Thursday, 20 October 2022

भारतीय ज्ञानपीठ

 

भारतीय ज्ञानपीठ

 

प्रसिद्ध उद्योगपती स्वर्गीय साहू शांतिप्रसाद जैन यांनी १८ फेब्रुवारी १९४४ रोजी वाराणसी येथे स्थापन केलेली आणि भारतीय साहित्य-संस्कृतीच्या अभिवृद्धयर्थ कार्य करणारी भारतीय ज्ञानपीठ हि प्रख्यात संस्था आहे. दुर्मिळ प्राचीन भारतीय ग्रंथांचे संशोधन, संपादन प्रकाशन करणे तसेच सद्यकालीन भारतीय भाषांतील मौलिक सार्वजनिक वाङ्मयास लोकोदयासाठी उत्तेजन देणे ह्या हेतूने भारतीय ज्ञानपीठाची स्थापना केली गेली. वाराणसी येथे १९४४ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या अधिवेशनानिमित्त अनेक विद्वान एकत्र जमले अन खऱ्या अर्थाने त्याचवेळी भारतीय ज्ञानपीठ चा प्रवास चालू झाला.

 

ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्यजगतात नोबेल पुरस्काराइतकाच सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो. भारताचा कोणताही नागरिक भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या बावीस भाषांपैकी कोणत्याही भाषेत लेखन करणाऱ्या एका नागरिकाला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. ज्ञानपीठ पुरस्कारात 'पुरस्कार-पत्र', 'वाग्देवीची प्रतिमा' आणि 'अकरा लाख रुपयांचा धनादेश' यांचा समावेश असतो. ज्ञानपीठ पुरस्कारात दिली जाणारी वाग्देवीची प्रतिमा ही माळवा प्रांतातील धार येथील सरस्वती मंदिरातील एका मूर्तीची प्रतिकृती आहे. या सरस्वती मंदिराची निर्मिती राजा भोज याने .. १३०५ मध्ये केली होती. वाग्देवीची ही मूर्ती सध्या लंडन येथील ब्रिटिश म्युझियममध्ये आहे.

 

भारतीय ज्ञानपीठाने आजवर सुमारे सहाशे ग्रंथ प्रसिद्ध केले असून ते संस्कृत, प्राकृत, पाली, अपभ्रंश, हिंदी, तमिळ, कन्नड, उर्दू, इग्रंजी . भाषांत आहेत. संस्थे तर्फे दहा हजार छायाचित्रे जमविण्यात आलेली असून ती शास्त्रशुद्ध रीतीने संगृहीत केली आहेत. आजवर विविध भारतीय भाषांतील २० प्रतिभासंपन्न लेखकांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे.भारतीय ज्ञानपीठाचे ज्ञानोदय हे प्रसिद्ध हिंदी मासिकपत्र असून त्यातून नवोदित होतकरू भारतीय लेखकांचे लेखन प्रसिद्ध केले जाते. ज्ञानपीठ पत्रिका हे संस्थेचे दुसरे मासिक असून त्यातून विविध भारतीय भाषांतील विद्वान लेखकांचे दर्जेदार लेखन प्रसिद्ध होते

 

पुरस्कार समारंभानिमित्त कवितावाचन, कविसंमेलन, नृत्य, संगीत यांसारखा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही राबवले जातात. मराठी भाषेला आजवर चार ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहे.  १९७४ साली विष्णू सखाराम खांडेकर यांच्या ययाति ह्या पुस्तका बद्दल तर १९८७ साली विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज याना विशाखा ह्या काव्यसंग्रह बद्दल पुरस्कार मिळाला आहे. २००३ मध्ये विंदा करंदीकर याना युरोपीय एक भारतीय तत्वज्ञ त्यांच्या तत्वज्ञानाचे ओवीरूपात वर्णन केलेल्या अष्टदर्शने ह्या पुस्तक बद्दल ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले होते . २०१४ मध्ये भालचंद्र वनाजी नेमाडे याना हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ ह्या पुस्तकाला भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे.

 

सचिन कृष्णा तळे

 

Wednesday, 19 October 2022

छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन

छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन



 

अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारे आपले छत्रपती संभाजी महाराज हे उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकारही होते. संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला. तर 'नायिकाभेद', 'नखशीख' आणि 'सातसतक' हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले. खास करून लेखक साहित्यिक अन कवी मनाचा ते आदर अन राजदरबारी सत्कार करत असे. इतिहासात त्याची नोंद देखील आहे. महाराज अनेक भाषांत विद्याविशारद होते. छत्रपती संभाजी राजांनी शंभूराज, नृपशंभू,शंभूवर्मन या नावानी साहित्य निर्मिती केली . त्यांना अनेक भाषा बोलता आणि लिहिताही येत होत्या. श्रुंगारपुरच्या निसर्गरम्य वातावरणात त्यांनी महाराणी .येसुबाईसाहेब यांच्या प्रेरणेने 'नखशिखा' हा ग्रंथ लिहिला.

साहित्यावर प्रेम करणाऱ्या अश्या महान राजाच्या नावे मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्रात व्हावे ह्याच प्रेरणेने अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व जगद्‌गुरू संत तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने २००८ सालापासून छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन पुरंदर तालुक्यातील कऱ्हा नदीच्या काठावरील सासवड येथे भरवण्यात येते. छत्रपती संभाजी महाराज नावाने सुरू झालेले हे महाराष्ट्रातील एकुलते एक संमेलन आहे.

१३ मार्च ते १४मार्च २०१० या तारखांना झालेल्या पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर ताकवले होते. छत्रपती संभाजी राजांच्या बुधभूषण या ग्रंथाचा त्यांनी मराठी अनुवाद केले आहे. चौथे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन १२मार्च २०१३ रोजी सासवडला झाले. प्रा. गंगाधर बनबरे हे दुसऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.  इतिहास संशोधक अनंत दारवटकर हे तिसऱ्या तर ७वे राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन नारायणपूर (ता. पुरंदर) येथे १२ मार्च २०१६ रोजी झाले. अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार श्रीराम पचिन्द्रे होते.उदघाटक महादेव जानकर होते. पुरंदर किल्ल्यावर झालेल्या ८ वे राज्य स्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाचे अध्यक्ष इतिहास संशोधक प्रा. नामदेवराव जाधव होते. व्यंकोजी राजे (तंजावर) तमिळनाडू यांचे तेरावे वंशज युवराज छ्त्रपती संभाजीराजे भोसले यांनी १२ मार्च रोजी सासवड येथे संमेलनाच उदघाटन केले.

छत्रपती संभाजी महाराज समाज पुरस्कार , युवा भूषण पुरस्कार , नृत्यांगना पुरस्कार, सामाजिक युवा गौरव, शिक्षण रत्‍न अश्या अनेक पुरस्कारांनी साहित्यिकांचा ह्या मंचावर गौरव अन सन्‍मानित करण्यात येते. संमेलनाची संकल्पना पत्रकार व कवी दशरथ यादव यांची असून, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर हे या संभाजी साहित्य संमेलनासाठीचे मार्गदर्शक आहेत.

 

सचिन कृष्णा तळे


Friday, 14 October 2022

सुर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर

सुर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर



http://epunyanagari.com/articlepage.php?articleid=PNAGARI_PUS_20221017_04_5&width=155px&edition=Smart%20Pune&curpage=4


नव्या लिहित्या हातानी एकत्र यावे, नवोदितांना हक्काचे लिहिण्यासाठी व्यासपीठ मिळावे आणि लिहित्या हातांना ऊर्जेचा स्पर्श व्हावा या हेतूने २००७ मध्ये काही होतकरू युवकांनी अन नव्याने लिहिणाऱ्या कवींनी सुर्यांश ही संस्था स्थापन केली. नंतर या संस्थेतील इरफान शेख, रंगनाथ रायपुरे, नीता कोंतमवार, मिलिंद बोरकर, सीमा पाटील आणि सुरेश गारघाटे सहित अनके कार्यकर्ते ह्या साहित्य चळवळीत सहभागी झाले.

सुरवातीच्या काळात केवळ कवितेला वाहिलेल्या या संस्थेत नंतर अनेक बदल होत गेले आणि या संस्थेला लोक चळवळीचे स्वरूप पर्याप्त झाले. कवी इरफान शेख या संस्थेचे आजीवन अध्यक्ष झाल्यापासून एका पथदर्शी नेतृत्वात संस्थेची वाटचाल सुरू झाली. अनेक कवी लेखक कलावंत या संस्थेशी केवळ जुळून आहे असे नव्हे तर या सगळ्यानी संस्थेला आपलं मानलं आणि हि संस्था दिवसेंदिवस लोकमनात आपली छाप सोडत नावरूपाला आली. या संस्थेची लोकप्रियता पाहून नावात थोडा बदल केला गेला आणि सुर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर या नावाने २०१२ ला रीतसर धर्मादाय आयुक्त कार्यालयात संस्थेची नोंदणी झाली.  नावात बदल झाल्यावर या संस्थेला वलय मिळाले आणि तेव्हापासून साहित्यक्षेत्रात कार्यरत ही संस्था चंद्रपूर जिल्ह्यातली महत्वपूर्ण साहित्यविषयक लोकचळवळ झालेली आहे.

राज्यस्तरीय स्त्रीशक्ती साहित्य संमेलन, अभिवाचन स्पर्धा, वाचन प्रेरणा दिवस आणि राज्यपातळीवरचे आठ साहित्यप्रकारासाठी वाङ्मय पुरस्कार, असे उपक्रम घेत २०१८ च्या सुरुवातीला राज्यस्तरीय साहित्य संमेलन या शीर्षकाखाली घेण्यात आलेले साहित्य संमेलन हे यशस्वी झाले अन त्याची चर्चा बहुश्रुत झाली. २०१८ च्या शेवटी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनुदानातून दुसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन झाले आणि संस्थेच्या सदस्यांनी आपण हे करू शकतो याची प्रचिती सगळ्यांना दिली.

राज्यनाट्य स्पर्धेत संस्थेतर्फे नाटक सादर झाले आणि ते तिसरे आले. केवळ साहित्यासाठी नव्हे तर साहित्य आणि संस्कृती जपण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणाऱ्या या संस्थेने खेडोपाडी लिहिणाऱ्या आणि उपेक्षित असणाऱ्या अनेक लिहित्या हातांना लोकांपुढे आणण्याचा सतत प्रयत्न केला. नुकतेच झालेले ३ रे राज्यस्तरीय साहित्य संमेलन एक उत्तम साहित्य संमेलन कसे असले पाहिजे याचा नमुना आहे. राज्यभरातील प्रतिष्टीत साहित्यिकांची उपस्थिती या संमेलनाला लाभली. आजपर्यंत डॉ प्रतिमा इंगोले, राजन खान, राजन जयस्वाल, शंकर विटणकर, वसंत आबाजी डहाके, डॉ यशवंत मनोहर, रामदास फुटाणे यांनी संमेलनात हजेरी लावली. यंदाच्या संमेलनात कवी इंद्रजितय भालेराव आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी उपस्थिती लावली. 

लोकसहभागावर ही संस्था काम करत असून मिळालेल्या देणगीच्या माध्यमातून सगळे आयोजन होत आहे. समर्पित भान ठेवून तरुण लेखक कवी यात काम करताहेत. समर्पणाची समिधा अर्पित करत या संस्थेत काम करणाऱ्या सगळ्या लेखक कवींना संस्थेप्रति आपुलकी, आत्मीयता, विश्वास आणि सहयोगाची आशा असल्यानेच संस्थेचे काम योग्यप्रकारे सुरू आहे.

 

सचिन कृष्णा तळे

Friday, 7 October 2022

संस्कार भारती…

 

संस्कार भारती




संस्काराशिवाय जीवन शून्य असते. संस्कारच मनुष्याला श्रेष्ठ बनवितात, उत्तम आकार देतात. सर्वोत्तम जीवनाचा पाया उत्तम संस्कारांवरच अवलंबून असतो. संस्कारांशिवाय जीवन भरकटलेल्या जहाजांप्रमाणे असते. संस्कार म्हणजे मानवाच्या मानव समाजाच्या चांगल्या सवयी होय. ज्याच्या अंगी  चांगले संस्कार तो  भेदभाव मानत नाही, लहान-मोठे मानत नाही, उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, असं काहीही तो मानत नाही. या निरीक्षणांधारे भारतरत्न नानाजी देशमुख, भाऊराव देवरस, विष्णू श्रीधर वाकणकर, माधवराव देवळे, योगेंद्रजी अशा एकविचारी महारथींनी लखनऊ येथे ११ जानेवारी १९८१ रोजी  संस्कार भारतीची स्थापना केली.

 

संस्कार भारती हि ललित कला आणि साहित्य क्षेत्रात काम करणारी अखिल भारतीय संस्था आहे. ‘ सा कला या विमुक्तयेअर्थात वाईटांच्या बंधनांपासून मुक्तता देणारी कला. अशा आशयगर्भ घोषवाक्याला, धारण करणार्यासंस्कार भारतीने सर्वच कलाप्रकारांना, सादरीकरणाच्या व्यासपीठावर एकत्रित आणले. ‘संस्कार भारतीच्या तब्बल १२०० हून अधिक शाखा भारतभर कार्यरत आहेत. राष्ट्रीय भावना, भारतीय सांस्कृतिकतेचं जतन करणारी आणि अशा आशयाचा प्रचार प्रसार करणारी नाटके, नृत्य, रांगोळी, मेंदी, चित्र, काव्य, साहित्य अशा विविध वैविध्यपूर्ण कलाप्रकारांना प्रोत्साहनाच्या रुपाने अनेक तरुण-तरुणी, अनेक बालगोपाळ आणि असंख्य ज्येष्ठ-श्रेष्ठांना एकत्र आणण्याचे महान कार्यसंस्कार भारतीने अथक तसेच अव्याहतपणे सुरू ठेवलेले आहे.

 

संस्कार भारती पुणे समिती च्या वतीने अनेक पुस्तके प्रकाशित करण्यात आले तसेच साहित्य विभागाच्या वतीने व्याख्यानमाला भरवणे , पुस्तकांवर परिसवांद , कविसंमेलन भरवणे त्याच बरोबर स्वराज्य ७५ च्या निम्मिताने अनाम क्रांतिवीर हा विषय घेऊन निबंध स्पर्धा घेण्यात आले होते. भारताच्या अस्मितेची पाळंमुळं ज्या कलाप्रकारात रूजलेली आहेत, अशा सर्व कलांचा कलेकलेने प्रचार प्रसार करीतसंस्कार भारतीही भारतीय संस्कार नावानेच ओळखू लागली.  कला आणि मनोरंजन, प्राचीनता आणि आधुनिकता, दृश्यकला आणि सादरीकरण कला अशा विविध संस्कारमूल्यांची सांगड घालत एखाद्या रोजनिशीप्रमाणेसंस्कार भारतीने भारतीय भूमीत कलासंस्कारांची बीजे रोवायला सुरुवात केली. मासिक संगीत कार्यक्रम असो , राष्ट्रीय विषयांवरील चित्रकला स्पर्धांचे आयोजन असो की, साप्ताहिक नाट्यवर्गांचे आयोजन असो, ‘संस्कार भारतीचाभूअलंकरणहा सोहळा तर प्रत्येक भारतीयांच्या मनाचा ठाव घेणारा ठरला. भारतमाता पूजन, नटराज पूजन, नववर्षाभिनंदन, भरतमुनी जयंती, दिवाळी परिवार मेळावा, कृष्णजन्माष्टमी अशा उत्सवांमधून समाजात काही मूल्यं प्रस्थापित करण्याचं कार्यसंस्कार भारतीसातत्याने करत आली आहे .

 

सचिन कृष्णा तळे

 

 

 

 

 

Friday, 23 September 2022

महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था

 

 


महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था

 

'महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था' ही महाराष्ट्रातील सर्वांत जुनी साहित्य संस्था आहे. आधुनिक महाराष्ट्राचे आद्द्य प्रवर्तक न्या. महादेव गोविंद रानडे, जागतिक कीर्तीचे संस्कृत पंडित डॉ. सर रामकृष्ण भांडारकर, प्रसिद्ध कादंबरीकार हरी नारायण आपटे, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक अशा पंचवीस द्रष्ट्या महाराष्ट्रीय समाजधुरीणांनी २९ ऑक्टोबर १८९४ रोजी ही संस्था स्थापन केली. त्या वेळी संस्थेचे नाव 'डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी' असे होते. १९४८ मध्ये ते 'महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था' असे करण्यात आले.ही संस्था १२५ हुन अधिक वर्षे उत्कृष्ट मराठी ग्रंथांना पुरस्कार देऊन उत्तेजन देण्याचे कार्य करत आहे.

 

पेशव्यांच्या राजवटीत दरवर्षी चातुर्मासात विद्वानांना दक्षिणा दिली जात असे. त्यामध्ये वैदिक विद्वान, इतर पंथीय विद्वान आणि अन्य धर्मातील पंडितांचा समावेश असे. पुढे इंग्रजांच्या राजवटीत ब्रिटीशांनी दक्षिणा प्राइझ कमिटी या नावाने एक स्वतंत्र कमिटी स्थापन केली.1895 साली या कमिटीचे सर्व काम संस्थेकडे आले. संस्थेच्या संग्रही 1895 पासून विद्वानांनी केलेली परिक्षणे आहेत, शंभर वर्षांपूर्वीपासूनची हस्तलिखिते आहेत आणि दुर्मीळ ग्रंथ, पेशवे दप्तर, विविध प्रकारचे 32 कोश, जुन्या पोथ्या, न्यायमूर्ती रानडे यांचा राइज ऑफ मराठा पाॅवर हा ग्रंथ देखील आहेत. संस्थेकडे असलेल्या सुमारे 7000 हजार ग्रंथांचे स्कॅनिंग आणि डिजीटायझेशनचे कार्य सध्या सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 3000 ग्रंथांचे डिजीटीयझेशन पूर्ण झाले आहे. संस्थेची आणखी एक योजना म्हणजे आदिवासी बोलींचे संवर्धन. सेंटर फाॅर इंटरनेट अँड सोसायटी (सीआयएस) याच संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येतो. धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमधील आदिवासी समाजाची बोलीभाषा, त्याच्या बोलीतील म्हणी, त्यांचे संगीत, नृत्य आदी सर्वांचे जतम करण्याचा प्रकल्प संस्था पूर्ण करणार आहे.

 

महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेला वनाझ कंपनीतर्फे पुण्यात पौड रस्त्यावर १०००० चौरस फुटाची जागा देणगी म्हणून प्राप्त झाली. त्या जागेत दक्षिणा भवन या नावाची वास्तू उभारण्याची कल्पना असून. संस्थेचे कार्यालय, वाचनालय, ग्रंथालय, अभ्यासिका, पाहुण्यांची राहण्याची सोय अशा प्रकारची वास्तू उभारण्याचे काम प्रस्तावित आहे. वृत्तपत्रे, रस्त्यांवरील पाट्या अशा सार्वजिनक ठिकाणी होत असलेल्या अशुद्ध मराठी भाषेचा वापर थांबावा यासाठी काही मोहीम संस्थे मार्फत राबवले जात आहेत. मराठी भाषा कशी शिकवावी या विषयावर संस्थेत एक अभ्यासक्रम चालवला जातो. शारदा शिंत्रे या मराठीच्या अभ्सासक हा उपक्रम चालवतात. संस्थेला अन्यही बरेच उपक्रम सुरू करायचे आहेत. त्यासाठी संस्थेला तरूण अभ्यासक आणि धनाची मदत करणारे दानशूर अशा दोहोंच्या मदतीची गरज आहे, जेणेकरून आणखी शेकडो वर्ष संस्था मजबूतपणे काम करत राहील.

 

सचिन कृष्णा तळे 

Thursday, 22 September 2022

अखिल भारतीय महानुभाव साहित्य मंडळ.

 

अखिल भारतीय महानुभाव साहित्य मंडळ.




 

'‘महान अनुभवोस्तेजा बलं वा यस्य सः महानुभावः'’ या दृष्टीने मोठा तेजाने युक्त असलेल्या लोकांचा मार्ग, तो महानुभाव पंथ, असे म्हटले जाते. ज्ञानेश्वरांच्या काही काळ अगोदर 'महानुभाव' संप्रदाय महाराष्ट्रात उदयास आला. या संप्रदायाचे मूळचे नाव ‘परमार्ग असे असून महानुभाव पंथ हे नाव प्रथम एकनाथांनी वापरले. महानुभाव पंथ महाराष्ट्रात उगम पावलेला असला तरी त्याचा प्रसार उत्तर भारतात पंजाब आणि काश्मीरपर्यंत झाला. तत्त्वाचिंतनात्मक लेखन हे त्यांचे एक वैशिष्ट्य आहे. ग्रंथांवर भाष्ये-महाभाष्ये लिहिली गेली. या संप्रदायातील अनेक भाष्यकार संस्कृतज्ञ विद्वान आणि त्यांनी आपले भाष्यग्रंथ स्वामींच्या आदेशानुसार लोकभाषा मराठीतून लिहिले आहे. त्यांचे सूत्रपाठ, सतिग्रंथ, आख्यान काव्य, साधना ग्रंथ, टीकाग्रंथ आणि भाष्यग्रंथ अत्यंत मोलाचे आहेत. मराठीत लिहिलेले सूत्रपाठ हिंदी अथवा पंजाबी मातृभाषा असलेले अनुयायी अद्यापही वाचतात. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर हे स्वतः गुजराती भाषक असले, तरी ते मराठी भाषा अस्खलित बोलत. आपल्या तत्त्वज्ञानाचा मराठी या लोकभाषेत त्यांनी प्रचार केला.

 

श्री चक्रधर स्वामी यांचे विचार समाजातील सर्व स्तरांवर पोहचवण्यासाठी महानुभाव पंथातील सर्व संत महंत यांनी मिळून  अखिल भारतीय महानुभाव साहित्य मंडळ ची स्थापना केली. ह्या मंडळातर्फे दरवर्षी महानुभाव पंथाच्या साहित्याचे संमेलन भरवण्यात येते. जन्मोस्तव निम्मित अखिल भारतीय महानुभाव संमेलन हे नाशिक गंगापूर येथे २९ ते ३१ ऑगस्ट २०२२ भरवण्यात आले होते. या साहित्य संमेलनात तीन दिवस विविध धार्मिक , अध्यात्मिक , सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले गेले. अखिल भारतीय महानुभाव साहित्य मंडळ तर्फे धर्मसभा भरवणे , संत महंतांची मिरवणूक अन शोभायात्रा काढणे , भजन करणे, संतांची कीर्तने ,कथावाचन ठेवणे ,कवींच्या काव्य वाचन चा कार्यक्रम राबवणे तसेच चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानावर चर्चा आणि मार्गदर्शन आयोजन करणे, महानुभाव पंथाशी निगडित साहित्य प्रकाशित करून त्यांना व्यासपीठ मिळवून देणे असे अनेक उपक्रम हे मंडळातर्फ़े राबवले जातात. आचार्य भानुकवी जामोदेकर साहित्य संघाचे पहले आद्य कवयित्री महदंबा साहित्य संमेलन जालना जिल्ह्यातील दहीपुरी येथे भरले होते. 2018 साली अखिल भारतीय महानुभाव साहित्य महा मंडळाने सुद्धा 12वे तपपूर्ती महानुभाव साहित्य संमेलन जालना येथे भरविले होते. या संमेलनात राज्यातील सर्व साहित्यिक, राजकीय नेते, विद्यार्थी, संशोधक, मराठी साहित्य प्रेमी व महानुभाव पंथाचे अनुयायी सहभागी झाले होते.

 

महानुभावांच्या मराठीविषयक आत्मीयतेच्या भावनेमुळे या पंथातील व्यक्तींनी विविध वाङ्मयप्रकारांत रचना करून मराठी साहित्य समृद्ध केला आहे. स्मृति-संकलनात्मक गद्य चरित्रवाङ्मय ही या पंथाची मराठी साहित्यास लाभलेली महत्त्वाची देणगी होय.

 

सचिन कृष्णा तळे

 

 

 

Tuesday, 20 September 2022

लोकराज्य ग्रंथालय

 लोकराज्य प्रतिष्ठान संचालित लोकराज्य ग्रंथालय


चला पुस्तकं वाचूया...वाचन चळवळ पुढे नेऊया !


आजच्या मोबाइल आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण वाचन संस्कृती पासून फार दूर गेलो आहोत.लहान मुलांपासून तरुण ते वयोवृद्धांपर्यंत सगळेच मोबाईलच्या जगात हरवले आहेत. खास करून तरुणाई वाचन संस्कृती पासून दूर जाताना पाहायला मिळतेय.त्यामुळेच आपली वाचन संस्कृती टिकावी आणि वाढावी यासाठी लोकराज्य प्रतिष्ठान संचालित लोकराज्य ग्रंथालयामार्फत गेल्या काही वर्षांपासून वाचन चळवळ राबविली जातेय. या मुंबई,नवी मुंबई,ठाणे,पनवेल या परिसरात लोकराज्यच्या टीम मार्फत ही चळवळ राबवली जातेय.


घरोघरी पुस्तक पोहोचावे आपल साहित्य,संस्कृती,इतिहास, विज्ञान पुस्तकांच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोहोचाव या पुस्तकांमुळे आयुष्य समृद्ध व्हावे यासाठी लोकराज्य ग्रंथालयाच्या मार्फत प्रयत्न सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रयत्नांना वाचक प्रेमींचाही चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.अगदी काही पुस्तक आणि काही वाचक प्रेमींपासून सुरू झालेल्या या लोकराज्य ग्रंथालयात दिवसागणिक पुस्तक आणि वाचक प्रेमींची संख्या वाढतेय. मुख्यतः पुस्तक का वाचावे ? पुस्तकांमुळे आपल्या आयुष्यात किती बदल घडू शकतो याची जाणीव ग्रंथालयाशी जोडल्या जाऊ लागलेल्यांना होऊ लागली आहे.


महत्त्वाचं म्हणजे आगामी काळात शाळा,महाविद्यालय या ठिकाणीच विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी नवीन येणारी पुस्तक माहित पडावी आणि शाळा कॉलेजच्या वयातच विद्यार्थ्यांना आयुष्य समृद्ध करणाऱ्या आयुष्याला वळण देणाऱ्या पुस्तकांशी मैत्री व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासोबत गाव तिथे ग्रंथालय,वाडी वस्ती,रहिवासी इमारत त्या त्या ठिकाणी छोटे खानी का होईना ग्रंथालय उभारण्याचा लोकराज्य प्रतिष्ठानचा मानस आहे.


ही पुस्तक चळवळ वाढावी यासाठी सर्व वाचक प्रेमींचा हातभार महत्त्वाचा आहे.घरोघरी पुस्तक पोहोचावे आपल साहित्य,संस्कृती,इतिहास, विज्ञान पुस्तकांच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोहोचाव या पुस्तकांमुळे आयुष्य समृद्ध व्हावे यासाठी वाचक प्रेमींच्या मदतीची आवश्यकता आहे.


गरजू वाचकांपर्यंत पुस्तक पोहोचावी यासाठी वाचलेली पुस्तकं लोकराज्य ग्रंथालयाला दान करावीत त्याच सोबत वाढदिवस,एखाद्या चांगल्या प्रसंगी ग्रंथालयाला पुस्तकं दान करून तो प्रसंग साजरा करावा अशी विनंती लोकराज्य प्रतिष्ठानच्या टीम मार्फत सर्व वाचक प्रेमींना करण्यात आली आहे. सर्वांच्या सहकार्यामुळेच ही वाचन चळवळ वाढवू शकते या वाचन चळवळीत प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला तरी देखील सध्या वाचनापासून दुरापास्त झालेल्या पिढीला वाचन संस्कृतीशी जोडता येऊ शकतो आणि या माध्यमातूनच आयुष्य समृद्ध होऊ शकतं.


टीम-लोकराज्य प्रतिष्ठान 

संचालित लोकराज्य ग्रंथालय

संपर्क: ०९८७०५९३४४५


“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale