Tuesday, 9 July 2024

विशाळगड किल्ले खेळणा चा खरा इतिहास





" स्वराज्यात असलेल्या प्रत्येक गड किल्ल्याला प्रभू शिव छत्रपतींचा सहवास अन इतिहास लाभला आहे. प्रत्येक गडाची एक वेगळी कहाणी आहे. इथले गड किल्ले म्हणजे दगड मातीने उभारलेल्या भिंती नसून या सह्याद्रीच्या कुशीत राहणाऱ्या तमाम मराठी बांधवांचे श्रद्धास्थान आहेत. मुघलांनी बायका नाचवण्यासाठी महाल उभे केले पण आपल्या राजाने बायका वाचवण्यासाठी गड किल्ले उभारले. एकेकाळी आपल्या संरक्षणाची पूर्ण जवाबदारी या गड किल्ल्यांवर होती , आज याच गड किल्ल्यांची संरक्षण ची जवाबदारी आपली आहे हे विसरू नका. ज्याने आपल्या पूर्वजांचे रक्त काढले तो कसा काय तुमच्या ईच्छा पुर्ण करेल हा साधा विचार न करता आपलीच लोक कोंबड्या बकरीचे मटण खाण्यास विशाळगडावर जातात. पुर्वजांनी हा गड राखण्यासाठी रक्ताचे पाणी केले, प्रसंगी बलिदानही केले याची जाणीव महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना कधी होणार.  "

विशाळगड अर्थात किल्ले खेळणा गेल्या काही दिवसापांसून सतत चर्चेत आहेत कारण तिथे विस्तारित चाललेली मुघल सेनापती मलिक रेहान ची कबर जी आज हजरत पीर मलिक रेहान साहेब दर्गा ट्रस्ट नावाने आहे. हिंदूंना प्रिय असणाऱ्या देवस्थानावर उदारहणार्थ काळूबाई च्या डोंगरावर पशुहत्या बंदी असताना या विशाळगडावरील दर्ग्याला पशुहत्या ची परवानगी मिळाली. त्या दिवसापासून या दर्ग्याची चर्चा जास्त होऊ लागली. १४६९ साली बहामनी सुलतानाने त्याचा सेनापती मलिक रेहान याला खेळणा किल्ला घेण्यासाठी पाठविले. सहावेळा प्रयत्न करूनही त्याला हा किल्ला घेता आला नाही. सातव्या प्रयत्नात ९ महिन्याच्या निकराच्या प्रयत्नाने त्याला हा किल्ला घेता आला. याच  मलिक रेहानच्या नावाचा दर्गा या किल्ल्यावर आहे असे सांगितले जाते. विशाळगडाचा इतिहास पाहण्याआधी मलिक रेहान कोण होते ? आणि ते विशाळगडावर का आले ? हे तिथल्या मुस्लिम बांधवानी समजून घेणे गरजेचे आहे. आक्रमण करण्यासाठी आलेला सरदार हीच आमच्यासाठी त्या दर्ग्याची ओळख. या दर्ग्याच्या आसपास याच समाजातील लोकांची वाढत चाललेली अनधिकृत वस्ती अन दुकाने गडाची सुंदरता संपवण्याच्या मार्गावर आहे. गडावर छोट्या मोठ्या भरपूर अतिक्रमण केलेली खानावळी व हॉटेले असून तिथे पर्यटकांच्या आवडीप्रमाणे मासांहार जेवण उपलब्ध आहे इतकंच नाही तर मद्यपान देखील दिसून आले आहे.  

सह्याद्री डोंगररांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विशाळगड उभा आहे. कोकणातील बंदरे व कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणाऱ्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी हा किल्ला बांधला गेला. इ.स. ११९० च्या सुमारास दुसरा राजा भोज याने आपली राजधानी कोल्हापूरहून पन्हाळ्यावर हलविली. त्यानंतर त्याने घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले बांधले. त्यापैकी 'किशागिला' हा एक किल्ला होता. किशीगीला – भोजगड – खिलगिला – खेळणा उर्फ आजचा विशाळगड. शिवरायांनी विशाळगडाच्या मजबूतीकरिता ५००० होन खर्च केल्याचा उल्लेख आहे.  

विशाळगडाची उभारणी इ.स. १०५८मध्ये शिलाहार राजा मारसिंह याने केली. हा गड किल्ले खेळणा या नावाने देखील ओळखला जात होता. 

२८ नोव्हेंबर १६५९ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला. त्याच वेळेस खेळणा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव ‘विशाळगड’ ठेवले.   

३ मार्च १६६०ला सिद्दी जौहारने पन्हाळ्याला वेढा घातला. त्याचवेळी जसवंतराव दळवी व शृंगारपूरचे सूर्यराव सुर्वे विशाळगडाला वेढा घालून बसले होते. पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे जाताना महाराजांनी हा वेढा फोडून काढला व महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले. त्याआधी पावनखिंडीत ३०० निवडक मावळ्यांसह बाजीप्रभूंनी सिद्दीचे सैन्य रोखून धरले व आपल्या प्राणांची आहुती दिली. 

इ.स. १६८९ मध्ये संभाजी महाराज विशाळगडावरून रायगडाकडे जातांना संगमेश्वर येथे तुळापूरी पकडले गेले व त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर राजाराम महाराजांच्या काळात विशाळगड मराठ्यांच्या हालचालींचे प्रमुख केंद्र होता. 

१७०१ साली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई विशाळगडावर सती गेल्या. 

इ.स. १७०७ मध्ये ताराराणीने विशाळगड पुन्हा जिंकून घेतला. पुढे विशाळगड करवीरकरांच्या ताब्यात गेला. पण १८४४ साली इंग्रजांनी आपला विशाळगड जिंकून त्यावरील बांधकामे पाडून टाकली.

विशाळगडावर पाहण्यासारखे ठिकाण - 

एस.टी. किंवा खाजगी वाहनाने विशाळगडासमोरील वाहनतळावर उतरल्यावर, वाहनतळात व विशाळगडामध्ये एक दरी दिसते. पूर्वी या दरीत उतरुनच विशाळगडावर जावे लागत असे. परंतु आता या दरीवर लोखंडी पूल बांधलेला आहे. शिडीच्या वाटेने चढल्यावर दर्ग्याच्या अलीकडे डाव्या हाताला एक पायऱ्यांची वाट खाली उतरते. या वाटेने गेल्यावर दोन रस्ते फुटतात. उजव्या बाजूची नव्या पायऱ्यांची वाट भगवंतेश्वर मंदिर / राजवाडा / टकमक टोक येथे जाते. तर डाव्या हाताची जुनी फरसबंदी दगडांची वाट अमृतेश्वर मंदिर / बाजीप्रभुंची समाधी येथे जाते. अमृतेश्वर मंदिरापाशी कड्यावरून पडणारे पाणी साठी कुंड आहे. मंदिरात पंचाननाची मूर्ती आहे. मंदिरावरून तसेच पुढे जाऊन पाताळदरीत खाली उतरावे. या ठिकाणी एक ओढा आहे. या ओढ्याच्या पलीकडे उघड्यावर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी देशपांडे यांच्या समाध्या आहेत. या समाध्या पाहून उजव्या बाजूच्या टेकडीवर असलेले हनुमान मंदिर पाहावे. या ठिकाणी भगवंतेश्वर मंदिर, विठ्ठलाचे मंदिर व नवीन बांधलेले गणपतीचे मंदिर अशी तीन मंदिरे आहेत. भगवंतेश्वर मंदिरातील कासव पाहाण्यासारखे आहे. या कासवापुढील देव्हाऱ्याकडील पायरीवर मोडीलिपीमध्ये शिलालेख कोरलेला आहे. त्यावरील ‘आबाजी जाधव शके१७०१, विशाळगड’ ही अक्षरे वाचता येतात. मंदिरात ब्रम्हदेवाची मूर्ती आहे. वाटेत एका चौथऱ्यावर दगडात राजाराम महाराजांची कोरलेली दोन पावले दिसतात. तेथे त्यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई यांची समाधी आहे. या शिवाय गडावर घोड्याच्या टापा, मुचकुंदाच्या गुहा, सती, तास टेकडी इत्यादी ठिकाणे पाहाण्यासारखी आहेत.

@सचिन कृष्णा तळे 
Sachin Jayshree Krishna Tale

Friday, 21 June 2024

सिंहगड किल्ला पर्यटन स्थळ नसून शौर्याचे प्रतीक आहे ! त्याचे पावित्र्य राख !

 

सिंहगड किल्ला पर्यटन स्थळ नसून शौर्याचे प्रतीक आहे ! त्याचे पावित्र्य राख !

 

" छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे गड किल्ले म्हणजे शिवमंदिरचं ! श्रावणाच्या सरीत या किल्ल्यांचा अभिषेक चालू असतांना आपण तिथे श्रद्धेने जाणे अपेक्षित असताना त्या ठिकाणी आपण काय करतो याच भान आजच्या तरुणांना राहिला नाही हे लाजिरवाणी बाब आहे."

 


पावसाळा लागला कि आपले पाय छान अश्या निसर्गमय वास्तू किंवा ठिकाणांकडे वळतात. पावसाळ्याची खरी जादू म्हणजे सर्वत्र पसरलेली हिरवीगार झालर. मनाला प्रसन्न करणारं वातावरण. अश्यावेळी पुण्यात आलेल्या प्रत्येकाचे पाऊल पश्चिम घाटावर असलेल्या शिवकालीन इतिहासाने नटलेल्या शौर्याने गाजलेल्या सिंहगडाकडे वळतात. राजगड, रायगड, शिवनेरी अन त्यांच्या भोवती असणारे लहान मोठे गड किल्ले राजवाडे आपल्याला आकर्षित करतात. या ठिकाणांना आवर्जून भेट दिली पाहिजे. पण लपून छापून प्रेम करण्यासाठी नाही, पर्यटन म्हणून नाही, पिकनिक म्हणून तर मुळीच नाही तर शौर्याचं प्रतीक म्हणून अन इतिहासातील पानांना वाचण्यासाठी या स्थळांना भेट देणे गरजेचं आहे.

 

जून जुलै महिना उजाडला कि तरुणांना पावसाळ्याची भुरळ पडते. प्लान तयार होतात अन मुलं मुली थेट पोहचतात आपल्या गड किल्ल्यांवर. या किल्ल्यांची सुंदरता खरी पावसाळ्यातच दिसून येते. गडाच्या प्रवेशद्वारा कडे जाणाऱ्या पायऱ्या धुक्यानी तुमचे स्वागत करतात. किल्ल्यांवर मिळणारी कांद्याची भजी अन पिठलं भाकर साठी गर्दी. अन जिथे वरदळ नाही तिथे प्रेम युगलांची जोडी. अश्लील चाळे करणारे काही मंडळी. काही प्रमाणात जिवंत राहिलेले अवशेष अन गर्दीच गर्दी. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून शोधणारे नजरा. प्रत्येकाच्या हातात सेल्फी स्टिक अन कॅमेराचे अँगल. अन प्लास्टिक च्या बॉटेल चा ढिगारा. बस इतकंच हवं बाकी काही नको. असो ...

 

ऐतिहासिक स्थळे अन स्मारके हे येणाऱ्या प्रत्येक पिढीला संदेश देण्याचे काम अविरतपणे करत असतात. हि स्थळे देशासाठी अनमोल ठेवा असतो. आपल्याला मौजमजा मस्ती अन सेल्फी काढण्यासाठी या किल्ल्यांची निर्मीती झाली नाही. तर प्रत्येक गड किल्ल्यांची एक वेगळीच गोष्ट आहे. फक्त पाठ्यपुस्तके अन तानाजी या चित्रपाठातून सिंहगडाचा इतिहास पाहता तो थेट सिंहगडावर जाऊन पाहावा अन तिथे त्या भूमीला त्या मातीला मस्तकी लावून त्याठिकाणी नतमस्तक व्हाव. येणाऱ्या पिढीला त्या जागेचा इतिहास सांगावा. त्यांना इतिहासाची ओढ निर्माण झाली पाहिजे अश्याप्रकारे त्यांना गडाची माहिती करून द्यावी. गर्दी फक्त पावसाळ्यातच नाही तर ३६५ दिवस गर्दी टिकून राहिली पाहिजे.

 

तुम्हाला आकर्षित करणाऱ्या सिंहगडाचा इतिहास -

 

सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा होते. स्थानिक महादेव कोळी लोकांच्या आख्यायिकेनुसार कौडण्यऋषी यांनी येथे तपश्चर्या केली म्हणून या डोंगराचे नाव कोंढाणा झाले. .. १३६० मध्ये दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलकाने दक्षिण स्वारी नंतर हा किल्ला आदिलशाही राजवटीत होता.  शहाजी राजांच्या यांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला.  मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंडाण्यावरचा अधिकारी होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे  विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलीदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले . तेव्हापासून या गडाला सिंहगड असे म्हणू लागले अशी आख्यायिका आहे.

 

गडावरील हि ऐतिहासिक ठिकाणे आवर्जून पहा- 

 

अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध सुभेदार तानाजींचे स्मारक दिसते. राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आहे. झुंजारबुरूज हे सिंहगडचे दक्षिण टोक. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात तर खाली पानशेतचे खोरे दिसते. डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढले होते. गडाच्या पश्चिमेस कल्याण दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास ह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो. कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते. हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. दारूचे कोठार अन टिळक बंगला.

 

-          सचिन कृष्णा तळे

 

 

 

 

 

 

 

 

 

Friday, 14 June 2024

हॅशटॅग बायकॉट_ वक्फ_बोर्ड

 हॅशटॅग बायकॉट_ वक्फ_बोर्ड 

"अल्लाह च्या नावाने अर्पण केलेली वस्तू म्हणजे वक्फ" 



गेली अनेक वर्ष देशभर वक्फ बोर्ड मंडळाविरोधात आवाज उचलला जात असताना राज्याने तरतूद केलेल्या १० कोटी निधी मधून 'वक्फ' मंडळाला राज्याच्या अल्पसंख्यांक विकास विभागानं २ कोटींचा निधी वितरीत केला आहे. यामुळे शिंदे - फडणवीस - पवार सरकार वर अनेक संघटने कडून अन सोशल मीडिया वर टिकेला समोर जावं लागत आहेत. अश्यावेळी हा वक्फ बोर्ड (मंडळ) नक्की आहे तरी काय हे प्रत्येक भारतीयाने समजून घेणे गरजेचे आहे. अन्यथा देशभर तुमची कुठेही मालमत्ता असेल तर सावधान. मुस्लीम वक्फ बोर्ड पाहिजे तेव्हा कोणतीही भरपाई न देता तुमची जमीन हिसकावून घेऊ शकते. केंद्र सरकारने स्वतः कायदा करून त्यांना हा अधिकार दिला आहे. जर तुमची जमीन किंवा मालमत्तेवर कोणत्याही कागदपत्राशिवाय कोणी दावा करत असेल तर तो नाकारणे तुमच्यासाठी सोपे आहे. तुमच्याकडे कागदपत्रे असतील तर मालमत्ता तुमची आहे आणि तुम्हाला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. परंतु भारतात एक समिती आहे जिने जर तुमच्या जमिनीवर हक्क सांगितला तर ती सोडवणे तुमच्यासाठी खूप अवघड ठरू शकते. ऐकायला विचित्र वाटले तरी ते सत्य आहे. देशात सध्या सुमारे ३० वक्फ बोर्ड आहेत. गोवा, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड आणि सिक्कीम आणि केंद्रशासित प्रदेश दमण आणि दिवा या राज्यांमध्ये सध्या कोणतेही वक्फ बोर्ड नाही. वक्फ कायदा १९९५ जम्मू आणि काश्मीरला लागू नाही.



वक्फ म्हणजे काय?


वक्फ हा अरबी शब्द आहे. ज्याचा अर्थ राहणे असा आहे पण त्याचा आणखी एक अर्थ देवाच्या नावाने अर्पण केलेली वस्तू असाही आहे. कोणतीही जमीन वक्फ होणे म्हणजे त्यावर कोणाचाही मालकी हक्क नाही. अशा स्थितीत ती जमीन वक्फ बोर्डाची मालमत्ता बनते आणि नंतर ती सार्वजनिक कामांसाठी वापरली जाते. एवढेच नाही तर, एकदा जमीन वक्फ झाली की ती जमीन नेहमीच वक्फ राहते. विशेष म्हणजे हे फक्त जमिनीवरच लागू होत नाही तर जंगम किंवा अचल मालमत्ताही वक्फ होते. १९९५ मध्ये पी.व्ही. नरसिंह राव यांच्या काँग्रेस सरकारने वक्फ कायदा १९५४ मध्ये सुधारणा करून नवीन तरतुदी जोडून वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार दिले होते. एखादी मालमत्ता वक्फ झाल्यानंतर ती पुन्हा खाजगी होऊ शकत नाही. देशातील सर्व स्मशानभूमी वक्फ अंतर्गत येतात. वक्फ बोर्डानेही या स्मशानभूमींच्या लगतची जमीन वक्फ म्हणून घोषित केली असून मकबरे व इतर मुस्लिम धार्मिक स्थळे व त्यांच्या सभोवतालची जमीन वक्फ घोषित करण्यात आली आहे. एखाद्या जमिनीचा दीर्घकाळ कब्रस्तान म्हणून वापर होत असेल तर ती जमीन वक्फ होऊ शकते. १९९५ च्या वक्फ कायद्याच्या कलम तीनमध्ये असे लिहिले आहे की वक्फला कोणतीही जमीन आपली आहे असे वाटत असले तरी ती त्याची मालमत्ता असेल. वक्फ बोर्डाला हे सिद्ध करण्याचीही गरज नाही. वक्फ म्हणजे लोकहितकर्त्यांनी दिलेल्या मुस्लिम कायद्याद्वारे मान्यताप्राप्त धार्मिक किंवा धर्मादाय हेतूंसाठी जंगम किंवा स्थावर मालमत्तांचे कायमस्वरूपी समर्पण आहे.


राज्यातील 'वक्फ' मंडळाचं बळकटीकरण?


हिंदूंच्या जागा बळकावणारं 'वक्फ' मंडळ बरखास्त करा, अशी मागणी करणाऱ्या महायुती सरकारनं 'वक्फ' मंडळाचं बळकटीकरण करण्याचा निर्णय घेतला अन लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर अल्पसंख्याक समाजाला आकर्षित करण्यासाठी सरकारनं ही खेळी केली आहे असे आरोप सध्या युती सरकार वर होत आहेत.  २००७ मध्ये केंद्रात काँग्रेसचं सरकार असताना 'वक्फ' भूमीसाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्यात आली होती. जून २००७ मध्ये या समितीचे सदस्य, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे कामकाज, तसंच 'वक्फ' मंडळाच्या मालमत्तेची पहाणी करण्यासाठी महाराष्ट्रात आले होतं. या वेळी काँग्रेस सरकारने वक्फ मंडळाला अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते. त्याच १० कोटी अनुदानातुन २ कोटी राज्य सरकारने वितरित केले आहे. मात्र, हिंदुत्वावादी सरकार म्हणून मिरवणाऱ्या भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महायुती सरकारनं 'वक्फ' मंडळांच्या मजबुतीकरणावर भर दिला यात काहीही तथ्य नाही हेच सत्य आहे. या जमिनीचे सध्याचे बाजारमूल्य अंदाजे रुपये एक लाख वीस हजार कोटी इतके आहे. या सर्व मालमत्तांतून सध्या मिळत असलेले एकूण वार्षिक उत्पन्न केवळ रुपये १६३ कोटी इतके आहे. 



२०१३ साली झालेली सुधारणा नक्की आहे तरी काय ?


सुधारित कायद्यावर राष्ट्रपतींची सही होऊन कायदा लागू झाल्याची तारीख आहे २० सप्टेंबर २०१३, म्हणजे तथाकथित सुधारणेच्या तारखेच्या आधीच कायदा लागू झाला आहे. कलम ४० चा विचार करता, एखाद्या सोसायटी किंवा ट्रस्ट मालमत्तेसंदर्भात ती मालमत्ता वक्फ मालमत्ता आहे का, असा प्रश्न उपस्थित झाल्यास त्याची सुनावणी करण्याचा आणि निकाल देण्याचा अधिकार कलम ४० नुसार वक्फ बोर्डाला देण्यात आलेला आहे, मात्र त्यायोगे कोणत्याही मालमत्तेवर कब्जा करावा आणि वाद निर्माण करून त्याची मालकी ठरवून घ्यावी असे होणे जवळपास अशक्य आहे. शिवाय ही तरतूद केवळ सोसायटी आणि ट्रस्टपुरती मर्यादित आहे. खासगी व्यक्ती, कंपन्या वगैरेंना ती लागू नाही. २०१३ मध्ये झालेली सुधारणा याचा विचार केला तर त्या कायद्यात आणि सुधारणेत कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेच्या खासगी मालमत्तेवर बळजबरीने कब्जा करणे आणि नंतर त्याची मालकी प्राप्त करण्याबाबत कोणतीही कायदेशीर तरतूद अस्तित्वात नाही. पण देशभरात वक्फ मंडळाकडे अधिकृत पणे किती जमीन आहेत याची आकडेवारी विचार करायला लावणारी आहे. देशात एकूण सुमारे ४.९ लाख नोंदणीकृत “वक्फ” मालमत्ता आहेत.


सच्चर समितीचे म्हणे काय ? 


इ.स. २००४ मध्ये, तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात भारत सरकारने ९ मार्च २००५ रोजी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर यांच्या प्रमुखत्वाखाली एक समिती नेमली. या समितीचा उद्देश मुस्लीम समाजाची शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक वस्तुस्थिती जाणून घेणे आणि त्यांच्या समस्यांवरील उपाय सुचवणे हा होता. सच्चर समितीने वक्फ बोर्डांच्या कार्यप्रणालीतील अनेक त्रुटींवर, भ्रष्टाचारावर नेमके बोट ठेवले होते व त्यात सुधारणांसाठी ठोस उपाय सुचवले होते. देशभरात वक्फ बोर्डांच्या ताब्यात सुमारे सहा लाख एकर एवढी प्रचंड जमीन, मालमत्ता – गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळापासून – असूनही, देशातील ३८% हुन अधिक मुस्लीम जनता अत्यंत गरिबीचे जिणे जगत आहे, या विरोधाभासाकडे समितीने लक्ष वेधले होते.


- सचिन कृष्णा तळे 

Saturday, 1 June 2024

पाणी पैश्यासारखं वापरा… आणि पैश्यासारखं जपा.

 

पाणी पैश्यासारखं वापराआणि पैश्यासारखं जपा.



सध्याची महाराष्ट्राची लोकसंख्या इतर राज्यापेक्षा जास्त आहे कारण नोकरी उद्योग इत्यादी कारणामुळे इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थालांतरित झालेल्यांची संख्या दिवसानुदिवस वाढत आहेत. गावांचं शहरात रूपांतर होत असताना उंच इमारती, मोठमोठाले कारखाने अन त्यांना लागणारं पाणी या प्रश्नांपुढे आपले आहे ती धरणे कमी पडू लागली आहेत. टँकर चं जाळं शहरात असं विणलं गेलंय  कि त्यामुळे भूजलातील पाणी देखील आटत चालय. शहरीकरणाच्या नादात माणसाने जी कुऱ्हाड झाडांवर निसर्गावर चालवली तीच दुष्काळ रुपी कुऱ्हाड आता माणसांवर घाव घालत आहेत. या संकटातून तुम्हाला सरकार नाही तर हा निसर्गच वाचवू शकतो. पाणी पैश्यासारखं वापरा… आणि पैश्यासारखं जपा.

 

राज्यात उन्हाच्या दाहकतेने नद्या, विहिरी, ओढे, कालवे हि कोरडे ठणठणीत पडले आहेत. जनतेला पिण्याच्या एक घागरभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. माणसांबरोबर जनावरांच्याही चाऱ्याचा व पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी आठवड्यातून एकदा पाणी मिळत आहे. सरकार पाणी कपात करून करून किती दिवस करणार? सरकार टँकर तरी किती पुरवणार? धरणात पाणीच नाही म्हंटल्यावर सरकार तरी तुम्हाला पाणी कोठून आणून देणार? लातूर ला ट्रेन च्या माध्यमातून पाणी पुरवले जात आहे. जोपर्यंत नागरिक जागरूक होणार नाही वनीकरण आाणि वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेणार नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही हे लक्ष्यात घ्या. दुष्काळ निवारणासाठी पाणलोट क्षेत्र विकासात छोटी झाडे, गवत आणि झुडूपवर्गीय झाडांची लागवड इत्यादी आवश्यक असते. शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था किंवा व्यक्तींना रोपे पुरवठ्याची कामे सुद्धा वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग करत आहे त्यांना संपर्क साधून तुम्ही झाडे लावू शकता. अनेकजण झाडे लावण्याचे काम करत आहे पण लावलेली झाडे जागवण्याची जबाबदारी कोणी घेत नाही. लावलेली झाडे जगवली तरच पावसाचे प्रमाण नक्की वाढेल. आज आपण पाहतो की, वृक्षांची संख्या कमी होत आहे. वृक्षतोड होऊन त्याठिकाणी मोठ मोठ्या इमारतींचा विस्तार होत आहे त्यामुळे पाऊस कमी होत आहे अन दुष्काळ जन्य परीस्थिती दिसून येते.

 

पावसाचे पाणी जास्तीतजास्त गावाच्या शिवारात अडवून विकेंद्रित स्वरूपाचे पाणीसाठे निर्माण करणे, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे असे उपाय  झाले पाहिजे. नद्यानाल्यांच्या खोलीकरण, रुंदीकरणातून जलसंधारण साधले गेले पाहिजे. राज्यात जी लहान-मोठी तलावे तुटलेली व गाळाने भरलेली आहेत त्यांची दुरूस्ती व गाळ काढने आवश्यक आहे. हा निसर्ग निर्मित दुष्काळ नसून मानव निर्मित दुष्काळच आहे.  पाऊस कमी पडल्यामुळे कृषी उत्पादन कमी होते व भूकबळींची संख्या वाढते हे विसरता कामा नाही. कोरड्या भागात दुष्काळ परिस्थिती नव्या वाळवंटाची निर्मिती करते. पावसाचे पाणी खाली जमिनीत झिरपले नाही तर भूगर्भातील पाण्याची पातळी देखील कमी होत जाते.

 

- पाऊसाचे पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था करावी व ह्याची सवय असू द्यावी.

- पावसाळ्या पूवी स्थानिक जलकुंभाची दुरुस्ती करून नवीन करावी.

- भूगर्भातील पाण्याचा स्तर वाढवण्यासाठी पावसाचे पाणी खड्यांमार्फत जिरवले गेले पाहिजे.

- जास्तीत जास्त अन मोठ्या प्रमाणात सोसायटी अन संस्थेने जलसंधारण कार्यक्रमात भाग घेणे गरजेचे आहे.

- घरगुती वापरासाठी वापरलेले पाणी पुन्हा झाडांना आणि रोपट्याना कसे वापरता येईल याचा विचार झाला पाहिजे.

- आंघोळ करताना , गाडी धुताना , घराची फ्लोरिंग स्वच्छ करताना, दैनंदिन जीवनात जिथे जिथे पाणी चा वापर आहे तिथे तिथे पाणी जपून वापरले पाहिजे.

 

पाऊस कमी आहे हेच फक्त दुष्काळाचे एकमेव कारण नाही. बेजबाबदार नोकरशाही तसेच चुकीचे नियोजन यामुळेही दुष्काळाची तीव्रता वाढते. पाण्याचे दुर्भिक्ष, पिकांची झालेली नासाडी,  दुष्काळग्रस्तांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर अशा स्वरूपात या दुष्काळाचे चटके बसत आहेत. राज्यातील तसेच आपापल्या भागातील विविध प्रकारे वाया जाणाऱ्या पाण्याचा एकत्रित विचार करण्यासाठी शासनाने राज्य, विभाग व जिल्हापातळीवर आणि लोकांनी आपापल्या स्तरावर समिती गठित करून ठोस नियोजन केल्यास सध्याचा पाणी प्रश्न सहज सुटू शकतो. गावात आणि शहरात पाण्याची काय परिस्थिती आहे आणि नेमके काय प्रश्न आहेत हे स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, अभ्यासक, शेतकरी, उद्योजक, आदी समाजघटकांनी पाहिले पाहिजे. पाणी नियोजनाशी निगडित काम करणाऱ्या  जलसंपदा, जलसंधारण, ग्रामविकास, कृषी, वने, सामाजिक वनीकरण, भूजल सर्वेक्षण, पाणीपुरवठा आदी शासनाच्या संघटनेशी या कार्यकर्त्यांनी लोकांनी संपर्कात राहिले पाहिजे. आजची भयाण परिस्थिती तर तुमच्या डोळ्यासमोरच आहे. तुम्ही या उद्दिष्टांचा जाब विचाराल तर तुम्हाला उत्तर मिळेल की नाही, माहीत नाही; परंतु तुमचा पाणीप्रश्न आणि चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास नक्कीच सुरुवात होईल. ज्या ठिकाणी फळे, पिके अथवा नगदी पिके आहेत, अथवा पाणी वापर जास्त आहे, त्या ठिकाणी सिमेंट बंधारे मर्यादित ठरतात. पावसाची अनियमितता, बाष्पीभवन, दोन-तीन वर्षांत गाळाने भरणे आदी बाबींचा विचार करता सिमेंट बंधाऱ्याची उपयोगिता राज्याच्या दृष्टीने मूलत: मर्यादित स्वरूपाची आहे. भयाण दुष्काळातही उत्तम प्रकारे तग धरून राहिलेली एकमेव वनस्पती आपण पाहात असाल ती म्हणजे वेडीबाभूळ आहे. राज्यातील पाण्याचा प्रश्न कोणताही स्वतंत्र निधी न घेता केवळ लोकांच्या सोप्या व सरळ उपाययोजनांची अंमलबजावणी केल्यास सुटू शकतो. म्हणून पुन्हा एकदा विचार करा आणि पाणी पैश्यासारखे वापरा.

 

सचिन कृष्णा तळे

Friday, 24 May 2024

सावरकरांना भारतरत्न कधी देणार ?

 

सावरकरांना भारतरत्न कधी देणार ?




स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचाराचं सरकार महाराष्ट्रात आणि देशात आहे असं वारंवार म्हटलं जातं. त्यांना भारतरत्न देऊन केंद्र सरकारने त्यांचा खरा गौरव करावा, अशी मागणी आधीपासून केली जात आहे. केंद्र सरकारने अलीकडेच भारतरत्न पुरस्काराची मोठी घोषणा केली यात भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, पी. व्ही. नरसिंहराव, चौधरी चरणसिंह, एम. एस. स्वामिनाथन आणि कर्पुरी ठाकूर यांची नावे जाहीर झालीत परंतु या यादीत एक नाव राहून गेलं ते म्हणजे स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचं. राजकीय स्वार्थापायी वीर सावरकरांचा अपमान काही लोक देशात वारंवार करत आहेत, त्यांना उत्तर द्यायचे असेल तर स्वतःला हिंदुत्त्ववादी म्हणवणाऱ्या राज्यकर्त्यांनी सावरकरांना भारतरत्न दिले पाहिजे. जून २०२४ च्या निवडणुकीच्या निकालानंतर देशात कोणते सरकार असेल याची चाहूल सगळ्यांना लागलीच आहे. अश्यावेळी सावरकरांच्या नावाचा जयघोष फक्त राजकीय मंचावर होता ती कृतीत होयला हवी.

सरहद्द गांधी बादशाह खान या नावाने प्रसिद्ध असलेले खान अब्दुल गफारखान यांना १९८७ साली भारतरत्न दिले. भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय होते. मदर तेरेसा यांना .. १९७९ मध्ये त्यांनानोबेल पुरस्कारमिळाला तेव्हा घाईघाईने  .. १९८० मध्ये त्यांनाभारतरत्नहा किताब देण्यात आला. तर नेहरू गांधी घरात तीन भारतरत्न जवाहरलाल नेहरू यांना . . १९५५ साली, इंदिरा गांधी याना १९७१ साली, राजीव गांधी यांना १९९१ साली. अश्या अनेकांची वर्णी या यादीत लागली. खरंतर भारतरत् हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अनेकांना मरणोपरान्त भारतरत् दिले गेले आहे. ‘भारतरत्नदेण्यासाठी कुठल्या राज्याने किंवा संस्थेने शिफारस किंवा प्रस्ताव देण्याची आवश्यकता नसते.’ असे उत्तर गृहमंत्रालय च्या वतीने लोकसभेत सांगितले गेले आहे. मग सावरकरांना भारतरत्न देण्यात विलंब का लागतोय?

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी कायम अग्रणी राहिलेले असे जहालमतवादी क्रांतीकारक. दूरदृष्टी, विज्ञानवादी क्रांतीकारक ही सावरकरांच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू होय. 'तुम्ही-आम्ही सकल हिंदू बंधु बंधु' अशी साद देत अस्पृश्यता निर्मुलनाच्या कार्याची सुरूवात त्यांनी केली. अस्पृश्यता निर्मुलन, व्यायामप्रसार आणि स्वदेशीचा आग्रह ही त्यांची त्रिसुत्री होती. त्या काळात अस्पृश्यांसोबत कुणी एकत्र जेवत नसे. पण, सावरकारांनी हा रिवाज मोडीत काढत सर्वांसाठी एकत्र पंगत सुरू केली, ऐवढंच नाही तर, गजानन दामले यांच्या व्यवस्थापनाखाली त्यांनी 'अखिल हिंदू उपहारगृह' सुरू केले. मुर्तीला किंवा देवाला स्पर्श करून त्यांना दर्शन घेता येत नसे. याकरता त्यांनी भागोजीशेठ किर यांच्या मदतीनं सर्वधर्मियांसाठी अशा पतित पावन मंदिराची स्थापना केली. तीस-पस्तीस सुविद्य स्त्रिया, वीस-पंचवीस अस्पृश्य स्त्रिया यांचे पहिले स्नेहभोजन याच पतित पावन मंदिरात पार पडले. सावरकरांनी :शाप, सन्यस्त खडग ही नाटके लिहिली. 'हिंदूपदपातशाही' हा इंग्रजी ग्रंथ लिहिला. लिपीशुद्धी आणि भाषाशुद्धी यांची आवश्यकता प्रतिपादन करणाऱ्या पुस्तिका लिहिल्या. शिवाय, महाराष्ट्राच्या वाड्:मयांत अमर ठरलेलं 'माझी जन्मठेप' हे पुस्तक देखील. स्वदेशीला ते महत्व देत होते. साखर विकल्यानंतर जेव्हा वर्षाकाठी केवळ दोन रूपयांचा फायदा झाला असं त्यांना सांगितलं गेलं तेव्हा, त्यांनी 'अरे किमान ते दोन रूपये तरी आपल्या देशात राहिले नाहीतर ते इंग्रजच घेऊन गेले' असते असं उत्तर दिलं. १९०५ च्या बंगालच्या फाळणीला विरोध करण्यासाठी, सावरकरांनी बाल गंगाधर टिळकांच्या उपस्थितीत इतर विद्यार्थ्यांसह विदेशी कपड्यांची होळी पेटवली.  क्रांतिकारक मार्गाने संपूर्ण भारतीय स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी पुस्तकेही त्यांनी प्रकाशित केली.

भविष्याचा वेध घेणारा प्रतिभासंपन्न महाकवी, आशयसंपन्न निबंधकार, जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारीत कादंब-यांचा लेखक, रक्ताच्या शाईत बुडवून विद्युलतेच्या लेखणीने लिहीणारा व उज्ज्वल भूतकाल व श्रेष्ठ परंपरांचे ज्ञान घेऊन राष्टभक्तीचा स्फुल्लींग चेतविणारा ग्रंथकार, अतीत कालातील घटनांचा अन्वयार्थ उलगडून दाखविणारा द्रष्टा इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत. विषयाचा व्यासंग, स्वतंत्र दृष्टीकोन, विश्लेषक बुद्धी, डोळस स्वाभिमान आणि वस्तुनिष्ठ, साधार व स्फूर्तीदायक विवेचन ही त्यांच्या इतिहास ग्रंथांची वैशिष्ट्ये. कोठडीच्या भिंतींवर काट्याकुट्यांनी महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी. सावरकरांनी ज्या ज्या वेळी कृतीसाठी पाऊल टाकले, त्यांच्या बंडखोर मनात ज्या संवेदना उमटल्या, त्यांच्या कविमनाचे जे जे सौंदर्यग्रहण केले, त्या सर्व गोष्टी त्यांच्या साहित्यातून जगापुढे मांडल्या.  कवी, नाटककार, शाहीर, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रकार, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, इतिहासकार, पत्रकार अशा विविध भूमिकांतून त्यांनी आपली साहित्यसंपदा सृजन केली. 'गोमांतक, ‘सप्तर्षी,‘रानफुले,‘सावरकरांची कविता,‘कमला,‘अग्निजा,‘मूर्ती दुजी ती,‘सावरकरांच्या अप्रसिध्द कविता,‘अग्निनृत्य, ‘कुसुमसंचय इत्यादी काव्य सावरकरांनी लिहिले. हिंदुराष्ट्राला काळाच्या तडाख्यातून वाचायचे असेल तर श्रुतीस्मृतिपुराणोक्ताची ही बेडी तोडून टाकली पाहिजे आणि हिंदुधर्माला प्रत्यक्षनिष्ठ, प्रयोगक्षम व विज्ञाननिष्ठ असे रूप दिले पाहिजे, असा इशारा दिला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेतील अस्पृश्यता कायद्याने नष्ट करण्याच्या कलमामुळे आनंद होऊन सावरकरांनी ‘जन्मजात अस्पृश्यतेचा मृत्युलेखहा लेख लिहिला.

 

सचिन कृष्णा तळे

 

 

 

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale