. याच काळात लाखोंच्या संख्येने विद्यार्थी तरुण मंडळी राज साहेब यांच्या नेतृत्वात काम करू लागली . विद्यार्थी सेनेसोबत शिव उदयॊग सेने चे काम देखील जोरात चालू झाले होते. कधी बाळासाहेब यांच्यासाठी कार्यकर्ता म्हणून तर कधी बाळासाहेबांच्या शिलेदारातील प्रमुख शिलेदार म्हणून राजसाहेब भूमिका पार पाडत होते.

पण महाबळेश्वर येथील २००३ च्या शिवसेनेच्या अधिवेशनात जे घडलं त्यानंतर या बाहुबली ला एक पाऊल मागेच टाकावे लागले. हा राजकीय अनुभव राजसाहेब ठाकरे यांच्याकडे होताच. शेवटी २००६ मध्ये ९ मार्च ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली आणि या नव्या पक्षाने अनेक तरुणांना राजकारणात येण्याची संधी दिली.

त्याउलट उद्धव बाळासाहेब ठाकरे हे निपुण छायाचित्रकार. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांची यशस्वी छायाचित्र प्रदर्शने आहेत. सुरवातीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते. निवडणुकांच्या काळात शिवसेनेच्या प्रचारयंत्रणेतही त्यांचा सहभाग असे. २००२ नंतर उद्धव साहेब ठाकरे यांनी राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवला. पुढील वर्षी  २००३ साली त्यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली. मात्र या काळात तत्कालीन शिवसेनेतील प्रमुख नेते नारायण राणे व उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान मतभेद वाढत राहिले आणि अखेरीस नारायण राणे यांची पक्षातून हकालपट्टी झाली. उद्धव ठाकरे व त्यांचे चुलतभाऊ राज ठाकरे यांच्यातील दरीही रुंदावत गेली; परिणामी इ.स. २००६ साली राज ठाकरे यांनी शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर जाणाऱ्यांची संख्या वाढत गेली. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात बाळासाहेब लढले त्याच दोन विरोधी पक्षांसोबत उद्धव साहेब यांनी मैत्री करून सत्ता स्थापन केली. सत्ता वाटप करण्यात वाद निर्माण झाल्यामुळे युती तुटली व उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय सोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन केले व राज्याच्या १९ व्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. २१ जून २०२२ रोजी शिवसेनेतील एकनाथ शिंदे सह 40 आमदारांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. 

https://youtu.be/bbrP_15GYN0?si=rcCN4-b-qgW_W4yx

हा झाला या दोघांचा एक छोटासा परिचय.

एकाच मेहनतीने स्वबळावर पक्ष स्थापन करून राजकारणात स्थिर राहण्याचा प्रयत्न सुरु आहे तर दुसर्याने जे वारसा हक्काने मिळवलं ते टिकवण्यात समर्थ आहेत २००३ पासून ते आज पर्यंत बाळासाहेबांनी उभे केलेले अनेक नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेली मूळ शिवसेनेला सोडून बाळासाहेबांची शिवसेना स्थापन केली. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडे बाळासाहेबांचे शिलेदार होते त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचा विचार केला नाही. उलट मनसे कशी सत्तेपासून लांब राहील याचेच कटकारस्थान रचले गेले. अर्थात हा एक राजकारणाचा भाग आहे. जर हे दोन नेते एकत्र येत असतील तर त्यात पहिला अडथळा हा संजय राऊत यांचा असेल. राज साहेब यांच्या मनात संजय राऊत बद्दल काय मत असेल हे तुम्ही राज साहेबाना विचारलं तर ते माझ्यापेक्षा चागलं उत्तर देतील. बाकी संजय राऊत यांचं मत कोणाबद्दल काय आहे हे सुद्धा मला सांगायची गरज नाही.

 

असे आरोप हि होतात कि उद्धव साहेब यांच्यापर्यंत पोहचायचं असेल तर तुम्हाला संजय राऊत यांच्या मार्फत च जावं लागत. आणि स्पष्ट सांगायचं तर संजय राऊत याना मनसे अन भाजप ची जवळीक अजिबात नकोय. त्यांना काँग्रेस आणि शरद पवार गट जितका जवळ वाटतो तितका हे दोन पक्ष नाही. त्यामुळे या दोन नेत्याने एकत्र न येण्याचं संजय राऊत हे एक कारण असू शकत.

हि दोन भावंडं अलग झाल्यापासून तुम्ही उद्धव साहेबांना कधी राज साहेब यांच्या घरी पाहिलं का ? किंवा राजसाहेब यांना नातू झाला तेव्हा त्यावर उद्धवसाहेबांचं राजसाहेबाना शुभेच्छा दिल्यात पाहिलं का ? पण उद्धव साहेब जेव्हा आजारी होते तेव्हा राजसाहेब स्वतः त्यांची विचारपूस करून त्यांना मातोश्री पर्यंत पोहचवले. असे बारीसारीक अनेक घटना घडलेत हे विसरून चालणार नाही. भावकी सत्तेसाठी एकत्र जरी आली तरी त्यांच्या मनात जे एकमेकांबद्दल आहे ते जगजाहीर आहे.  

आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्धव साहेब यांच्यामुळे राजसाहेब याना शिवसेना पक्षाचं अध्यक्ष होता आलं नाही, हि जी खंत आहे ती राजसाहेब यांच्या मनात आजही असणार आणि पुढे हि राहणार.

राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे धोरण त्यांनी महाराष्ट्र व मराठीभाषा व हिंदुत्व यांभोवतीच प्रामुख्याने केंद्रित ठेवले आहे. कधीकाळी याच मुद्द्यावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची शिवसेना होती पण उद्धव ठाकरे यांचे मित्र पक्षाची विचारसरणी हि वेगळी असल्याने ते महाराष्ट्र व मराठीभाषा व हिंदुत्व var कधी कधी ठाम भूमिका मांडू शकत नाहीय.

त्यामुळे हे दोन नेते एकत्र येतील असं मला तरी वाटत नाही आणि आलेच तर याचा फायदा सत्ता मिळवण्यासाठी अजिबात होणार नाही. शेवटी या क्लिप पहा आणि तुम्हीच ठरावा.

 https://youtu.be/bbrP_15GYN0?si=rcCN4-b-qgW_W4yx

सचिन कृष्णा तळे

 

Thursday, 6 March 2025

जगतगुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांचं पुण्यनगरीत आगमन.

 

सद्गुरुचे नाममात्र ।तेचि आम्हां वेदशास्त्र । सकळ मंत्रा वरिष्ठ मंत्र । नाम सर्वत्र गुरुचे ।

 



या भागवतातील नाथ उक्तीप्रमाणे आपल्या गुरुचेच नाव सर्वश्रेष्ठ मानणारे एक अलौकिक महात्मा म्हणजेच जगद्गुरू जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज येत्या १५  मार्च २०२५ रोजी सायंकाळी भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात उपस्तिथ राहणार आहेत. निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज धर्मपीठाचे पीठाधीश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांना प्रयागराज येथील महाकुंभात जगदगुरु ही विशेष उपाधी मिळाल्यामुळे त्यांचे भव्य स्वागत व पूजन सोहळा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी पुणेच नाही तर राज्यातल्या अनेक गावातून बाबाजींचे भक्त परिवार पुण्यात दाखल होतील आणि या कार्यक्रमाचा लाभ घेतली अश्या प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन जय बाबाजी भक्त परिवार,
जिल्हा पुणे च्या वतीने करण्यात येणार आहे.

 

१९८९ साली जनार्धन स्वामी यांचे निर्वाण झाले आणि त्यानंतर २५ डिसेंबर १९८९ साली शांतीगिरी महाराजांची उत्तराधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. शांतीगिरी महाराज हे संन्यस्त स्वीकारलेले योगी आहेत. आजन्म ब्राह्मचारी राहण्याचं त्यांनी व्रत घेतलं आहे. शांतीगिरी महाराज हे मूळचे नाशिक जिल्ह्यातल्या लाखलगाव इथले आहेत. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांची दृष्टी गेली होती. त्यामुळे ते वेरूळ येथील जनार्धन स्वामींच्या मठात आले. मठात त्यांची दृष्टी ठीक झाली त्यामुळे ते परत आपल्या गावी गेले, गावी गेल्यानंतर त्यांची पुन्हा दृष्टी गेली त्यामुळे महाराज पुन्हा मठात आले. मठात आल्यानंतर जनार्धन स्वामींनी शांतीगिरी महाराजांना मठातच राहायला सांगितलं, मठात राहून शांतीगिरी महाराजांनी संन्यस्त वृत्त स्वीकारलं, मठातच राहून महाराजांनी विज्ञान शाखेतून पदवीपर्यंतच शिक्षण घेतलं. शांतीगिरी महाराजांचे छत्रपती संभाजी नगर, नगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि जालना या पाच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भक्त आहेत. कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक लोकसभा मतदारसंघात भगवे कपडे परिधान करणाऱ्या स्वामी शांतिगिरी महाराजांची अपक्ष उमेदवारी विविध कारणांनी चर्चेत राहिले.

 

साधारणतः १९७५-७६ मध्ये शांतिगिरीजी बाबांनी जे घर सोडले ते आजतागायत आहे. 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती.' या उक्तीप्रमाणे शांतिगिरीजी बाबांनी आपले कार्य सुरू केले. पहिल्यापासूनच शांतिगिरीजी बाबा जनार्दन बाबांचे आवडते शिष्य होते. बाबाजी पहिल्या प्रसादाची पुडी सुद्धा शांतिगिरीजी बाबांनाच देत असायचे. स्नान घालायचं म्हटलं तरी शांतिगिरीजी बाबा पळत पळत जाऊन पुढे उभे असायचे. इतका अधिकार शांतिगिरीजी बाबांचा जनार्दन बाबांवर होता. सन १९८९ मध्ये जनार्दन बाबांचे महानिर्वाण झाले. आणि सोडशी सोहळ्यात जनार्दन बाबांच्या उत्तराधिकारी पदाची शाल अनेक मान्यवरांच्या साक्षीने आणि शंभू पंचनाम जुना आखाड्याच्या साधूंच्या उपस्थितीत शांतिगिरीजी बाबांच्या अंगावर चढवली. सर्वांतून शांतिगिरीजी बाबांनी संयमाने आणि धैर्याने मार्ग काढत बाबांच्या कार्याचा प्रचार प्रसाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली ती आजतागायत सुरू आहे. अखंड नऊ वर्षे मौन व्रताची साधना सुरू झाली. एक शब्दही न बोलता जनार्दन बाबांचे पुण्यस्मरण सोहळे सुरू झाले. बाबाजींचे ११ वे पुण्यस्मरण विश्वशांती सोहळा, १३ वे पुण्यस्मरण श्री राम सिता धर्म सोहळा असेल . किंवा १६ वे पुण्यस्मरण जय हनुमान धर्म सोहळा असेल असे अनेक 'न भूतो न भविष्यती' सोहळे करून धर्मसंस्कार शिरोमणीचा पुरस्कार प्राप्त करून घेतला. बाबाजींनी सुरू केलेल्या अनुष्ठान, गुरुकुल, श्रमदान, कृषी व ऋषी सेवा आणि गो सेवा या दिव्य पाच परंपरांचे नित्य पालन शांतिगिरीजी बाबा नेटाने करत आहेत आणि लाखो भक्तांकडून करवून घेत आहेत. सन २०१७ मध्ये महाराष्ट्र. राज्य मराठी पत्रकार संघाकडून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल “समाजरत्न” पुरस्कारप्रदान करण्यात आला आहे.

 

शांतिगिरी महाराज आजवर फक्त फलाहार घेतले असून. साधी भगवी वस्त्र, पायात लाकडी खडावा, बसायला पोत्याचे आसन अन मनात सतत जनार्दन बाबांच्या नावाचे चिंतन असे त्यागी, वैरागी जीवन आहे. पुण्यात ते मुकामी असल्याने जय बाबाजी परिवार तर्फे राहण्यासाठी त्यांना एका शेतात कुटी उभारण्यात येणार आहे. हि कुटी गवत, पाचट याने बनवली जाणार आहे. कुटी हि शेणाने सारून त्यात विहिरीचे बोरच्या पाण्याची सोय असणार आहे. बाबाजींच स्वागत करून त्यांची पूजा आणि नंतर आलेल्या भक्तांना त्यांचे आशीर्वाद सोबत येणाऱ्या भक्तांसाठी भोजन ची सोय देखील असणार आहे. जनार्दन स्वामींचे संकल्प पुरे करून खरी गुरुनिष्ठा काय आहे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शांतिगिरीजी महाराज आहेत. अश्या संतांचे चरण या पुण्यनगरीत पडणार असल्याने त्यांच्या स्वागताची तयारी हि जोरदार चालू आहे. या कार्यक्रमासाठी विविध मान्यवर मंडळी देखील हजेरी लावणार आहेत. "जय जय जनार्दन देवा । निरंतर घडो तुमची सेवा" । या उक्तीप्रमाणे सतत जनार्दन बाबांची सेवा घडावी म्हणून कार्यरत असणाऱ्या स्वामी शांतिगिरीजी बाबांच्या चरणी विनम्र अभिवादन.

 

सचिन कृष्णा तळे

 

Wednesday, 18 December 2024

देवबाग: निसर्गाचा अद्भुत संगम" ❤️❤️❤️

 "देवबाग: निसर्गाचा अद्भुत संगम" ❤️❤️❤️


कोकणच्या किनाऱ्यावर वसलेलं देवबाग हे निसर्गप्रेमींसाठी एक अनोखं पर्यटनस्थळ आहे. मालवणपासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या देवबागमध्ये शांत समुद्रकिनारे, कर्ली नदीचा संगम आणि नव्याने निर्माण झालेल्या बेटांनी पर्यटकांना मोहित केलं आहे.


देवबागचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नदी आणि समुद्राचं मिलन, जिथे कर्ली नदी अरबी समुद्राला मिळते. हा संगम पाहणं म्हणजे निसर्गाचा अद्भुत चमत्कार अनुभवणं. शांत पाण्यावर बोटिंग करताना तुम्हाला सभोवतालचं निसर्गसौंदर्य आणि गार वारा एक वेगळाच आनंद देतो.


संगमाजवळच सुनामी आयलंड ही वाळूची बेटं तयार झाली आहेत. मऊशार पांढऱ्या वाळूवर चालत किंवा बसून तुम्ही अथांग पाण्याचं सौंदर्य अनुभवू शकता. विशेषतः भरती आणि ओहोटीच्या खेळामुळे या बेटांचा आकार बदलत राहतो. इथे लहान मुलांसाठी खेळ, पाण्यात बुडबुड्यांचा आनंद घेणं किंवा मित्र-परिवारासोबत निवांत वेळ घालवणं खूप सुखद ठरतं.


नुकतंच पर्यटकांसाठी "Seagull Island" उलगडू लागलं आहे. या बेटाचं नाव समुद्रावर फिरणाऱ्या सीगल पक्ष्यांवरून पडलं आहे. बेटाकडे जाताना बोटीवरून हजारोंच्या संख्येने उडणारे सीगल पक्षी तुम्हाला सोबत करतात. हे दृश्य म्हणजे जणू निसर्गाचा एक हलता चित्रपटच वाटतो. Seagull Island हे वॉटर स्पोर्ट्स, बोटिंग आणि फोटोग्राफीसाठी एक नवीन आकर्षण ठरलं आहे.


देवबागमध्ये तुम्हाला डॉल्फिन सफारी चा अनुभव देखील घेता येतो. समुद्रात डॉल्फिन्सच्या उड्या आणि खेळ पाहताना पर्यटक अक्षरशः मंत्रमुग्ध होतात.


देवबाग हे शांतता आणि सौंदर्य यांचं एक सुंदर मिलन आहे. कर्ली नदीच्या किनारी बसून गार वारा अनुभवणं, पाण्याच्या लाटा पाहणं आणि सूर्योदय-सूर्यास्ताचा नजारा टिपणं हे सगळं आयुष्यात एक अविस्मरणीय आठवण बनून राहतं.


"देवबाग म्हणजे निसर्गाचा अलवार स्पर्श, शांत लाटांचा गाज, आणि पाण्यात तयार झालेली ही छोटी बेटं जणू पृथ्वीवरील स्वर्गाचे तुकडेच वाटतात."


#आहेतेआहे




Saturday, 12 October 2024

प्रत्येक भारतीयांच्या मनातला खरा "भारत रत्न " रतनजी टाटा

 प्रत्येक भारतीयांच्या मनातला खरा "भारत रत्न " रतनजी टाटा 



"सरकार जेव्हा भारतरत्न म्हणून एखाद्या व्यक्तीला सन्मानित करते तेव्हा पासून त्या व्यक्तीच्या नावापुढे भारतरत्न म्हणून लावले जाते. पण ज्येष्ठ उद्योगपती आणि अत्यंत उदार व्यक्तीमत्व असणाऱ्या रतनजी टाटा यांनी ज्याप्रमाणे देशातल्या तळागाळातल्या लोकांसाठी स्वतःला समर्पित केलं आणि प्रत्येक संकटात ते ज्या प्रमाणे धावून आले ते पाहून सोशल मीडियावर सगळ्यांनी श्रद्धांजली वाहताना त्यांना 'भारतरत्न' हीच उपमा दिली. हे पाहून राज्यसरकार आणि अनेक राजकीय सामाजिक संघटनांनी सुद्धा केंद्रात रतनजी टाटा यांना भारतरत्‍न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सन्मानित करावे हि विनंती केली आहे."


देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. रतन टाटा हे फक्त देशातच नव्हे तर जगभर त्यानी त्यांच्या कार्यातून भारताच नाव उद्योग क्षेत्रात पुढे घेऊन आले आहेत. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले अन भारताने काय गमावलं हे फक्त या देशातला कामगार वर्गच सांगू शकतो. " मी गेलो तर कंपनी बंद करू नका , कामगारांचं नुकसान करू नका " अश्या शब्दात त्यांनी त्यांच्या पूर्ण सहकाऱ्यांना संदेश दिला होता. कोरोनाच्या महामारीत जेव्हा देश संकटात होता तेव्हा कामगारांच्या आणि देशवासीयांच्या मागे सर्वात प्रथम रतनजी टाटा उभे राहिले. जेव्हा जेव्हा संकटाची चाहूल लागली तेव्हा तेव्हा स्वतःहून रतनजी धावून आलेत. अश्या व्यक्तीच्या जाण्याने संपूर्ण देशात शोककळा पसरली. त्यांचे आदर्श, विचार आणि तत्त्वे नेहमी युवकांना मार्गदर्शक ठरली आहेत. रतन टाटा यांना २००० मध्ये पद्मभूषण आणि २००८ मध्ये पद्मविभूषण, भारत सरकारचा तिसरा आणि दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला होता. टाटा यांना २००६ मध्ये महाराष्ट्रातील सार्वजनिक प्रशासनातील त्यांच्या कामासाठी ' महाराष्ट्र भूषण ' आणि आसाममध्ये कर्करोगाच्या उपचारात योगदान दिल्याबद्दल २०२१ मध्ये ' आसाम वैभव ' असे विविध राज्य नागरी सन्मानही मिळाले आहेत. रतन टाटा हे केवळ उद्योगपती नव्हते तर ते सामाजिक जबाबदारी, आरोग्यसेवा आणि शिक्षणाचे खंबीर पुरस्कर्ते होते. 


तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की टाटा स्टीलच्या ब्लास्ट फर्नेसची देखरेख करणारी रतन टाटा यांची पहिली नोकरी होती. वास्तविक अमेरिकेत असताना रतन टाटा यांना ‘आयबीएम’ या बलाढ्य कंपनीचे बोलावणे होते. त्यांनी ते नाकारले आणि त्याऐवजी भारतात परत येऊन टाटा समूहाच्या पोलाद कारखान्यात एखाद्या अन्य कुशल कामगाराप्रमाणे नोकरी पत्करली. सन १९९२ मध्ये इंडियन एअरलाइन्सचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यांना विचारण्यात आले, दिल्ली ते मुंबई दरम्यान कोणता प्रवाशी आहे, ज्यांनी तुमच्यावर सर्वाधिक प्रभाव टाकला. त्यात सर्वाधिक कर्मचाऱ्यांनी रतन टाटा यांचे नाव सांगितले. जेव्हा त्याचे कारण शोधले तेव्हा समजले, ते एकमेव असे व्हिआयपी होते, जे नेहमी एकटे जात होते. त्यांच्यासोबत त्यांची बॅग आणि फाईल उचलण्यासाठीसुद्धा असिस्टेंट नव्हता. विमानाचे उड्डान होताच ते आपले काम सुरु करत होते. देशात सात्त्विकतेने संपत्ती निर्मिती होऊ शकते आणि सभ्य, सुसंस्कृत, सालस, सोज्वळतेने राहता येते हे रतन टाटा यांनी दाखवून दिले. ते अत्यंत शिस्तबद्ध आणि संतुलित वर्तन असलेले टाटा हे पहिले उद्योगपती होते ज्यांनी एक लाखात कार देण्याचा संकल्प पूर्ण केला. रतन टाटा त्यांच्या साधेपणाने त्यांना इंडस्ट्रीत विशेष स्थान मिळवून दिले होते.  टाटा समूहाचे जागतिक समूहात रूपांतर करण्यात, ऑटोमोटिव्ह, पोलाद, तंत्रज्ञान आणि आदरातिथ्य यासारख्या क्षेत्रांमध्ये त्याचा प्रभाव वाढवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने जग्वार लँड रोव्हर आणि कोरस स्टीलसह ऐतिहासिक अधिग्रहण केले आणि जागतिक स्तरावर आपले स्थान मजबूत केले.


त्यांची अफाट संपत्ती आणि अफाट प्रभाव लोकांवर असूनही, रतन टाटा त्यांच्या नम्रता आणि साधेपणासाठी प्रशंसनीय ठरलेत. नैतिक नेतृत्वाबद्दलचे त्यांचे समर्पण आणि व्यवसायाचा चांगल्यासाठी शक्ती म्हणून वापर करण्याचा त्यांचा विश्वास यामुळे ते सर्वांसाठी एक आदर्श ठरले. रतन टाटा यांचा वारसा केवळ त्यांच्या व्यावसायिक कामगिरीनेच नव्हे तर त्यांच्या नैतिक नेतृत्व आणि सामाजिक जबाबदारीनेही दिसून आले. त्यांनी नेहमीच सामाजिक कल्याणाला प्राधान्य दिले, शिक्षण, आरोग्यसेवा आणि ग्रामीण विकासासाठी संसाधने समर्पित केली. रतन टाटा हे केवळ व्यापारी नेते नव्हते; त्यांची दृष्टी, सचोटी आणि नम्रता यांनी भारताच्या कॉर्पोरेट लँडस्केपवर अमिट छाप सोडली होती. त्यांच्या परोपकारी हितसंबंधांसाठी त्यांची खूप प्रशंसा झाली, ज्यात शिक्षण, औषध आणि ग्रामीण विकासामध्ये संशोधन आणि सुधारणांचा समावेश आहे. त्यांनी रुग्णालये आणि संशोधन केंद्रे स्थापन केली आणि वर्धित केली ज्यांनी कर्करोगाची काळजी घेण्यास मदत केली. टाटा समूह आणि टाटा ट्रस्ट नावाच्या संबंधित परोपकारी समूहाने दिलेल्या देणग्यांमुळे यूएस विद्यापीठांमध्ये विविध संस्था आणि शिष्यवृत्तींची स्थापना झाली आहे. यामध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठ , सॅन दिएगो येथे जैविक आणि भौतिक विज्ञान संशोधन सुविधा आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधील एक कार्यकारी केंद्र यांचा समावेश आहे. 


टाटा त्यांच्या प्राण्यांवर, विशेषतः कुत्र्यांवरच्या प्रेमासाठी ओळखले जात होते. टाटांनी आयुष्यभर प्राणी कल्याणाचा पुरस्कार केला. बॉम्बे हाऊस, टाटा समूहाच्या मुख्यालयात, टाटा यांनी हे सुनिश्चित केले की भटक्या लोकांना सुसज्ज कुत्र्यासाठी प्रवेश मिळेल आणि त्यांना आवारात मुक्तपणे फिरण्याची परवानगी आहे. प्राण्यांच्या हक्कांचे उत्कट समर्थक म्हणून ओळखले जाणारे, त्यांनी लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमधील एक शाही कार्यक्रम देखील वगळला होता. कॉर्पोरेट टायटनने मुंबईच्या महालक्ष्मी परिसरात टाटा ट्रस्ट्स स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल सुरू केले.  त्यांनी १६५ कोटी रुपयांचा पाळीव प्राणी रुग्णालय प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली तेव्हा ज्येष्ठ उद्योगपती रतनजी टाटा म्हणाले, "पाळीव प्राणी हे आमचे कुटुंब आहे आणि त्यांचे जीवन प्रत्येक पाळीव पालकांसाठी महत्त्वाचे आहे. मी आजूबाजूला पाहिले आणि पायाभूत सुविधांचा अभाव पाहिला. भारतातील पाळीव प्राणी, यामुळे मला आश्चर्य वाटले की, एवढ्या मोठ्या पाळीव प्राण्यांच्या लोकसंख्येच्या मोठ्या देशात, जीव वाचवणारी आणि पाळीव प्राण्यांचे जीवन चांगले बनवणारी सुविधा आपल्याकडे का नाही?"


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रतनजी बदल "श्रीमंत योगी" हा शब्द वापरला तो खऱ्या अर्थाने सार्थक ठरतो. त्यांनी त्याच संपूर्ण आयुष्य एका योगी तपस्वी सारखे लोककल्याणकारी विचाराने जगले. अश्या महानायकाला "भारतरत्न " देऊन सन्मानित करावे हि संपूर्ण भारतीयांनी इच्छा. 


सचिन कृष्णा तळे 

Monday, 30 September 2024

जागतिक हृदय दिनाच्यानिमित्ताने चला घेऊ हृदयाची काळजी

 जागतिक हृदय दिनाच्यानिमित्ताने चला घेऊ हृदयाची काळजी 



"भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. मात्र भारतातील हीच तरुणाई बदलती जीवनशैली, वाढता तणाव, आहार व व्यायाम यांच्या बिघडलेल्या संतुलनाने विविध व्याधींनी ग्रासल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे तरुणांमध्ये वाढणारे हृदयविकाराचे प्रमाण. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा असे अनेक आजार सर्वच वयोगटातील लोकांमध्ये वाढलेले दिसत आहेत. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग हे भारतातील मृत्यूचे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. अश्यावेळी निरोगी हृदय ठेवण्यासाठी, हृदय संधर्भात जनजागृती होण्यासाठी जागतिक स्तरावर दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. देशात लहान वयात अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्युमुखी पडणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अगदी वयाच्या १२ व्या वर्षीही मुलांना हृदयविकाराचा झटका आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने एका अहवालात म्हटले आहे की, भारतामध्ये होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी २० टक्के मृत्यू हे हृदयविकारामुळे होतात."


हृदयविकार किंवा हृदयाची स्थिती ही विविध समस्या आहेत जी तुमच्या हृदयावर परिणाम करू शकतात आणि त्यांना अनेकदा असे म्हटले जाते हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग. यामध्ये हृदयातील जन्मजात विकृती, अनियमित हृदयाचे ठोके आणि रक्तवाहिन्यांचे विकार यांचा समावेश असू शकतो. हृदयविकाराचा झटका कोरोनरी धमनी रोगामुळे होऊ शकतो, हा हृदयविकाराचा सर्वात प्रचलित प्रकार आहे. हृदय निरोगी राहण्यासाठी योग्य आहार आणि नियमित जीवनशैली आवश्यक आहे. पण त्यासोबत जड, गरम, मसालेदार, आंबट-तिखट पदार्थांचे अतिसेवन; जास्त शारीरिक श्रम, भीती, ताणतणाव, जास्त किंवा कमी खाणे, नैराश्य, राग इत्यादींमुळेही हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. हृदय हा शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. दिवसातून सुमारे दहा लाख वेळा आणि एका मिनिटात ६०-९० वेळा धडकते.  तज्ज्ञांनी हृदयविकाराचा धोका वाढवणाऱ्या अनेक घटकांकडे लक्ष वेधले आहे. सोडियमचे अधिक प्रमाण असलेला आहार, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, अति मद्यपान, खूप सक्रिय नसणे आदी कारणांनी हृदयविकाराला आमंत्रण मिळते. उच्च हिमोग्लोबिन पातळी देखील तुमच्या हृदयाचा धोका वाढवू शकते. हृदयविकाराचा झटका येण्याची बरीच कारणं आहेत. त्यात हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्ताच्या धमन्यांमध्ये फॅट जमा (कॅल्शियम कमी असल्याने) झाल्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो. अशा परिस्थितीत, रक्तवाहिन्यांमधील अडथळा वेळेवर दूर केला नाही तर शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. आणि छातीत वेदना जाणवू लागतात. यालाच हृदयविकाराचा झटका म्हणतात आणि तो जीवघेणा ठरू शकतो.


हृदयविकाराचा धोका हा वयोमानापरत्व वाढता असला तरीही त्याची लागण ही अनेक अनुवंशिक आणि पर्यावरणातील घटकांवरही अवलंबून असते. मात्र अलीकडे तरुणांना हृदयविकाराचा धोका वाढता असल्याचे निष्पन्न झाले आहे. वयाच्या विशीमध्ये आणि तिशीमध्येही तरुणांना हृदयविकार होण्याचे प्रमाण वाढले आहे. कधीकधी एसिडिटी किंवा गॅसेसच्या त्रासामुळे देखील आपल्याला अस्वस्थ वाटू शकतं. हाच त्रास असेल असा गैरसमज होऊन लोक या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात. अशा वेळी योग्य उपचार न मिळाल्याने लोकांना जीव गमवावा लागल्याची अनेक प्रकरणे आहेत. तरुणांनानी जर आहार आणि जीवनशैलीतील बदल आजपासूनच केले तर हृदयरोगाच्या संभाव्य शक्यतेला दहा ते पंधरा वर्षं पुढं ढकललं जाऊ शकतं. काही लोकांच्या बाबतीत तो पूर्णतः टाळलाही जाऊ शकतो हे लक्ष्यात घेतले गेले पाहिजे. जेव्हा हृदयाच्या स्नायूंना पुरेसा रक्त प्रवाह मिळत नाही तेव्हा इस्केमिक हृदयरोग होतो, ज्यामुळे छातीत दुखणे किंवा हृदयविकाराचा झटका येतो.


हार्ट अटॅक आल्यानंतरच्या पहिला तासाला डॉक्टर 'गोल्डन अवर' म्हणतात. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी आणि रिकव्हरीसाठी हा एक तास अत्यंत महत्त्वाचा ठरतो. लक्षणं दिसताच रुग्णाला पहिल्या तासात वेळेवर आणि योग्य उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचवता येऊ शकतो. या एक तासात हृदयाच्या रक्तवाहिनीत निर्माण झालेला अडथळा पहिल्या तासातच मोकळा करण्यात आला. तर, हार्ट अटॅक रिव्हर्स होण्याची शक्यता जास्त असते. हृदयाला रक्तपुरवठा न झाल्याने हृदयाचे स्नायू ८०-९० मिनिटांनी हळूहळू मृत पावण्यास सुरूवात होते. उपचारासाठी उशीर झाला तर हृदयाचे ठोसे अनियमित होतात. लक्ष्यात असू द्या छातीत दुखू लागल्यानंतर नातेवाईकांनी क्षणाचाही वेळ घालवू नये. तातडीने जवळच्या रुग्णालयात पोहोचून ECG काढावा. हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीचं हृदय अचानक बंद पडतं आणि तो व्यक्ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळतो. अशा व्यक्तीला योग्य वेळी CPR दिल्यास जीव वाचू शकतो. मेंदू आणि शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांना CPR दिल्यामुळे रक्तप्रवाह सुरू रहातो. हार्ट अटॅकमुळे अचानक बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीच्या छातीवर दोन्ही हातांच्या मदतीने लोक दबाव देतात. या प्रक्रियाला कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन CPR असं म्हटलं जातं. 



हृदय कमकुवत का होते ?


- तणावपूर्ण आयुष्य

- खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा

- धूम्रपान, तंबाखू, दारूचं व्यसन

-उशिरापर्यंत काँप्युटरवर काम

- धूम्रपान, तंबाखू, दारूचं व्यसन


हार्ट अटॅकची लक्षणं?


- छातीत दुखतं, अस्वस्थ वाटणे

- छातीतून हात, जबडा, मान, पाठ, पोट याकडे जाणाऱ्या मार्गात कळा

- मन अस्वस्थ होणे

- चक्कर येणे

- प्रचंड घाम येणे

- श्वास घेण्यात अडचण

- खोकल्याची मोठी उबळ येते. जोराजोरात श्वास घेणे


सचिन कृष्णा तळे

Thursday, 19 September 2024

चुकले आमचे काही तर क्षमा असावी... SORRY BAPPA

 चुकले आमचे काही तर क्षमा असावी... SORRY BAPPA 





"आपण आपल्या लाडक्या बाप्पा ला निरोप दिला, निरोप देताना "चुकले आमचे काही तर क्षमा असावी" म्हणून विनवणी केली. पण ज्या लाडक्या बाप्पा ला आपण आनंदात घरात विराजमान केलं, ज्या मूर्तीत आपण आपल्या बाप्पा ची आराधना केली , ज्याच्या पायावर आपण दहा दिवस पूजा केली ती बाप्पा ची मूर्ती आज कोणत्या अवस्थेत असेल याचा कोणीच विचार का करत नाही ? आपले देव हे आपल्या मनोरंजन चा भाग नसून श्रद्धेचा अन आपल्या आत्म्याशी एकरूप झालेल्या त्या परमेश्वराचा अंश आहे आणि आपण हे विसरूलोय ! निसर्गाच्या अंशापासून गणपतीची मूर्ती तयार होते आणि शेवटी निसर्गतःच ती विलीन करायची असते. गणेश विसर्जनाच्या वेळेस विसर्जन हे फक्त मूर्तीचेच करायचे नसते तर आपल्यातील दुर्गुणांचेसुद्धा करायचे असते. नकळत आपणच आपल्या देवाची विटंबना करतोय , हे थांबलं पाहिजे"  


‘गणपत्ती बाप्पा मोरया’ चा जयघोष करीत घरोघरी आणि शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना होते. गणेशोत्सवामुळे शहरात गावात अन घरोघरी उत्साहाचे वातावरण होते. बघता बघता १० दिवस कसे गेले कोणालाच कळले नाही. गणेश चतुर्थीच्या सर्वात उल्लेखनीय पैलूंपैकी एक म्हणजे जात, पंथ आणि सामाजिक स्थितीचे अडथळे तोडून लोकांना एकत्र आणण्याची शक्ती. संपूर्ण भारतातील व्यस्त शहरे आणि लहान गावांमध्ये हा सण समान उत्साहाने साजरा केला जातो. सुंदर देखावे उभारण्यासाठी लहान मोठे थोर सगळे समुदाय एकत्र येतात, जेथे लोक जमू शकतात, प्रार्थना करू शकतात आणि आशीर्वाद घेऊ शकतात असा एकमेव सार्वजनिक उत्सव म्हणजे गणेशोत्सव आहे. गणेश उत्सव विविधतेत एकता दर्शवते कारण सर्व लोक उत्सवात सामील होतात. एकजुटीची ही भावना प्रत्येकामध्ये मैत्री, समज आणि सुसंवाद वाढवते. खूप मोठ्या प्रमाणत या दहा दिवसांत आर्थिक उलाढाल होते तर अश्या सणाला काही ठिकाणी काही समाजकंठकांकडून गालभोट लावण्याचा प्रयत्न देखील होतो आणि त्याचे रूपांतर नकळत दंगलीत दिसून येते.  


गणपती विसर्जन पाण्यातच का केले जाते या मागे काही धार्मिक करणे आहेत. तसेच हिंदू धर्मात अनेक विधी हे निसर्गाशी निगडीत आहे. निसर्गाशी एकरूपता राखण्याचा संदेश वेगवेगळ्या पद्धतीने कायमच दिला जातो. गणपती विसर्जनाच्या बाबतीतही असेच आहे.  गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर त्याची पूजा करून विसर्जन करण्याचे हे व्रत एक किंवा दीड दिवसाचे आहे. पण, उत्सवात आणखी रंगत आणण्यासाठी किंवा कित्येक जण नवस पूर्ण करण्यासाठी पाच दिवस, सात दिवसांनी गणेशमूर्तीचे विसर्जन करतात. गणेशभक्त आपल्या हौसेनुसार गणेशमूर्तीचे विसर्जन पाचव्या किंवा सातव्या किंवा दहाव्या दिवशी करतात. विसर्जनावेळी भव्य देखावे रथ अन न ऐकू वाटणारे डीजे अन बेसूरेली गाणी तर कुठे ढोल ताशांचा गजर तर कुठे लेजीम अन टाळ गर्जना. प्रत्येकजण आपआपल्या परीने देवाला निरोप देण्याचा प्रयत्न करतो. त्यात मंडळाची चढाओढ भयानक रूप धारण करून रस्त्यावर उतरतात. गणपतीला जल तत्वांचा अधिपती मानलं जातं. त्यांच्या विसर्जनाचं मुख्य कारण तर हेच आहे की, अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची पूजा-अर्चा करून त्यांना पुन्हा पाण्यात विसर्जित केलं जातं. म्हणजेच ते ज्याचे अधिपती आहेत तिथे त्यांना पोहोचवलं जातं. पण देवाला निरोप देण्याचा मार्ग चुकतोय! ज्या प्रकारे आपण निरोप देतोय ती आपली संस्कृती नाही तसे आपले धार्मिक शिकवण नाही. 


ज्यावेळी महर्षी व्यास महाभारताची निर्मिती करत होते त्यावेळी गणपती बाप्पा लेखनिकाची भूमिका बजावत होते. महाभारत लिहिण्याचे काम हे दहा दिवस अविरतपणे चालू होते. त्यामुळे गणपती बाप्पांनी शरीर गरम न व्हावे म्हणून अंगाला माती लिंपल्याचे सांगितले जाते. हा गणपती बाप्पांचा विशेष अवतार असल्यामुळे त्यांना दहा दिवसानंतर जलसमाधी देतात अशी वंदता आहे. कदाचित या दहा दिवसात बाप्पाची ऊर्जा टिकून राहावी म्हणून नैवैद्यासाठी गोडधोड, मोदक वगैरे करण्याची परंपरा आहे.अहोरात्र लिहिण्याच्या कामामुळे शरीर उष्ण झाल्यामुळे पाण्यात डुबकी मारल्याविना गत्यंतर नव्हती असेही अख्यायिका आहे. त्यामुळे गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी करतात. अशी पौराणिक कथा आहे म्हणून आपण आपल्या लाडक्या बाप्पाला दहा दिवसाने निरोप देत त्याचे पाण्यात विसर्जन करतो. 


पण विसर्जनानंतर ज्या ठिकाणी आपण आपल्या बाप्पा ला निरोप देतो त्या ठिकाणी तोच आपला बाप्पा काय अवस्थेत असेल याची आपल्याला काहीही पडलेले नसत. नकळत आपण च आपल्या देवाची विटंबना तरी करत नाही ना ? अशी शंका सुद्धा आपल्या मनाला शिवत नाही हे नवलच.  शाडू माती किंवा माती पासून गणेशाची मूर्ती तयार करून ती माती पाण्यात पूर्ण विरघळी जाईल याच भावनेने या सणाची सुरवात झाली असेल पण बघता बघता मातीच्या जागी प्लास्टर ऑफ पॅरिस ने जागा घेतली आणि नदी काठी , समुंद्रा च्या काठावर असंख्य गणेश मुर्त्या ज्या अवस्थेत दिसू लागली ते पाहून मन अस्वस्थ होत. त्या सुंदर मुर्त्या पाहून त्याची विटंबना पाहून असं वाटत आता नको हा उत्सव. प्लास्टर ऑफ पॅरिसचे विघटन होत नाही. विसर्जनानंतर समुद्र वा अन्य जलाशयात हे पीओपी तसेच पडून राहते. त्यामुळे पीओपीची उंच मूर्ती एकदा आणली की तिचे विसर्जन करू नये. शक्यतो केवळ लहान पूजनाच्या मातीच्या मूर्तीचे विसर्जन करावे. 


आता पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करायचा म्हटलं, तर सर्वप्रथम गणपतीच्या मूर्तीचा विचार केला तर. या मूर्ती वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करण्याची प्रथा आहे. वाहते पाणी म्हटले की, सर्वांत आधी नदी डोळ्यांसमोर येते. परंतु, शहरांमधील नदी वाहती वाटली, तरी ती मानवनिर्मित प्रदूषणामुळे मृतवत झालेली आहे. जे पाणी आपण दूषित केलं, जे पाणी आपण प्राशन करू शकत नाही त्याच पाण्यात देवाची मूर्ती विसर्जित करणे योग्य आहे का? 


असो, गणपती ही वैश्विक आणि वैदिक देवता असून हिंदू धर्मात कोणत्याही कार्याचा शुभारंभ करण्याच्या आधी सर्वांत प्रथम विघ्नहर्त्या गणेशाचे पूजन केले जाते. अश्या गणेशाची प्रतिमात्मक छोटी मूर्ती ची पूजा करून त्याची विसर्जन करण्याचं ठरवू आणि देवाचं देवपण टिकवून ठेवू. 


सचिन कृष्णा तळे 

Saturday, 7 September 2024

"गणेशोस्तव"- जगभरातील भक्तिमय चळवळ

"गणेशोस्तव"- जगभरातील भक्तिमय चळवळ 


"खरं तर तो कुठेच जात नाही, इथेच असतो. अनादी,अनंत आणि असीम अशा काळावर अधिराज्य गाजवणाऱ्या या आपल्या लाडक्या देवाला आपण काय बसवणार आणि विसर्जित करणार. प्राणप्रतिष्ठापना आणि विसर्जन हे आपल्या मनाचे खेळ आहेत. गणेश म्हणजे या श्रुष्टीचं तत्व. विसर्जन हे माणसांचं होत, देवाचं नाही. बाप्पा वेगवेगळ्या दिवसांसाठी घरात विराजमान होतात. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, दहा दिवस तर काही जणांकडे एकवीस दिवस देखील गणपतीची स्थापना केली जाते. आता गणेशोत्सव हा महाराष्ट्र किंवा भारत इतकाच मर्यादित राहिला नाही तर जगभरात बाप्पा विराजमान होतात आणि गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. लोकांना एकत्र आण्यासाठी चालू झालेली हि भक्तिमय चळवळ जगभरात अश्या प्रकारे रुजली कि इथला प्रत्येक व्यक्ती हा भगवंताची वर्षभर वाट पाहतो. आणि जेव्हा तो दिवस उजाडतो तेंव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येतो." 





पहिला सार्वजनिक गणेशोत्सव हा भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ साली सुरू केल्याचा सांगण्यात येत तर ब्रिटीश राजवटीत जेव्हा अत्याचार वाढू लागले आणि कलम १४४ नुसार, इंग्रजांनी भारतीय क्रांतिकारकांना गटांमध्ये एकत्र येण्यापासून रोखले, तेव्हा प्रसिद्ध क्रांतिकारक लोकमान्य टिळकांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक नवीन आणि अनोखा मार्ग म्हणून १८९४ मध्ये पुण्यातील शनिवाड्यात गणपती उत्सव सुरू केला. असुर रूपातील ब्रिटिशांच्या सत्तेचा, गणपती बाप्पा नायनाट करत आहे, अशी संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून भाऊसाहेब रंगारी यांनी राक्षसावर प्रहार करून त्याचा नायनाट करणारी लाकूड व भुशाचा वापर करून गणेशाची मूर्ती बनवली आणि त्याची स्थापना केली. भाऊ साहेब रंगारी यांनी गणेशोत्सवाला सर्वप्रथम सार्वजनिक रूप दिलं असलं तरी, देशभर त्याला व्यापक स्वरूप व दिशा देण्याचे काम टिळकांनी केलं. पण महाराष्ट्रात घराघरात गणपती बसवण्याची परंपरा शिवपूर्व काळातील आहे. नानासाहेब पेशव्यांनी शनिवारवाड्यात मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. पेशव्यांचे सरदार देखील त्यांचं अनुकरण करू लागले होते. पुरंदरसारख्या किल्ल्यांवर देखील गणेशोत्सव साजरा केला जात असे. 


महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. यातही मानाच्या पाच गणतींचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही लोक येतात. गणेशोत्सवाला सुरुवात होत असून यानिमित्ताने आपण मानाच्या पाच गणपतींची माहिती घेऊ. पुण्यातील मानाचे पाच गणपती, दगडूशेठ, मंडई, बाबूगेनू असे नवसाला पावणारे गणपती म्हणून ओळखले जातात. त्यांना गणेशोत्सवात विशेष महत्व असते. 


मानाचा पहिला गणपती – कसबा गणपती

पुण्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखला जाणारा कसबा गणपती हा पुण्यातील मानाचा पहिला गणपती आहे. शनिवारवाड्याच्या जवळ शहराच्या मध्यवस्तीत कसबा पेठ येथे कसबा गणपतीचे पेशवेकालीन मंदिर आहे. या मंदिराला १४०० वर्षांचा इतिहास आहे. विशेष बाब म्हणजे कसबा गणपतीची ही मूर्ती तांदळा स्वरूपात आहे. तांदळा स्वरूप म्हणजे ही मूर्ती घडवण्यात येत नाही. या गणपतीच्या डोळ्यांत हिरे आहेत. ही मूर्ती स्वयंभू असून, साडेतीन फूट उंचीची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे मंदिर आहे, असे म्हटले जाते. १६३६ मध्ये जेव्हा शहाजीराजांनी लाल महाल बांधला तेव्हा त्याच्या बाजूलाच जिजामातांनी या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. १८९३ साली कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ कसबा गणपतीपासूनच होतो.


मानाचा दुसरा गणपती – तांबडी जोगेश्वरी गणपती

हे मंदिर कसबा गणपतीच्या जवळ आणि अगदी मध्यवस्तीत आहे. आधी गणपतीची प्रतिष्ठापना तांबडी जोगेश्वरी मंदिरात केली जात असे; पण २००० सालापासून मंदिराच्या बाहेर मंडपात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. भाऊ बेंद्रे यांनी बुधवार पेठेतील या गणेशोत्सवाला सुरुवात केली. तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची दुसरी ग्रामदेवता मानली जाते आणि याच मंदिराच्या परिसरात गणपतीची ही मूर्ती असल्याने देवीच्या नावाने हा गणपती ओळखला जातो.  तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन केले जाते आणि दरवर्षी नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. आप्पा बळवंत चौकात तुम्हाला या गणेशाचं दर्शन करता येईल. 


मानाचा तिसरा गणपती - गुरुजी तालीम गणपती

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधीच म्हणजे १८८७ सालीच या गणपतीचा उत्सव सुरू झाला. या उत्सवाचा पाया रचला तो भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवाले, शेख कासम वल्लाद यांनी. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून हा गणपती ओळखला जातो. सुरुवातीला हा गणपती तालीममध्ये बसवला जायचा; पण आता ही तालीम अस्तित्वात नाही. तांबडी जोगेश्वरी गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या शेजारून जाणाऱ्या रस्त्याने तुळशीबागेच्या दिशेने चालत गेल्यावर लगेच गुरुजी तालीम गणपतीचे दर्शन घेता येत. 


मानाचा चौथा गणपती -तुळशीबाग गणपती

पुण्याचा मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती. दक्षित तुळशीबागवाले यांनी १९०० साली या गणेशोत्सवाला सुरुवात केली. विशेष म्हणजे ही मूर्ती फायबरची आहे. ज्येष्ठ मूर्तिकार डी. एस. खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करायचे. पुणे शहरातील आकाराने आणि उंचीने मोठी असलेली गणेशाची मूर्ती असल्याने हा गणपती भाविकांचे आकर्षण आहे.


मानाचा पाचवा गणपती – केसरी वाडा गणपती

पुण्यातला शेवटचा व पाचवा मानाचा गणपती म्हणून जो ओळखला जातो, तो म्हणजे केसरी वाडा गणपती. १८९४ पासून केसरी या लोकमान्य टिळकांच्या संस्थेने हा गणेशोत्सव सुरू केला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहत होते. १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी या संस्थेचा उत्सव होऊ लागला. त्यावेळी गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने या ठिकाणी होत असत. या गणपतीची विसर्जन मिरवणूकदेखील पालखीतूनच निघते. मानाच्या पहिल्या चारही गणपतींच्या विसर्जनाची मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरूनच जाते. मात्र, केसरी वाड्याचा गणपतीची मूर्ती केळकर रस्त्यावरून जाऊन विसर्जित होते.


सचिन कृष्णा तळे 

 

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale