Tuesday, 29 March 2022

जागतिक मराठी परिषद

 



 

जागतिक पातळीवर मराठी भाषकांना एकत्र आणावे, मराठी भाषा व संस्कृती यांची जपणूक करून ती वृद्धिंगत करावी, उद्योगात मराठी माणसाची प्रगती होण्यासाठी त्याला उद्युक्त करावे आणि या सर्व संदर्भात विचारांची देव-घेव व्हावी या उद्देशाने जागतिक मराठी परिषदेची स्थापना १९८९ साली झाली. फक्त साहित्यिकी अन साहित्य विषयी ती सीमित न राहत त्यांत सर्व कलाशाखांतील कलाकार,  शिल्पकार, चित्रकार, गायक, वादक, नर्तक, संगीतकार, नाट्य-चित्रपटकलावंत, व्यापारी-उद्योजक, नावाजलेले कारखानदार, सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते, राजकीय नेते आणि सामाजिक क्षेत्रांतले  मान्यवर आणि सर्वसामान्य रसिकजन या सर्वांना एकत्र आणून त्यांच्या विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ निर्माण झाले पाहिजे अशी सूचना त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. शरद पवार , डॉ. रवी बापट, बी. के. देसाई आणि माधव गडकरी ह्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन च्या व्यासपीठावरून केली.  कल्पना तर भव्यच होती आणि ती शरद पवारांनी मनोहर जोशी ह्यांच्या सहकार्याने ती उचलून धरली.

 

जागतिक मराठी परिषदेची एक शाखा म्हणून १९९४ साली जागतिक मराठी अकादमीची स्थापना झाली. या नव्या संस्थेने २००४ सालापासून ‘शोध मराठी मनाचा या नावाची संमेलने घेण्यास सुरुवात केली. वि.वा. शिरवाडकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली दि. १२ आणि १३ ऑगस्ट १९८९ साली मुंबई इथे परिषदेचे पहिले अधिवेशन भरवले गेले होते. ह्या पहिल्या अधिवेशनात स्वागतगीत गाण्यासाठी दस्तुरखुद्द गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि मीना, उषा, हृदयनाथ ही भावंडे उपस्थित होती.  पु. ल. देशपांडे एक वक्ता म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्या पदी मॉरिशसच्या मंत्री शीलाबाय बापू होत्या. अश्या अनेक मान्यवरांच्या दिग्गजांच्या उपस्थितीत हा पहिला सोहळा पार पडला होता. पु. ल. देशपांडे ह्यांच्या अध्यक्षतेखाली मॉरिशस येथे  १९९१ साली दुसरे अधिवेशन झाले नंतर दिल्ली इथे १९९४ साली ह्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे वसंत गोवारीकर होते, १९९६ साली जेरुसलेम इस्रायल येथे प्रभाकर देवधर ह्याच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन झाले आणि १९९९ साली रघुनाथ माशेलकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली हैदराबाद येथे अधिवेशन झाले.

 

मराठी भाषेच्या, मराठी भाषिकांच्या व महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी संघटित प्रयत्न करणे हा या परिषदेचा मूळ उद्देश आहे. अशा प्रयत्नांसाठी जगातील विविध क्षेत्रांतील मराठी भाषिकांचे प्रतिनिधी पहिल्यांदाच या परिषदेच्या रूपाने एकत्र येत आहेत. मातृभाषा हे व्यक्तीच्या व समाजाच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम मानून आम्ही या ठिकाणी विचारविनिमय करणार आहोत. ” ह्या शब्दात शरद पवारांनी ‘ जागतिक मराठी परिषदेची ‘ संकल्पना स्पष्ट केली.

 

कुसुमाग्रजांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेच्या सद्य:स्थितीविषयीची आपली मते मांडताना  "कागदोपत्री मराठी भाषा ही राजभाषा झालेली आहे. पण व्यवहारात तिचा हा अधिकार फारसा मान्य झाल्याचं दिसत नाही. डोक्यावर सोनेरी मुकुट आणि अंगावर फाटके कपडे अशा अवस्थेत ती मंत्रालयाच्या दाराशी उभी आहे " आजही महाराष्ट्राच्या प्रमुख शहरात हीच परिस्थिती दिसून येते.

 

सचिन कृष्णा तळे

 

 

 

 

Thursday, 17 March 2022

अमेरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था

 



 

बालसाहित्य म्हणजे मोठ्या माणसांनी लहान मुलांसाठी लिहिलेले वाङ्मय होय. बालसाहित्यात बुद्धीरंजन-मनोरंजन-संस्कार यांचा समतोल-समन्वय साधून छोट्या बाळांसाठी बडबडगीते, वाचता येणाऱ्या लहान मुलांसाठी कविता, नीतिकथा, साहसकथा, अन्य गमतीदार कथा, प्रवासवर्णने आणि कधीकधी छोट्या कादंबऱ्या असतात. राजा-राणी, राजकन्या, पऱ्या, देवदूत, बोलणारे प्राणी, जादुगार, राक्षस आणि सद्गुणी- दुर्गुणी माणसे यांच्या कथा बालसाहित्याचे विषय असून लहान मित्रांना त्यातून गम्मत आणि वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे ह्याच दृष्टिकोनातून बालसाहित्य लिहिणारे अनेक लेखक या मराठी मातीत जन्माला आले. उगवत्या पिढीवर चांगले संस्कार घडवण्यासाठी चांगले बालसाहित्य आणि बालसाहित्य लिहिणारे लेखक घडणे गरजेचे आहेत. कदाचित ह्याच विचारांवर बालसाहित्यकार अमरेंद्र गाडगीळ यांनी इ,स, १९७६मध्ये अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन नावाची संस्था स्थापन केली.

 

अमरेंद्र गाडगीळ मराठी बालकुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक आणि गोकुळ या मुलांच्या मासिकाचे संपादक होते. अनेक बालसाहित्याची त्यांनी निर्माती केली. बालसाहित्यात साने गुरुजी, महादेवशास्त्री जोशी, ना. ह. आपटे, भा. रा भागवत, गंगाधर गाडगीळ, दत्ता टोळ, राजीव तांबे, शंकर सारडा यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. आपल्याला भावी पिढी जर मानसिकदृष्ट्या निरोगी व कल्पक घडवायची असेल तर बालपणापासून मुलांच्या हातात (मोबाइलसोबत) सकस बालसाहित्यही देता आले पाहिजे. कारण मुलांचे भावविश्व हे बालसाहित्य वाचनातूनच लवकर समृद्ध होते. गेल्या पिढीतील आजी-आजोबा ही लहान मुलांसाठी गाणी-गोष्टींची चालती-बोलती विद्यापीठे होती. ही माणसं पाठ्यपुस्तकी शिक्षणाच्या दृष्टीने कदाचित अल्पशिक्षित असतील, परंतु मौखिक परंपरेने आलेले अनुभवसिद्ध शहाणपण त्यांच्या जवळ विपुल होते.

 

'अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे नाव बदलून ते २०१७ साली 'अमेरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था' असे करण्यात आले. पुणे , सोलापूर , जळगाव , कोल्हापूर , ठाणे , सातारा, सांगली, संगमनेर, अहमदनगर , परभणी अश्या अनेक ठिकाणी २५ हुन अधिक बाल साहित्य संमेलन ह्या संस्थेमार्फत भरवण्यात आले. दरवर्षी  विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच बालसाहित्यिक आदींचा या बालकुमार साहित्य संमेलनात मोठ्या प्रमाणात सहभाग असे. ह्या संस्थे मार्फत घेण्यात येणाऱ्या संमेलनात काव्यवाचन, बालकुमार कथाकथन, परिसंवाद, सत्कार सोहळा, ग्रंथ दिंडी, ग्रंथ प्रदर्शन आदी उपक्रमांचा समावेश आहे. २०१० साली स्व. मंगेश पाडगांवकर ह्यांच्या अध्यक्षते खाली संगमनेर इथे बाल साहित्य संमेलन भरवले गेले होते.

 

सचिन कृष्णा तळे

 

 

 

 

 

Thursday, 10 March 2022

अंकुर साहित्य संघ

 



 

जमिनीत पेरलेली बी अंकुरल्यानंतर जशी त्याची काळजी घ्यावी लागते, त्याचप्रकारे साहित्य क्षेत्रातील नवोदित साहित्यिक हे एक अंकुरच असतात. त्यांची काळजी घेणे त्यांना प्रोत्साहन देणे त्यांना व्यासपीठ निर्माण करून देणे त्यांना साहित्य घडवण्यात सहकार्य करणे हे खूप गरजेचे आहे. जुन्या नावाजलेल्या साहित्यिकांचा वारसा आपण वाचून जपून ठेवलंच पाहिजे पण नव्या साहित्यिकांकडून नवोदितांकडून तश्याच प्रकारचे साहित्य लिहून घेणे त्यांना त्या उंचीवर घेऊन जाणे हे नावाजलेल्या साहित्यिकांचे कर्तव्य आहे. ह्याच विचारांवर आधारित अकोल्यात ‘प्रस्थापितांचा सन्मान, नवोदितांना प्रोत्साहन हे ब्रीद वाक्य घेऊन नवसाहित्यिकांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे अंकुर साहित्य  संघ.

 

नवोदित लिखाणाला प्रसिद्धीद्वारे खतपाणी देणे, साहित्य संमेलनाचे व्यासपीठ देऊन प्रोत्साहन देणे, शिवाय पुरस्कार देऊन कौतुक करणे अशा एक ना अनेक बाबी अंकुर साहित्य संघ गेली अनेक वर्षे करत आहे. हिंमत शेगोकार ह्यांनी अंकुर साहित्य संघ ही संस्था ९ ऑगस्ट १९८६ रोजी वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथे स्थापन केली. तिचे महाराष्ट्र राज्यभर हजारापेक्षा अधिक सभासद आहेत. या संस्थेच्या अकोला, अमरावती, कुर्‍हा (काकोडा), जळगाव, जालना वगैरे अनेक शाखा आहेत. अंकुर साहित्य संघाचे अकोला जिल्ह्यातील चांदूर येथे एक वाचनालय सुद्धा आहे. या वाचनालयातर्फे १९९८सालापासून दरवर्षी साहित्य पुरस्कार दिले जातात. अंकुर साहित्य  संघ या संस्थेची ३० वर्षांत अकोला जिल्ह्यात २० साहित्य संमेलने झाली, वाशीम जिल्ह्यात ७ तर अमरावती जिल्ह्यात ६ व  सोलापूर जिल्ह्यात ३, यवतमाळ जिल्ह्यात ३, हिंगोलीत २ संमेलने झाली असून  मुंबई, परभणी, वर्धा, नांदेड, सातारा, पुणे आणि गोवा येथे एकदा संमेलन झाले आहे. या सर्व साहित्य संमेलनांतून जवळपास १५ हजारांपेक्षा अधिक नवोदित साहित्यिकांचे साहित्य प्रकाशात आले आहे. प्रत्येक संमेलनात कथा, कविता, गझल, ललित, बालसाहित्य, समीक्षक, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ’अंकुर साहित्य पुरस्कार, ‘अक्षरतपस्वी पुरस्कार, ‘अक्षरवेल पुरस्कार, ’बालकवी पुरस्कार, आणि महाराष्ट्राबाहेरील कवीसाठी ’बी पुरस्कार दिले जाते. शाल, श्रीफळ देऊन सत्कार, मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.

 

आतापर्यंत झालेल्या साहित्य संमेलनात अनेक दिग्गज साहित्यिकांनी अध्यक्षपद भूषवले आहे. यात डॉ. यशवंत मनोहर, सिंधूताई सपकाळ, प्रा. फ. म. शहाजिंदे, प्रा. भगवान भोईर, प्रतिमा इंगोले, नामदेव कांबळे, श्रीकृष्ण बेडेकर, डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. विठ्ठल वाघ, मलिका अमर शेख, प्रा. फ. मुं. शिंदे, शंकर सारडा, डॉ. प्रा. विलास डोईफोडे, स्व. जगदीश खेबूडकर, डॉ. सय्यद जब्बार पटेल, मेघना वसंत वाहोकार, डॉ. रमेश वरखेडे, डॉ. शोभा रोकडे, डॉ. शंकर राऊत, रवींद्र बगाडे, रामदास डांगे, प्रा. सदानंद मोरे, शुभांगी भडभडे, प्रा, इंद्रजित भालेराव, डॉ. श्रीपाल सबनीस, माधवी कुंटे यांनी अध्यक्षपद भूषवले आहे.

 

सचिन कृष्णा तळे




Wednesday, 9 March 2022

महाराष्ट्र साहित्य परिषद


 

आपण भाग्यवंत आहोत कारण आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला जशी संतांची परंपरा लाभली तशीच साहित्याची हि लाभली आहे. थोडक्यात काय तर जसे वाचक तसे त्यांचे लेखक अन जसे लेखक तसे त्या लेखकांची संस्था. पुणे म्हणजे विद्येचं माहेर घर अन माझ्या मते हि विद्या लेखकांच्या लेखणीतून विचारवंतांच्या विचारातून तर अखंड साहित्यातून निर्माण झालेली देवता आहे. मग ह्याच पुण्याला साहित्याचा जुना वारसा असताना पुण्यात लेखकांची, विचारवंतांची अन क्रांतिकारकांची साहित्य संस्था नाही असं होणार नाही. एकोणविसाव्या शतकाच्या उत्तराधार्थ (१८७८) न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथकार संमेलन सुरु केले पण काही कारणास्तव संमेलन खंडित होत होती. या खंडित संमेलनाना स्थायी संस्थेचं स्वरूप देण्याचा विचार झाला. ह्या विचारातून लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने २७ मे १९०६ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेची ज्योत पुण्यात पेटवली गेली.

 

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यालय सुरुवातीला मळेकर वाडा म्हणून ओळखल्या जाणार्या वास्तूत होते. त्यानंतर ते टिळक रोडवर स्थलांतरित करण्यात आले. इथे ‘माधवराव पटवर्धन सभागृह, एक ग्रंथालय आणि त्यातच ‘कै.वा.गो. आपटे संदर्भ ग्रंथालयआहे तसेच इमारतीच्या तळघरात खासगी संस्था पुस्तक प्रदर्शने भरवली जातात. मुंबई, विदर्भ आणि मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्र हे 'मसाप'चे कार्यक्षेत्र आहे. महाराष्ट्र, गोवा, छ्त्तीसगढ, मध्य प्रदेश या राज्यांत आणि बिदर, बेळगाव इत्यादी गावांत परिषदेच्या ३५० शाखा असून, १२ हजाराच्यावर सभासद आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्यात ६५ शाखा आहेत. खर सांगायचं तर अनेक मान्यवर लेखक कवी साहित्यिक ह्यांचे नेतृत्व करणारी ही सगळ्यात मोठी साहित्य परिषद आहे.

 

महाराष्ट्र साहित्य परिषद ही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था असून ती महामंडळाला दरवर्षी भरणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मार्गदर्शन करते व सहभागी होते. महाराष्ट्रात राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अशी बारा साहित्य संमेलने होतात. परिषदे मार्फत अनेक उपक्रम राबवले जातात जसे कि साहित्यिकांचे स्मृतिदिन पाळणे , सावित्रीबाई फुले अभ्यासिका चालवणे , साहित्यिकांसाठी मोफत कायदेशीर सल्ला देणे , साहित्यिक गप्पा वर आधारित कॉफी क्लब भरवणे इ. साहित्याची योग्य दखल घेत , लेखकांचा योग्य तो सन्मान करत परिषद दरवर्षी वेगवेगळ्या स्वरूपात पुरस्कार प्रधान करत आली आहे.  शंभर हुन अधिक वर्षाचा अनुभव असलेली हि संस्था आणि त्याचा परिवार व त्याच अस्तित्व पाहता परिषदेच्या संमेलन अध्यक्षाच्या निवडीसाठी दरवर्षी वाद निर्माण होताना आपण पाहत आलो आहे. तरीही महाराष्ट्र साहित्य परिषदेची साहित्य सेवा हि अखंड नित्यनेमाने स्वकर्तृत्वावर खंबीरपणे अविरत चालू आहे.

 

सचिन कृष्णा तळे

७७०९०९९६४६

 

 

Monday, 28 February 2022

मराठी वाङ्मय परिषद

 

मराठी वाङ्मय परिषद

 


साहित्य प्रकाराची स्वतःची अशी एक परिवर्तनशील संकेतव्यवस्था आहे. साहित्य हे सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब असून साहित्यात प्रगट होणारा जीवनाशय तसेच त्याची आविष्कार पद्धती ह्या सर्वांना एक संदर्भ असतो. कविता, कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, निबंध, ललित लेखन, व्यक्तिचित्र हे वाङ्मय चे प्रकार असून लेखक त्याच्या मनाला भावेल त्या शब्दात लेखन करत असतो. आज विज्ञानाच्या संगणकाच्या युगात इंग्रजी भाषेच्या वाढत्या उपयुक्ततेमुळे प्रभावामुळे महाराष्ट्रात जिथे मराठीची अत्यंत वेगाने पीछेहाट होत आहे ती पाहता मराठी वाङ्मय साहित्य मोठ्या प्रमाणत निर्माण होऊन ती तरुण मराठी वाचकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. जर हि अवस्था महाराष्ट्रात असेल तर महाराष्ट्रा बाहेर सर्वाधिक मराठी बोली बोलणाऱ्या बडोद्या ह्या शहरात काय असेल ह्याचा विचार वेळोवेळी गायकवाड घराण्यांनी केला.

 

देशी भाषांना उत्तेजन देण्यासाठी बडोद्याचे पु. श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराजांनी अनेक गोष्टी केल्या. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन कै. चिं.वि. जोशी व कै. डॉ. वि.पां. दांडेकर यांनी ८ फेब्रुवारी १९३१ रोजी मराठी वाङ्मय परिषद, बडोदे या संस्थेची स्थापना केली. कोणत्याही देशाचा विकास व समृद्धी या बाबी त्या देशातील माणसांची मानसिक जडणघडण व सुसंस्कृतता यावर अवलंबून असतात अन संस्कृतीचे यथायोग्य प्रभावी दर्शन जर कशातून घडत असेल तर ते तिला अभिव्यक्त करणाऱ्या भाषेतून आहे. इ.स. १९३१ मध्ये या संस्थेची स्थापना झाल्यापासून आजतागायत संस्थेची एकूण चौसष्ट अधिवेशने झाली आहेत. वि. दा. सावरकर, आचार्य अत्रे, पु. ग. सहस्रबुद्धे , कवी अनिल, विजया राजाध्यक्ष, कवि कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, डॉ. भालचंद्र नेमाडे, विश्वास पाटील, विजय कुवळेकर, डॉ. अरुणा ढेरे, कुमार केतकर, सुरेश खरे, प्रतिभा रानडे, अशा नामवंत साहित्यिकांनी या अधिवेशनांचे अध्यक्षपद विभूषित केले आहे.

 

मराठी वाङ्‌मय परिषद, बडोदे.’ या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवप्रसंगी संस्थेला दिलेल्या निधीच्या व्याजातून प्रतिवर्षी एक किंवा दोन दिवसांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. व्याख्यानमालेअंतर्गत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षास अथवा अन्य व्यासंगी साहित्यिकास-विचारवंतास निमंत्रित करून त्याच्या ज्ञानाचा व व्यासंगाचा, महाराष्ट्रापासून दूरवर राहून आपली भाषा व संस्कृती यांचे जतन करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या आणि वाङ्‌मयाचा आस्वाद घेण्यास व साहित्यातील नवनव्या प्रवाहांचे ज्ञान करून घेण्यास उत्सुक असलेल्या रसिकांना लाभ घेता यावा, हा यामागील उद्देश आहे. ह्या तीन दिवसांच्या अधिवेशनांखेरीज अनेक छोटे मोठे उपक्रम वर्षभर परिषदेतर्फे राबविण्यात येतात.

 

मराठी भाषिक आणि मराठीबद्दल आस्था बाळगणाऱ्या इतर भाषिक साहित्यप्रेमी रसिकांना एकत्र करून वाङ्मयची विविध दालन त्यांना खुली करून देऊन त्याद्वारे बृहन्महाराष्ट्रात मराठी भाषेची अस्मिता जोपासणे , तिचे सवंर्धन करणे व लेखक वाचक याना संपन्न करणे हे मुख्य उद्दिष्टे ह्या संस्थेची आहे.

 

सचिन कृष्णा तळे

७७०९०९९६४६

 

 

 

Tuesday, 22 February 2022

विदर्भ साहित्य संघ

 



विदर्भ साहित्य संघ ही संस्था आता शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहे. विदर्भातील सर्वांत जुनी आणि मोठी साहित्य संघटना म्हणून संस्थेची ओळख आहे. विदर्भ हा महाराष्ट्र राज्याचा ईशान्य दिशेला असणारा प्रदेश. विदर्भात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, आणि गडचिरोली हे जिल्हे येतात. ह्या जिल्ह्यांच्या सीमेला हिंदी भाषिक ह्यांचा प्रभाव जास्त दिसून येतो त्यामुळे मराठी भाषा संवर्धन होणे इथे गरजेचे होते. विदर्भ हा महाराष्ट्र राज्यात सामिल व्हावा म्हणून दि. २८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर येथे एक करार करण्यात आला त्यानुसार विदर्भाला संयुक्त महाराष्ट्रात सामील करून घेण्यात आले. राजकीय अन सामाजिक भूमिकेतून निर्माण झालेले अनेक चळवळी, तसेच ऐतिहासिक घटनेचा प्रभाव ह्या भागात दिसून येतो आणि ह्या सगळ्या घडामोडीचा एकमेव साक्षीदार म्हणजे विदर्भ साहित्य संघ ही संस्था आहे.

 

मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचा सर्वांगीण विकास साधने हे या संस्थेच्या कार्याचे मुख्य स्वरूप असल्याने संस्था त्या योगे साहित्य संमेलनांचे आयोजन, नवीन लेखकांना प्रोत्साहन देणे, नवीन पुस्तके प्रकाशित करणे, विदर्भातील साहित्य जगताला जोडण्यासाठी नियतकालिक चालवणे आदी भरीव स्वरूपाची कामे विदर्भात करीत आली आहे. १३ आणि १४ जानेवारी १९२३ रोजी अमरावती येथे दादासाहेब खापर्डे यांच्या पुढाकाराने साहित्य संमेलन भरविण्यात आले होते. खापर्डे यांनी तेव्हा आताचा विदर्भ, मराठवाडा, हैदराबाद आणि मध्य भारत येथील रसिकांना आमंत्रित केले होते. त्यामुळे ग्वाल्हेर ते छिंदवाडा अशा विविध हिंदी राज्यातील मराठी भाषक या संमेलनासाठी अमरावतीत एकत्र आले होते. या संमेलनाच्या अखेरच्या दिवशी, १४ जानेवारी १९२३ रोजी खापर्डे यांनी विदर्भ साहित्य संघाची स्थापना करण्याची घोषणा केली. त्यानंतर मार्च १९५०मध्ये तिचे मुख्य कार्यालय नागपूरला हलवण्यात आले. संस्थेतर्फे मराठी साहित्याचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवले जातात. १९४६सालापासून विदर्भ साहित्य संघ हा 'मराठी साहित्य परीक्षा' घेत आला आहे आणि यांत सर्वाधिक विद्यार्थी सहभागी होतात. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षांसाठी उत्कृष्ट सराव म्हणून त्या सिद्ध झाल्या आहेत.

 

विदर्भ साहित्य संघाच्या ५५ हुन अधिक शाखा आहेत. त्यांचा विस्तार  जितका मोठा आहे तितकाच त्यांचा वाचक वर्ग हि. दरवर्षी १४ जानेवारीला विदर्भ साहित्य संघाचा वर्धापनादिन साजरा होतो. या दिवशी काही खास पुरस्कार जाहीर करण्यात येतात. विदर्भ साहित्य संघाचे ’युगवाणी या नावाचे एक साहित्य विषयाला वाहिलेले त्रैमासिक आहे तसेच संघाच्या गोंदिया शाखेमध्ये 'भवभूती रंगमंदिर' नावाचे नाट्यगृह हि आहे. संस्थेचे नाव ‘विदर्भ साहित्य संघ’ असले तरी त्यात मराठवाडा आणि मध्य भारताचा मोठा भूप्रदेश सामावला आहे.


सचिन कृष्णा तळे पुणे 

७७०९०९९६४६



Wednesday, 2 February 2022

विश्व मराठी परिषद

 



 

मराठी माणसाचा स्वभाव जसा कठोर , पराक्रमी , धाडसी आहे तसाच तो भोळा आणि समोरच्या व्यक्तीचा जास्त विचार करणारा आहे. तो इतरांचाच जास्त विचार करतो म्हणून तर इतर भाषिक बांधवांबरोबर बोलताना त्यांना त्रास होऊ नये म्हणून तोच मराठी ऐवजी हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलायला सुरवात करतो. मराठी माणूस हा एकमेकांचे पाय खेचतो , एकमेकांना सहकार्य करत नाही, एकजूट नाही अशी बोंब कायम ऐकायला मिळते. मराठी माणूस हा आज जगाच्या कानोकोपऱ्यात पोहचला आहे. मोठ्या उद्योगात, मोठ्या पदावर तो आहे अश्या वेळी हा नुन्यगंड बाजूला सारून प्रत्येक मराठी भाषिकांनी एकत्र यावे. भारताबाहेर जगभरामध्ये सुमारे ६० हून अधिक देशांत सुमारे एक कोटी मराठी बांधव राहत आहेत. फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतामधील इतर राज्यांमध्ये जे मराठी बांधव आहेत; त्यांनाही मराठी भाषा, साहित्य,  संस्कृती आणि मराठी माणसांच्या विकासाविषयी  रुची आहे. अश्यावेळी जगभरतल्या प्रत्येक मराठी माणसांनी मिळून एक वैश्विक मराठी समाज निर्माण केला पाहिजे. ह्याच  संकल्पनेवर आधारित विश्व् मराठी परिषद ची मशाल हि पुण्यात पेटवली गेली.

 

विश्व् मराठी परिषदेचा मुख्य उद्धेश एकमेकांच्या मदतीने असा जागतिक मराठी समाज घडवायचा की मराठी माणसाला सर्वत्र सन्मान मिळेल, मान्यता मिळेल, त्याची प्रगती होईल. सक्षम , संपन्न , समृद्ध असे वैश्विक मराठी ब्रँड तयार करणे ह्याच मुख्य उद्दिष्टेवर परिषदेचं कामकाज चालू आहे. विशेषत: मराठी माणूस हा आर्थिक दृष्ट्या संपन्न आणि समृद्ध होईल. साहित्य, संस्कृती आणि उद्योजकता या तीन आयमांना केंद्रस्थानी ठेवून सध्या विश्व मराठी परिषद कार्यरत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार होणारे मुक्त व्यासपीठ , प्रत्येकाचा सहभाग आणि आपल्या निर्मितीचा सर्वदूर प्रसार हेच विश्व मराठी परिषदेचं खास वैशिष्ट्य आहे. विविध प्रकारची उपयुक्त माहिती सर्वाना उपलब्द करून देणे, विविध प्रकारच्या सेवा पुरवणाऱ्या संस्थांचा परिचय करून देणे , देश विदेशातील नोकरीची संधी पोर्टलद्वारे उपलब्द करून देणे , महाराष्ट्रातील संस्थांना विदेशातून साहाय्य मिळून देणे , १२ कोटी मराठी बांधवाना साहित्याच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना साहित्याची गोडी निर्माण करून देणे , जास्तीत जास्त लेखक कसे तयार होतील ह्या दिशेने कार्यक्रम घेणे , मराठी ब्लॉग लिहिणाऱ्या लेखकांना सन्मानित करणे , जास्तीत जास्त इ बुक्स ऑडिओ बुक साठी प्रयत्न करणे , देशविदेशात संमेलन घेणे , लेखक कवी ह्यांची ओळख त्यांचे साहित्य महाराष्ट्रा बाहेरील मराठी वाचकांपर्यंत पोहचवणे, बाल साहित्य महोत्सव आयोजित करणे असे महत्वपूर्ण कौतुकास्पद भव्य कार्य विश्व मराठी परिषदेतून केले जाते.

 

 सचिन कृष्णा तळे  , Pune 

7709099646

 

 

 

 

 

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale