Tuesday, 31 October 2017

विठ्ठलाच्या सोबतीने

विठ्ठलाच्या सोबतीने

विठ्ठलाच्या सोबतीने रुक्मीणी सुंदर दिसते
राधेच्या प्रेमाची ती प्रेम कहाणी सुंदर दिसते

द्वारकेला सांगा कृष्ण हरवला माझ्या गावी
गावात चंद्रभागेचें वाहते पाणी सुंदर दिसते

विठू एकटा नाही सोबत संतांचा हा पसारा
वाळवंटी बहुजनांची अभंगवाणी सुंदर दिसते

एकादशी ला जत्रा भरते ..  पंढरीच्या द्वारी
भक्तांची त्या देवाशी बांधणी सुंदर दिसते

तीर्थ पुंडलिकाचे कळस तुका ज्ञाना झाला
वैष्णवांच्या खेळाची ही मांडणी सुंदर दिसते

किती नामघोष किती पताका केशरी डोले
पायरीस स्पर्श होता जीवन गाणी सुंदर दिसते

सचिन कृष्णा तळे 
पुणे
७७०९०९९६४६


Friday, 27 October 2017

राष्ट्रगीत गाऊ ..

राष्ट्रगीत गाऊ ..

राष्ट्रगीत हे मंत्र राष्ट्राचे, प्राणाहुनही जपू
देवभूमीच्या प्रांगणात,चला आनंदे गाऊ .. राष्ट्रगीत गाऊ ..

वंद वंदे मातरम, पेटती लख क्रांती दिवे
तेजाने शूरतेने, सैन्याचे सज्ज अमर थवे
ह्या राष्ट्राचे कर्ते आपण राष्ट्र ध्वजा ही जपू
देवभूमीच्या प्रांगणात,चला आनंदे गाऊ .. राष्ट्रगीत गाऊ ..

चहूदिशानी प्रकाशगंगा वाहे संविधानाने
पूर्व दिशेने भारताची विजयी पाऊल उमटे
श्रुंखला ही जयजयकाराची आज पुन्हा जपू
देवभूमीच्या प्रांगणात,चला आनंदे गाऊ .. राष्ट्रगीत गाऊ ..

शत्रूंचे थैमान असे अन पदोपदी निखारे
तुजला ठार करण्या म्लेंछ चाले शतकाहून शतके
जी छबी भारताची आहे तोच हिंद आज पुजू
देवभूमीच्या प्रांगणात,चला आनंदे गाऊ .. राष्ट्रगीत गाऊ ..

तुझेच बलिदान देशा डफावर तुझे यशोगान
हिमवंत उभा बलवंत तुझाच आहे अधिकार
देश धर्म हाच एक आपुल्या मंदिरी जपू
देवभूमीच्या प्रांगणात,चला आनंदे गाऊ .. राष्ट्रगीत गाऊ ..

हिंदू मुस्लिम शीख इसाई बुद्ध भाई भाई
रंग एक सगळ्यांचा भारत तिरंगा परी
क्रांतिकारकांच्या रक्ताची लाज आज राखू
देवभूमीच्या प्रांगणात,चला आनंदे गाऊ .. राष्ट्रगीत गाऊ ..

सचिन कृष्णा तळे 
पुणे
७७०९०९९६४६



Thursday, 26 October 2017

माझी मुलगी

माझ्या नशिबी, माझी मुलगी


किती कोवळी, किती भोळी, किती प्यारी आहे ती 
माझ्या नशिबी, माझी मुलगी, किती न्यारी आहे ती 

रोज येता कामावरूनी, देते प्रेमळ आलिंगन मला 
जणू सोहळे आनंदाचे, विरून जातो थकवा माझा
घरात असतो कल्लोळ आणिक खेळ दोघांचा 
चोरून पहाते आई माझी, सोबत असते बायको ती 
किती कोवळी, किती भोळी, किती प्यारी आहे ती 

बोबड्या स्वरात ती, खुणवते मज काही बाई 
लाडात असते रोज, येता बाप लवकर घरी 
खाऊ नको तिला, नको असते दुनियादारी 
घेऊन चला बागेत, धरते हट्ट  रोज रोज ती 
किती कोवळी, किती भोळी, किती प्यारी आहे ती  

माझ्या परीला आवडते, गोष्ट राजा राणीची
मोठे महाल अन जंगलातल्या वाघोबाची 
ऐकत बसते निवांत झोपते कुशीत माझ्या 
विसरून जातो जग सारे, अशीच असते रोज ती
किती कोवळी, किती भोळी, किती प्यारी आहे ती   

शाळा कॉलेज ची वाट चालेल होईल मोठी ती 
येईल राजा जाईल सासरला सोडून आठवणी 
दिवस कसे भर्रकन उडून जातील हातामधुनी 
माझ्या सोबत राहतील फक्त माझ्या परीची गाणी 
किती कोवळी, किती भोळी, किती प्यारी आहे ती  

थकलेल्या हाताने जेव्हा, हाक मारेल देवा 
दिसावे सुखी संसार तिचे, इतकीच असेल ईच्छा 
त्या कोमल हाताने घडला होता बाप माझ्यातला 
माझ्या नशिबी, माझी मुलगी आहे जीवन सरी  
किती कोवळी, किती भोळी, किती प्यारी आहे ती  

सचिन कृष्णा तळे 
पुणे 



Wednesday, 25 October 2017

स्वामी नामाचा,लागो मज, छंद छंद ...


स्वामी नामाचा,लागो मज, छंद छंद ...

मी भक्त त्यांचा सेवेकरी
असे कृपा त्यांची मजवरी
दुःख  हरी नि सुख करी
स्वामी आमचे गिरिधारी
आज पाहावा, जिथे तिथे, आनंद आनंद  
स्वामी नामाचा,लागो मज, छंद छंद ...

अजानबाहू रूप सावळे
अक्कलकोटी देव मिळे
समर्थांची नि वडाची
चोहीकडे दत्त सोहळे  
दिगंबरा दत्तात्रयाचे, दिसे असे, रंग रंग
स्वामी नामाचा,लागो मज, छंद छंद ...   

स्वामी माय स्वामी बाप 
स्वामी आमची चारी धाम 
विश्वेश्वरा हे शंकरा 
अक्कलकोट हेच कैलास 
स्वामी स्पर्शाने स्वामी कीर्तने रंगे अभंग अभंग 
स्वामी नामाचा,लागो मज, छंद छंद ...  

सचिन कृष्णा तळे 
पुणे 



Tuesday, 24 October 2017

माझी मायं

शेतात बाप राबतो सोबत असते माझी मायं
खेड्यातलया विश्वात कशी सजते माझी मायं 

शेणा मातीचं घरं त्याचा उंबरटा असे पवित्र
संस्काराचे धन लुटते शिकवते माझी मायं 

प्रवास करावा पाखराणी ज्या ज्या वाटेवर
त्या वाटेची मग दिशा ठरवते माझी मायं

मालभावाला कंटाळून बाप निजतो रातील
त्याच्या सोबत उपाशी निजते माझी मायं

तिच्या पदरी जणू नांदतो विठू पंढरीचा
दुष्काळाने जेव्हा ... हंबरते माझी मायं

मातीचा गंध सांज वेळी जेव्हा दिवे पेटवतो
तेव्हा तुळशीचे आंगणगीत गाते माझी मायं

सचिन कृष्णा तळे 
पुणे 

Sunday, 22 October 2017

पावसाळी रात्र ही...

पावसाळी रात्र ही...

पावसाळी रात्र ही, चंद्र ही भिजला होता !
मिठीत प्रेमाने तो, एकदा निजला होता !

लाज माझी वेडी, ओठांवरुनी बावरली
मी ही सजली होती, तो ही सजला होता !

मधुचंद्राच्या आंगणीं, त्या मदनच्या द्वारी
दोघासांठी रिकामा, एक मजला होता !

स्पर्शाची जादू होती, मी माझ्यात नव्हती
खेळ हा निसर्गाचा, कोणी रचला होता  !

टाळता आले ना काही, होकार दोघांचाही
मी ही रमली होती, तो ही रमला होता !

नेमके होतो कुठे, दोघांस ठाऊक नव्हते
जरा हारली मी, जरा तो जिंकला होता !

सचिन कृष्णा तळे
पुणे
७७०९०९९६४६

Monday, 16 October 2017

कोणता पक्ष कोणता नेता हवा तुम्हाला
विकासाला राजा जाणता हवा तुम्हाला

मतदार आहात कि आहात सौदागर तुम्ही
देशासाठी सत्तेवर खरा कर्ता हवा तुम्हाला

खुप झाले राजकारण खुप झाला विकास
लोकांसाठी राबणारा आता हवा तुम्हाला

कळुन चुकेल तेव्हा नुसती होती बडबड
चांगल्या राजकारणीचा पत्ता हवा तुम्हाला

घोषणा भाषण आश्वासन मिळेल फक्त
निवडणुकीत कसा भत्ता हवा तुम्हाला

हातात टाळी नको आता असावी गालावरती
तुमच्यासाठी तसाच कार्यकर्ता हवा तुम्हाला


#सचिन_तळे

www.sachinktale.blogspot.com

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale